"हसून घे भटा,आजचा शेवटचा दिवस आहे.आज ऍरेस्ट आणि उद्या सकाळी पंधरा दिवसाचा रिमांड घेतो...."
"नंतर तू आणि मी. कसा कुटतो बघच." विरकर फुस्कारला.
तोपर्यंत थोरातनी खाली जाऊन एक मेहेतर आणला होता. "क्या साब अभ्भी न्हाया था' असं पुटपुटत पण काही न बोलता मेहेतर कामाला लागला.थोड्या वेळाने रुम परत साफ झाली.सगळे आयो आपापल्या जागी येउन बसले.
एकीकडे मिश्रा आणि मेहेताच्या ऍरेस्टचे पेपर तयार झाले होते.मिश्रा चे खिसे मोकळे करण्यात आले.पट्टा काढून घेतला.पैशाचं पाकीट ,रुमाल ,शूज काढून घेतले. अंगझडती घेतली.लॉक अप चा फॉर्म भरला.मेमोची कॉपी बनवली. मेहेताची झडती घेण्याचा प्रश्न नव्हताच.
पण विरकरला मेहेताची काळजी वाटत होती. "याला फिरदोसच्या रुम मध्ये टाक रे...बाबा लोकाबरोबर नको" "स्साला सकाळी जिंदा राहणार नाही"
(बाबा लोकांचा वेगळा लॉक अप असतो पण डेंजरस.ब्लेडच्या पात्यानी रात्री मारामारी करतात.)
मला सारखा एकच धसका.हा मला आत्ता लगेच आत का टाकत नाहीये.मग डोक्यात प्रकाश पडला. सेशन कोर्टाचा शिपाई अजून आला नव्हता.संदीप बहल आणि अनील सिंग दोघही अँटीसिपेटरी बेल चा अर्ज टाकून बाहेर होते.म्हणजे,कोर्टात टाईट फील्डींग लावून शिपाई वाट बघत बसले असणार.
समजा बेल रीजेक्ट झाला तर दोघांना घेउन आज रात्री आमने-सामने.कनफ्रंटेशन शिवाय यांची लिंक लागणार नाही.एकूण रात्र भारी पडणार असं दिसतच होतं. एव्हाना मिश्रा अणि मेहेता जमा झाले होते.
"त्या मेहेताच्या भैणीला बोलाव रे" विरकरने आवाज दिला.
ती बाहेर गॅलरीतंच उभी असावी."तेरे भाई को नाश्टा दिया"
"हां सर "..ती म्हणाली.
"मैने भी दिया.कलसे पेटभर खाना देता मै उसको"
तिनं डोळ्याला रुमाल लावला.माधुरी दिसायला बरीच होती पण आता रडताना आणखी लाल लाल झाली होती.विरकर आता वेगवेगळ्या अँगलमधून तीचा अंदाज घेत होता.
"पैसा किधर रखा है तेरे भाईने? विरकरनं प्रश्न टाकयाला सुरुवात केली.
बाईने आता गळा काढला."मेरा भाई बेकसूर है साब"
"इसको पैचानती क्या तू?"विरकरनं माझ्याकडे बोट दाखवलं. ही एक गुगली होती. हो म्हणाली तर माझा आणि मेहेताचा संबंध आहे. मान हलवून ती नाही म्हणाली.
"पण तेरी भाभी क्युं नही आयी"
"वो डिलीवरी मे गयी है साब"
"अभी तेरा भाईका डिलीवरी कौन करेगा रे?"
आता विरकर ला माधुरीमध्ये जास्तच इंटरेस्ट आला.
"तेरी शादी हो गयी क्या?"
"डायवोस हो गया' माधुरी म्हणाली.
पण एक गोष्ट माझ्या ध्यानात आली विरकरचं लक्ष विचलीत झालंय.
माधुरीकडे बघून तो म्हणाला "मेरी वैफ भी गयी डिलीवरी मे"
माधुरी काहीच बोलली नही.
"साहेब,सि.आर. ल्याहा की आता"(सि आर म्हणजे क्राईम रीपोर्ट.) प्रधान साहेब चिवचिवले.
विरकर कान खाजवत माधुरी कडे टक लावून बघत होता.
एकदम दचकून त्यानी प्रधान कडे पाहीलं. मी जरा दूरच उभा होतो.
"ए भटा इकडे ये. हा रिपोर्ट मी लिहीला आहे तो टाईप कर
"होय साहेब" मी म्हणालो.
"आयला हे मला नव्हतं माहिती . साला दुपारपासून इथेच होता. माझं मॅटर तरी टाइप केलं असतं"
प्रधान परत चिवचिवला.
