जन्माला येताच नशिबाचे दरवाजे उघडतात; या देशात लग्नासाठी मिळतात २० हजार डॉलर्स आणि घर बांधायला मोफत जमीन!
संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) नागरिक म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला लग्नासाठी सरकारकडून थेट २० हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे १७ लाख रुपये रोख दिले जातात. हे वाचून कदाचित एखाद्या चित्रपटातील स्वप्न वाटेल, पण ही तिथल्या 'वेल्फेअर स्टेट'ची वस्तुस्थिती आहे. या देशात नागरिक असणे म्हणजे केवळ पासपोर्ट असणे नव्हे, तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सरकारी तिजोरीचे दरवाजे उघडे असणे असा होतो.
यामागचं कारण म्हणजे तिथली शासन व्यवस्था आपल्या नागरिकांची काळजी अगदी पाळण्यापासून ते वृद्धापकाळापर्यंत घेते. एखादे बाळ जन्माला आले की, प्रसूतीचा खर्च, हॉस्पिटलचे बिल आणि त्यानंतरच्या ३० दिवसांचा सर्व वैद्यकीय खर्च सरकार उचलते. पालकांच्या खिशाला एक रुपयाचाही खर्च लागत नाही. ही सुविधा केवळ श्रीमंतांसाठी नाही, तर प्रत्येक अमिराती नागरिकासाठी उपलब्ध आहे.
शिक्षणाच्या बाबतीत तर हा देश एक पाऊल पुढे आहे. प्राथमिक शाळेपासून ते कॉलेजपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. इतकेच नाही, तर जर एखादा विद्यार्थी अभ्यासात हुशार असेल, तर त्याला जगातील कोणत्याही नामांकित विद्यापीठात शिकण्यासाठी सरकार पूर्ण स्कॉलरशिप देते. परदेशात राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा खर्चही सरकारच करते.
शिक्षण पूर्ण झाल्यावर जेव्हा लग्नाची वेळ येते, तेव्हा खऱ्या अर्थाने सरकारी मदतीचा ओघ सुरू होतो. लग्नाच्या खर्चासाठी १७ लाख रुपयांचे अनुदान मिळते. त्यानंतर संसाराची खरी सुरुवात होते ती स्वतःच्या हक्काच्या घरापासून. ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न ७ हजार डॉलर्सपेक्षा (सुमारे ६ लाख रुपये) कमी आहे, त्यांना सरकार घर बांधण्यासाठी मोफत जमीन देते.
जमीन मिळाल्यानंतर दोन वर्षात घर बांधणे बंधनकारक असते. जर कुणाकडे घर बांधायला पैसे नसतील, तर सरकार त्यांना बिनव्याजी कर्ज आणि विशेष अनुदानही उपलब्ध करून देते. याशिवाय इंधन, अन्नधान्य आणि वीज-पाण्याच्या बिलातही मोठी सवलत किंवा अलाउन्स दिले जातात.
आकडेवारी सांगती की, युएईमधील नागरिकांचे किमान वेतन भारताच्या तुलनेत तब्बल १० पटीने जास्त आहे. आरोग्य सेवांची जबाबदारीही पूर्णपणे सरकारची असते. याशिवाय युएईचा पासपोर्ट आजच्या घडीला जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टपैकी एक आहे. १८ जून २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, या देशाचे नागरिक १७५ पेक्षा जास्त देशांत व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.
इतके फायदे असल्यावर कोणालाही तिथले नागरिकत्व हवे असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, युएईचे नागरिकत्व मिळवणे ही जगातील सर्वात कठीण गोष्टींपैकी एक आहे.
एखादी परदेशी महिला जर अमिराती पुरुषाशी लग्न करत असेल, तर तिला ७ वर्षांनंतर (अपत्य असल्यास) किंवा १० वर्षांनंतर नागरिकत्व मिळू शकते.
दुसरा मार्ग म्हणजे 'एक्सेप्शनल मेरिट'. जर तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रतिभा असेल, तर सरकार स्वतःहून तुम्हाला नागरिकत्व बहाल करते. पण यासाठी केवळ 'नॉमिनेशन'चीच पद्धत आहे, तुम्ही स्वतःहून अर्ज करू शकत नाही.
तिसरा पर्याय म्हणजे ३० वर्षे तिथे वास्तव्य करणे. पण ३० वर्षे राहिल्यानंतरही तुम्हाला अरबी भाषेचे ज्ञान आणि तिथल्या संस्कृतीशी एकरूप व्हावे लागते. तरीही नागरिकत्व मिळणे हा हक्क नसून केवळ एक शक्यता असते.
एका बाजूला जगभरात महागाई आणि बेरोजगारीची चर्चा सुरू असताना, युएई आपल्या नागरिकांना ज्या सोयीसुविधा देत आहे, त्या थक्क करणाऱ्या आहेत. अशा प्रकारची सुरक्षितता आणि वैभव इतर देशांना कधीतरी साध्य करता येईल का, हा खरा संशोधनाचा विषय आहे.



