पीसी जेसी ॲण्ड आऊट-एका बॅंक घोटाळ्याची सत्यकथा आपण सध्या वाचत आहोत.आरोपी कस्टडीत जमा झालेत पण हा गुन्हा घडला कसा ? त्यासाठी काय काय पूर्वतयारी केली गेली ?बॅंक घोटाळा करायचा असेल तर एका मुख्य 'गेमर'च्या मागे इतर किती पात्रं काम करत असतात ? हे सगळं समजण्यासाठी काही भागात आपण 'फ्लॅशबॅक' तंत्राचा वापर करत आहोत.आधीच्या भागात रेड्डी, विनिता,भाया या पात्रांचा परिचय झालाच आहे. सिटीच्या डॉकबॉयकडून घेतलेल्या पेपरचा वापर करून मनोरमा शेट्टी नावाचे एक पात्र कसे जन्माला आले ते आता वाचू या.चला तर, वाचू या पुढचा भाग
फावल्या वेळात भरपूर पैसे कमवा.अमेरीकन कंपनी.ट्रेनींग फ्री. या संध्याकाळी. धुरु हॉल दादर(प). गेल्या आठवड्यात मी सात मिटींग अटेंड केल्या होत्या.आता सगळं काही पाठ होत आलं होतं.
"तुमची स्वप्नं पूर्ण करा.बायनरी प्लॅन.चौसष्ट पेअर्स झाल्या की थायलंड.पाचशे बारा झाल्या की रेस्युडीयल इन्कम"
"आता तुम्ही इथे आहात.एक राईट ला एक लेफ्ट्ला.इकडे एक पेअर झाली की इन्कम सुरु.कोड घ्या.कामाला सुरुवात करा. "
मी अनेक मिटींगांना गेलो आणि कंटाळलो.मला हवं ते मिळेना.मग आज सकाळी हवी तशी जाहिरात वाचली. गेलो धुरु हॉलला.
"या या सर." एक चिकणा पुढे आला."सकाळी आपणच फोन केला होता ना?" आफ्टर शेव्ह चा घमघमाट .
हे सगळेच मिटींगच्या आधी बावीस मिनीटं दाढी करतात.
"हे सारंग सर, आपली अपलाईन.यांच्या मार्गदर्शनाखाली...."
मला कंटाळा आला.मी सुरुवात केली. "तुम्हाला माझ्या अटी मंजूर आहेत ना ?"
"हो हो सर..."
"मी पाच कोड घेउन एंट्री घेतो "
चिकण्याचा उघडलेला जबडा बंद होईना. " पण म्हणजे, साडेबावीस हजाराचा खर्च"
थोडासा अविश्वासाचा सूर. मी पाकीट बाहेर काढलं. चिकण्याचा खालचा ओठ थरथरायला लागला.
"पण माझी अट ?"
"मंजूर आहे सर."
"कमिशन?"
"कमिशन नाही सर त्याला इन्कम म्हणा" इतका वेळ गप्प बसलेल्या अपलाइन बोलका झाला.
"डायरेक्ट बँकेत सर." पुढचे सगळे प्रश्न संपले.
" ते खातं उघडायचे फॉर्म..?" " तयार आहेत सर" "तुम्ही फक्त सह्या आणा सर, बाकी मी बघतो " चिकणा पेटला. आठव्या दिवशी मनोरमा सकट सगळ्याची खाती तयार.
पंधरा दिवसानी चेकबुक.केवायसी चा गाजावाजा न होता पाच नव्या खात्याची भर.अर्थात ठरलेल्या अटी प्रमाणे माझ्या नावावर काहीच नव्हते.
मनोरमा शेट्टी स्टार परफॉर्मर.स्टेजवर उभं राहून मनोरमा आपली सक्सेस स्टोरी सांगतानाचे फोटो पण आले. सगळं काही छान चाललं होतं.
कागदावरची मनोरमा शेट्टी आता अस्तित्वात आली.
परळला उतरलं की डाव्या बाजूला रेड रोज देसी बार आहे.तोडणकर कंपनीचा.बाजूला बीटींग चा धंदा .दुपारी मी गेलो तेव्हा भाया माझी वाट बघत होता.
"केम छे दादा? पानी? यां बेहो तो."
भाया एक काम आहे."
भाया अर्थातच तयार.तासाभरानी आम्ही दोघं मुलुंडच्या चिंधी बाजारात (गणेश सिनेमाच्या बाजूला) कपडे शोधत होतो. विचारे कुरीयरचा,बँकेचा युनीफॉर्म मिळता मिळता दोन तास गेले.पण ठीक आहे. भायाला माप फिट बसलं.
तिथून महालक्ष्मीला.जिजाई नगरच्या बाजूला प्रविण छेडा रद्दी घेतो.विकतो.
"कि आई सेठ? "(कसे काय शेठ आपण?)
"मला कोल पाहिजे?"
" किती किलो ? " "
"पाच किलो .आणखी घोड्याची मासिकं असली तर टाक."
आजची खरेदी संपली.भायाला काम समजावून सांगता सांगता साडेसात वाजले.
हातात हजाराची एक नोट ठेवत मी निघालो.
विनीता उद्या महत्वाच्या कामाला जाणार होती. तिला फोन करून मी पण लवकरच झोपलो.