आज प्रधान काही तरी गडबड करणार.माझ्या मनात एक पाल चुकचुकली.काहीतरी करून सात वाजेपर्यंत हा घरी गेला पाह्यजे.
"तुमचे पण ठेवा ना साहेब पेपर,अर्ध्या तासात उडवतो" मी म्हणालो.
"इब्राहिम मुल्ला मधून चेक उडवले तसे का?" प्रधान म्हणाला.
विरकर मोठ्याने हसला. "प्रधान साहेब , तुम्ही घ्या ना इंटरोगेशन. तोपर्यंत मी जरा .... "
एक तरुण वकील आत आला."सर,मी ऍडवोकेट वागळे"
"बोला"
"संदीप बहल आणि अनिल सिंग च्या मॅटर मध्ये.. "
"काय झालं ..एबी मिळाला का?"
"नाही साहेब.तारीख पडली.पण नो ऍरेस्ट ची ऑर्डर आहे"
"हे पहा वागळे,मला चौकशी साठी दोघंही उद्या पाहीजेत" रायकर फणफणत म्हणाला.
"उद्या नाही , परवा येतील साहेब" असं म्हणत वागळे हसला.विरकर चा पेशंस संपला.
"मला उद्या पाहिजेत.,सकाळी "
"जसा आदेश साहेब " असं म्हणत वागळे जवळजवळ पळालाच.
माधुरी चुळबुळत तशीच बसली होती. प्रधान पेन तोंडात धरून तिच्याकडे बघत बसला होता.
विरकर कंटाळला.मनासारखं काहीच होत नव्हतं बहुतेक. साडेचार वाजले असावेत. व्हिजीटर यायला लागले होते. लॉकअप ला पाठवलेले शिपाई परत आले.चहावाला आला.
"तुम चाय प्येगी" विरकरनी माधुरीला विचारलं
"नही साब .साब मेरा भाई... "
"वो ऍरेस्ट मै है. मै चान्स दिया था उसको.कल घर के तलाशी का ऑर्डर लायेगा"
"किधर रहेता है तुम'
"वडाळा सर"
"घरमे कौन है और"
"कोई नय्ये सर"
विरकरने ओठावरून जीभ फिरवली.
"तुम जाव अभी."घरमेच रहेना""तुमारा भै को भी लायेगा"
"ठीक है साब" असं म्हणत माधुरी गेली.
सहा वाजायला आले होते.प्रधान ने फायली गोळा करायला सुरुवात केली होती.त्याचे पेपर मी संपवले होते.
"साहेब मी चलू का" प्रधान म्हणाला
"तुम्ही निघा साहेब" रायकर म्हणाला.
आता सुरुवात. मी मनात म्हटले.
"भटा इथे बस" मी खुर्चीवर बसलो.
विरकरनी पट्टा हातात घेतला.पिठाच्या गिरणीच्या पट्ट्याचा तुकडा .फटका जोरात बसतो.अट्टल खिलाडी पण तीन फटक्यात संपतात.
महाडीक पाठीकडून पुढे आला.
माझं कोपर हातात घट्ट पकडून ठेवलं.विरकर नी पट्टा जोरात हाणला.डाव्या डोळ्यातून घळकन पाणी आलं.
"बोल,तुझ्या खात्यात चेक वटला कसा"
तळहात बधीर झाला होता.दुसरा फटका. परत तोच प्रश्न.
महाडीकनी खुर्चीला लाथ मारली. मी तोंडघशी टेबलाच्या कडेवर.दातातून रक्त टपकायला सुरुवात झाली. मी टेबलाखाली वाकून थुंकलो.तोंडात रक्ताची आंबट चव गोळा झाली.
पाठीवर एक जोरात रट्टा.पोटाचे पडदे एकदम कडक झाले.ठसका लागला.हातातून विजेचे लोळ जायला लागले.डोळ्यातलं खारं पाणी,रक्त तोंडात जाऊन मळमळायला लागलं.
"मादरचोद,चेक आला कुठून ? रायकर ओरडला.
"मनोरमा शेट्टीच्या खात्यातून.कर्ज घेतलं होतं" मी कसाबसा बोलू शकलो.
"त्या रांडेच्या खात्यात चेक कसा आला'
" मला माहीती नाही"मी पुन्हा एकदा प्रयत्न बोलण्याचा प्रयत्न केला.
एक फायनल ऍसाल्ट.अंदाज चुकला.पोटात बसणारा गुद्दा छाती पोटाच्या मध्येच बसला.वरचा श्वास वरचं राह्यला. डोळ्यापुढे अंधारलं. लाल लाल चांदण्या दिसल्या. पुढे काही कळलंच नाही.






