शेअर एक, फायदे अनेक: गुंतवणुकीवर डिव्हिडंडसोबत मिळवा फ्री पिझ्झा आणि हॉटेल ताजमधील स्टे
भारतात शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांची संख्या १३.९ कोटींच्या पुढे गेली आहे. पण एक गंमतीदार वास्तव असं आहे की,यातील ९० टक्क्यांहून अधिक लोकांना आपल्या पोर्टफोलिओमधील 'छुपे' फायदे माहितच नाहीत.शेअर मार्केट म्हणजे फक्त नफा-तोटा, लाभांश (Dividend) आणि बोनस शेअर्सचं गणित असं आपल्याला वाटतं.मात्र, टाटांच्या ताज हॉटेलमध्ये २५% सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला करोडपती असण्याची गरज नाही. तुमच्या डिमॅट खात्यात टाटांच्या ताज हॉटेल कंपनीचा फक्त एक शेअर असला, तरी तुम्ही या 'लक्झरी' फायद्यांचे मानकरी ठरू शकता.
भारतीय कंपन्या आता गुंतवणूकदारांना केवळ भागधारक न मानता 'ब्रँड ॲम्बेसेडर' म्हणून पाहत आहेत. म्हणूनच हॉटेल स्टे, फूड व्हाउचर आणि रिटेल कूपन यांसारखे 'रिअल वर्ल्ड' फायदे दिले जात आहेत. गुंतवणूक आता केवळ कागदावर उरलेली नाही, तर ती तुमच्या जीवनशैलीचा भाग बनली आहे.
हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात 'इंडियन हॉटेल्स' (Taj Hotels) सध्या आघाडीवर आहे. तुमच्याकडे या कंपनीचा किमान एक शेअर असेल, तर तुम्हाला ताज, विवांता किंवा जिंजर हॉटेल्समध्ये राहण्यावर आणि जेवणावर दरवर्षी २५% पर्यंत सवलत मिळू शकते. हे कूपन डिजिटल स्वरूपात थेट तुमच्या ईमेलवर येते. आयटीसी (ITC) देखील आपल्या भागधारकांना त्यांच्या हॉटेल साखळीमध्ये विशेष सवलती देते. लक्झरी लाइफस्टाईलची आवड असणाऱ्यांसाठी हा एक 'स्मार्ट' गुंतवणुकीचा मार्ग ठरत आहे.
खाद्यप्रेमी गुंतवणूकदारांसाठी 'रेस्टॉरंट ब्रँड्स एशिया' (Burger King) आणि 'ज्युबिलेंट फूडवर्क्स' (Domino's) हे मोठे आकर्षण आहेत. बर्गर किंग आपल्या गुंतवणूकदारांना दरवर्षी ५०% सवलतीचे व्हाउचर देते. तर डोमिनोज पिझ्झाचे व्हाउचर भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर किंवा ईमेलवर पाठवले जातात. या कंपन्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) सहभागी होणाऱ्यांना तर अनेकदा अतिरिक्त सरप्राईज गिफ्ट्सही मिळतात.
रिटेल आणि लाइफस्टाईल क्षेत्रात बाटा इंडिया (Bata) आणि रिलॅक्सो (Relaxo) यांसारख्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना आपलंसं केलं आहे. बाटा इंडिया दरवर्षी आपल्या भागधारकांना २०% सवलतीचे कूपन देते, ज्यासाठी कोणतीही किमान खरेदी मर्यादा नसते. रिलॅक्सो तर थेट ३०% सवलत देऊन आघाडीवर आहे. टायटन (Titan) आणि रेमंड (Raymond) सारखे ब्रँड्स देखील वार्षिक सभेनंतर ५,००० रुपयांपर्यंतची सवलत कूपन्स गुंतवणूकदारांना ईमेलद्वारे पाठवतात.
काही कंपन्यांचे फायदे तर अतिशय रंजक आहेत. उदाहरणार्थ,'उगार शुगर' ही कंपनी आपल्या भागधारकांना वार्षिक अहवालासोबत १ किलो साखर मोफत देते. तर 'हॉकिन्स कुकर्स' दरवर्षी ठराविक काळासाठी कुकर आणि किचन अप्लायन्सेसवर २५% पर्यंत सवलत देते. ट्रायडंट लिमिटेड (Trident) आपल्या गुंतवणूकदारांना बेडशीट्स आणि टॉवेल्सच्या खरेदीवर २५% सूट देते.
अर्थात हे फायदे मिळवण्यासाठी काही साध्या अटी पूर्ण कराव्या लागताबहुतांश कंपन्यांमध्ये केवळ एक शेअर धारण केला तरी तुम्ही या फायद्यांसाठी पात्र ठरता. महत्त्वाचं म्हणजे, कंपनीच्या 'रेकॉर्ड डेट'ला तुमच्या डिमॅट खात्यात तो शेअर असणं गरजेचं आहे. तुमच्या ब्रोकरकडे तुमचा ईमेल आणि पत्ता अपडेट असेल, तर हे कूपन्स तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचतात.
गुंतवणूकदारांना कंपन्यांशी जोडून ठेवण्यासाठी ही एक 'विमानतळ लाउंज' सारखी प्रीमियम सुविधा बनत चालली आहे. कंपन्यांना यातून निष्ठावान ग्राहक मिळतात आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशाचा दुहेरी परतावा मिळतो. शेअर मार्केटच्या या ग्लॅमरस जगात आता केवळ पोर्टफोलिओ वाढत नाही, तर तुमच्या सुट्ट्या आणि जेवणाचे बेतही स्वस्त होत आहेत.
आजच्या काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे केवळ पैसे साठवणे नाही, तर एका मोठ्या ब्रँडचा सन्माननीय सदस्य होणे आहे.






