४ सप्टेंबर १९८७ ची ती धगधगती दुपार. राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील देवराला गावात वाळूच्या वावटळीपेक्षाही भयानक धूर आकाशात झेपावत होता. १८ वर्षांची रूप कंवर आपल्या पतीच्या सरणावर बसली होती. भोवती हजारो लोकांचा जमाव 'सती माता की जय'च्या घोषणा देत होता. त्या धुरासोबत फक्त एक आयुष्यच नाही, तर आधुनिक भारताची घटनात्मक मूल्यंही जळून खाक होत होती.
काय घडलं होतं देवराळा गावात?अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लग्न झालेली रूप कंवर ही १८ वर्षांची तरुणी.पती माल सिंह यांच्या निधनानंतर तिने 'स्वयंस्फूर्तीने' सती जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा सासरच्या मंडळींनी केला. मात्र, प्रत्यक्षदर्शी आणि महिला संघटनांच्या मते, तिला जबरदस्तीने त्या चितेवर ढकलण्यात आलं होतं. या एका घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला. पण खरा भूकंप व्हायचा होता तो जयपूरच्या मंत्रालयात आणि दिल्लीच्या साऊथ ब्लॉक मध्ये.
हरिदेव जोशींचे राजकीय पतन-तत्कालीन मुख्यमंत्री हरिदेव जोशी यांच्यासाठी हे प्रकरण त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा अंत ठरणारं होतं. प्रशासनाने ही घटना रोखण्यासाठी काहीही केलं नाही. इतकंच नाही, तर घटनेनंतर १३ दिवसांनी झालेल्या 'चुंदरी महोत्सवा'त (सतीचे उदात्तीकरण करणारा सोहळा) लाखो लोक जमले असतानाही सरकार हतबल होतं.
या सर्व घटनेची दखल घेण्यात फार फार उशिर झाला.देवराला आणि आसपासच्या गावात नारळ मिळेनासे झाले. या भागात नारळाचे इतके दुर्भिक्ष का आहे याचा शोध फ्घेतला गेला तेव्हा कळले की या भागातले सरव लोक त्या चितेत नारळ अर्पण करण्यासाठी धडपडत होते.
या निष्क्रियतेमुळे दिल्लीत बसलेले पंतप्रधान राजीव गांधी प्रचंड संतापले होते. देशभरातून उमटलेल्या संतापानंतर अखेर जोशींना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
कायद्याचा बडगा आणि आजची स्थिती-या घटनेचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे 'सती प्रतिबंधक कायदा १९८७'. या कायद्याने केवळ सती जाणेच नाही, तर सतीचं उदात्तीकरण करणे हा सुद्धा गंभीर गुन्हा ठरवला. वस्तुस्थिती अशी आहे की, या कायद्यामुळे सतीसारखी अघोरी प्रथा कायदेशीररीत्या संपली, पण न्यायासाठी लागलेली ३७ वर्षे खूप काही सांगून जातात.ऑक्टोबर २०२४ मध्ये जयपूरच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील शेवटच्या ८ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. ३७ वर्षांच्या दीर्घ कायदेशीर लढाईनंतरही 'उदात्तीकरण' सिद्ध होऊ शकलं नाही, ही लोकशाहीसाठी एक मोठी चपराक मानली जाते.
का विसरता कामा नये?आज जेव्हा आपण प्रगतीच्या गप्पा मारतो, तेव्हा देवराला गावची ती चिता आपल्याला आठवण करून देते की, परंपरा आणि अंधश्रद्धेचा विळखा किती खोल असू शकतो. हरिदेव जोशींचे सरकार पडले, कायदा बदलला, पण ज्या समाजाने एका १८ वर्षांच्या मुलीला जिवंत जळताना पाहिलं आणि टाळ्या वाजवल्या, त्या मानसिकतेत खरंच बदल झालाय का?
राजकारण आणि समाजकारण जेव्हा एकाच चितेवर जळू लागतात, तेव्हा राख फक्त एका आयुष्याची होत नाही, तर संपूर्ण व्यवस्थेची होते. रूप कंवर प्रकरण हे केवळ इतिहासातील पान नाही, तर व्यवस्थेसाठी एक कायमची धोक्याची घंटा आहे.न्यायालयाने आरोपींना मुक्त केलं असेल, पण इतिहासाच्या चौकटीत देवराला आजही उत्तरं शोधत आहे. त्या दिवशी नक्की काय घडलं होतं, हे रहस्य कदाचित त्या धुरासोबतच कायमचं विरून गेलं आहे.
सांगायचं असं की मंत्र्यांनी राजीनामा देऊन गेलेले जीव परत येत नाहीत.






