मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

साधं आणि गबाळं असणं हेच डी-मार्टचं रूप; हाच २.८ लाख कोटींचा खरा मास्टरस्ट्रोक!

3 मिनिट वाचन

डी-मार्टचे साधे आणि अस्ताव्यस्त दिसणारे स्टोअर्स हा ब्रँडचा दोष नसून राधाकिशन दमाणी यांचा अब्जावधींचा मास्टरस्ट्रोक कसा आहे?

शेअर करा:
साधं आणि गबाळं असणं हेच डी-मार्टचं रूप; हाच २.८ लाख कोटींचा खरा मास्टरस्ट्रोक!

साधं ,थोडसं गबाळं असणं हेच डी-मार्टचं हे खरं रूप आहे.हाच २.८ लाख कोटींचा खरा मास्टरस्ट्रोक!

डी-मार्टमध्ये शिरलात की तुम्हाला असं वाटतंच वाटतं की हे दुकान किती 'विस्कळीत आणि अस्ताव्यस्त'-थोडसं बॉइज होस्टेलच्या रुमसारखं आहे ? जमिनीवर पडलेले खोके, डोळ्यांना त्रास देणारे पांढरे शुभ्र ट्यूबलाईट्स आणि शून्य सजावट.एखाद्या गजबजलेल्या साध्या आठवडी बाजारासारखा भासणारा हा पसारा खरं तर गोंधळ नाही,तर तो एक अत्यंत अचूक असा 'कॅल्क्युलेशन'चा भाग आहे.डी-मार्टचं हे साधं, किंबहुना थोडं विस्कळीत दिसणं ही त्यांची चूक नाही, तर तो या कंपनीने घेतलेला आजवरचा सर्वात मोठा व्यावसायिक निर्णय आहे.

यामागचं गणित समजून घेणं रंजक आहे.भारतात बहुतांश मोठे रिटेलर्स आपल्या कमाईतील १०० रुपयांमागे ३ ते ६ रुपये फक्त जागेच्या भाड्यापोटी जमीनदाराला देतात. डी-मार्टची वस्तुस्थिती अशी आहे की, ते त्यांच्या बहुतांश स्टोअर्सच्या जागा स्वतः विकत घेतात.यामुळे भाड्याचा अवाढव्य खर्च शून्यावर येतो. तिथे ना महागडा इंटिरिअर डिझायनर असतो, ना मूड लायटिंग.फक्त साधे रॅक्स आणि जमिनीवर ठेवलेले कार्टन्स.

इंटेरिअरवर खर्च न झालेला प्रत्येक रुपया हा फिरून ग्राहकाच्या खिशातच जातो.हे दुकान जेव्हा तुम्हाला 'कुरूप' किंवा 'साधं' वाटतं, तेव्हा तुमच्या मेंदूला एक सुप्त सिग्नल मिळतो - "इथे रोषणाईचा खर्च नाही, म्हणजे इथे वस्तू स्वस्तच मिळणार."यालाच म्हणतात ते 'लो-कॉस्ट' ब्रँडिंग, जे महागड्या जाहिरातींपेक्षा जास्त प्रभावी ठरतं.

या ब्रँडिंगच्या मुळाशी आहेत डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमाणी. दलाल स्ट्रीटवर त्यांना अनेक दशकांपासून 'मिस्टर व्हाईट अँड व्हाईट' या नावाने ओळखलं जातं. एकच पांढरा शर्ट आणि पांढरी पँट, हाच त्यांचा कायमचा पेहराव. कोणताही भपका नाही, कोणताही दिखावा नाही. दमाणी यांनी केवळ दुकान डिझाइन केलं नाही, तर त्यांनी स्वतःच्या साधेपणाचा आरसा तिथे उभा केला आहे.

महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय कुटुंबासाठी डी-मार्ट म्हणजे केवळ दुकान नाही, तर ती एक सवय झाली आहे. जाणीवपूर्वक जपलेलं हे साधं रूप म्हणजे ब्रँडिंगचा अभाव नाही,तर तेच या ब्रँडचं सर्वात मोठं शक्तिस्थान आहे. एखादी गोष्ट 'ब्रँडेड' दिसण्यासाठी ती चकचकीतच असावी लागते, हा समज डी-मार्टने मोडीत काढला आहे.

३१ मार्च २०२६ रोजी डी-मार्टने भारतात ५०० स्टोअर्सचा टप्पा ओलांडला आणि आज या कंपनीचे बाजारमूल्य तब्बल २ लाख ८० हजार कोटी रुपयांच्या वर गेले आहे. कोणत्याही चकचकीत जाहिरातीशिवाय किंवा सेलिब्रिटी ब्रँड अँबेसेडरशिवाय गाठलेला हा आकडा कोणत्याही ब्रँड स्ट्रॅटेजिस्टला घाम फोडण्यासाठी पुरेसा आहे.

पुढच्या वेळी जेव्हा एखादं दुकान खूप साधं आणि विश्वासाला पात्र नाही असं वाटेल, तेव्हा पुन्हा एकदा विचार करा. ते खराब डिझाइन नसू शकतं, तर तो त्या ब्रँडने दिलेला सर्वात मोठा संदेश असू शकतो. सौंदर्यापेक्षा बचतीला महत्त्व देणारा असा दुसरा एखादा ब्रँड तुम्हाला आठवतोय का?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

एका तासात ७.७७ कोटींचा नफा; आशिष कचोलियांची शेअर बाजारातील मोठी खेळी
लाइफस्टाइल

एका तासात ७.७७ कोटींचा नफा; आशिष कचोलियांची शेअर बाजारातील मोठी खेळी

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी आरडी इंडस्ट्रीजच्या आयपीओ लिस्टिंगमधून कोट्यवधींची कमाई कशी केली?

१३ ऑगस्ट, २०२६

शेअर एक, फायदे अनेक: गुंतवणुकीवर मिळवा फ्री पिझ्झा आणि हॉटेल ताजमधील स्टे!
लाइफस्टाइल

शेअर एक, फायदे अनेक: गुंतवणुकीवर मिळवा फ्री पिझ्झा आणि हॉटेल ताजमधील स्टे!

केवळ एका शेअरच्या गुंतवणुकीवर कंपन्या कशा पद्धतीने हॉटेल सवलत, फ्री फूड आणि गिफ्ट व्हाउचरचे अनोखे फायदे देतात.

६ ऑगस्ट, २०२६

वॉल स्ट्रीटचे मोठे खेळीये गाशा गुंडाळतायत; गुंतवणूकदारांनी सावध होण्याची वेळ?
लाइफस्टाइल

वॉल स्ट्रीटचे मोठे खेळीये गाशा गुंडाळतायत; गुंतवणूकदारांनी सावध होण्याची वेळ?

मायकल बरी आणि पीटर थिलसारखे दिग्गज गुंतवणूकदार शेअर्स विकून बाहेर पडत असल्याने भारतीय गुंतवणूकदारांनी सावध राहणे गरजेचे आहे.

२५ जून, २०२६

जगाच्या नजरेआड राहून कोट्यवधी कमावणाऱ्या अवलियांची गोष्ट: अननोन मार्केट विझार्ड्स
लाइफस्टाइल

जगाच्या नजरेआड राहून कोट्यवधी कमावणाऱ्या अवलियांची गोष्ट: अननोन मार्केट विझार्ड्स

शेअर बाजारात शांतपणे कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या सामान्य ट्रेडर्सच्या यशोगाथा सांगणाऱ्या पुस्तकाचा आढावा.

९ मार्च, २०२६