मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

पीसी जेसी ॲण्ड आऊट: पोलीस कोठडीतील मारहाण आणि चोरावर मोर!

6 मिनिट वाचन

कोठडीतील बेदम मारहाणीनंतर शुद्धीवर आलेल्या आरोपीला बँक घोटाळ्यात आणखी कोणीतरी डल्ला मारल्याचा संशय येतो.

शेअर करा:
पीसी जेसी ॲण्ड आऊट: पोलीस कोठडीतील मारहाण आणि चोरावर मोर!

पीसी जेसी ॲण्ड आऊट-एका बॅंक घोटाळ्याची सत्यकथा
या आधीच्या भागाचा शेवट:
"बोल,तुझ्या खात्यात चेक वटला कसा"
तळहात बधीर झाला होता.दुसरा फटका. परत तोच प्रश्न.
महाडीकनी खुर्चीला लाथ मारली. मी तोंडघशी टेबलाच्या कडेवर.दातातून रक्त टपकायला सुरुवात झाली. मी टेबलाखाली वाकून थुंकलो.तोंडात रक्ताची आंबट चव गोळा झाली.
पाठीवर एक जोरात रट्टा.पोटाचे पडदे एकदम कडक झाले.ठसका लागला.हातातून विजेचे लोळ जायला लागले.डोळ्यातलं खारं पाणी,रक्त तोंडात जाऊन मळमळायला लागलं.
"मादरचोद,चेक आला कुठून ? रायकर ओरडला.
"मनोरमा शेट्टीच्या खात्यातून.कर्ज घेतलं होतं" मी कसाबसा बोलू शकलो.
"त्या रांडेच्या खात्यात चेक कसा आला'
" मला माहीती नाही"मी पुन्हा एकदा प्रयत्न बोलण्याचा प्रयत्न केला.
एक फायनल ऍसाल्ट.अंदाज चुकला.पोटात बसणारा गुद्दा छाती पोटाच्या मध्येच बसला.वरचा श्वास वरचं राह्यला. डोळ्यापुढे अंधारलं. लाल लाल चांदण्या दिसल्या. पुढे काही कळलंच नाही.
(आता वाचू या पुढचा भाग)

परत डोळे उघडले तेव्हा डोळ्यासमोर पंखा दिसला.परत लाललाल चांदण्या.कपडे गच्च ओले.हात बर्फामध्ये.महाडीकचा चेहेरा दिसला. विरकरचा आवाज येत होता.

"नाही साहेब,फटका चुकून बसला. नाही,नाही साहेब.ऍरेस्ट मेमो नाही लिहीला' काहीवेळ परत शांतता.

"हो सर.जयहिंद ...

किती वेळ गेला माहिती नाही.अचानक सगळं काही फोकस मध्ये आलं.

"साहेब,जागा झाला.इकडे या." कोणीतरी पाठीखाली हात घालून उठवलं.

विरकर समोर उभा होता. चेहेरा घामानी थबथबला होता.

पाण्याचा पेला घेउन पुढे आला. मी मान हलवून पाणी..... नको... म्हटलं .पाठीतली कळ थांबतच नव्हती.हातातली बर्फाची पिशवी गळून पडली. दुसरा शिपाई पुढे आला. त्याला मी ओळखलं.जनरल ब्रँचचा शिर्के. मसाजवाला शिर्के. त्यानी माझा शर्ट वर केला. बेंबीच्या वर काहीतरी चोळायला सुरुवात केली.परत मोबाईल वाजला.

"सर, होय सर, शुद्धीवर आला सर ,नाही सर. उलटी नाही सर,होय सर. बघतो सर"..." ऍरेस्ट करावं लागेल सर. होम मधून फोन होता सर. ठीक आहे सर. जयहिंद".

"खालून मानेला पण बोलाव रे".विरकरचा आवाज कापत होता.साडेआठ वाजले होते.कष्टाने मी उठून बसलो. महाडीक गप्प उभा होता. मी टेबलवरून उतरलो.खुर्चीत बसलो. विरकर पुढे आला.काय बोलायचं हे त्याला सुचेना. मी मंद हसलो. त्याचा चेहेरा उजळला.

"भटा, आज नोकरी घालवली असती माझी"

"मी काय ख्वाजा युनुस वाटलो का?" मी म्हणालो.

खोलीतलं वातावरण थोडं मोकळं झालं.

चहा ? मी मान हलवून नको म्हटलं

मी महाडीकला खूण केली. माझ्या बॅगेतून हायफिनॅकची गोळी काढली.एका घोटात खाली घातली.थोड्या वेळानी स्पॅझम कमी झाले. मी उठून लादीवर आडवा झालो. नऊ चे ठोके वाजले.

दहाच्या ठोक्याला मी परत उठून बसलो. विरकर समोर जाउन बसलो.

"करा ऍरेस्ट साहेब.ठीक आहे आता" मी विरकरला म्हणालो.

क्षणभर विरकर गलबलला. "सॉरी,भटा फटका चुकून बसला.आज हवं तर लॉकअप मध्ये टाकत नाही"

आता त्याचा चेहेरा मला लहान मुलासारखा दिसायला लागला.मी मंद हसलो.

"चलता है.आटपा लवकर'' मी म्हणालो.

मला मेहेताची आठवण झाली.साला आत रडत असेल.मिश्रा घोरत असेल.

मेमो लिहून तयार होताच. साडेदहा वाजता दोन शिपायांबरोबर मी लॉकअप कडे चालायला लागलो.

रात्री पावणेदहाची एंट्री बुकात टाकून महाडीकनी मला कस्टडी हवालदाराच्या ताब्यात दिलं.

लॉक अप ड्युटीच्य्या हवालदारानी माझी अंगझडती घेतली.पायात स्लीपर आहेत लेस वाले शूज नाहीत याची खात्री करून घेतली.खिशात हात घालून ब्लेड ,सिगरेट,लायटर,माचीस,चाव्या,पेन ,नाणी, नोटा नाहीत याची खात्री करून महाडीकच्या हातात मेमोची कॉपी सही करून दिली.जनरल ब्रँचचा हवालदार नुस्ताच उभा होता. महाडीक जाताना काहीतरी बोलणार होता पण काही न बोलताच निघून गेला.

हवालदारानी गेट उघडून मला आत जायची खूण केली.आत मिश्रा वाट बघत होता.

माझ्या चेहेरा बघून हात हातात घेउन म्हणाला "बहोत पडी क्या? स्साला, विरकर हलकट है." मी काहीच बोललो नाही.

मेहेता बावरून गप्प उभा होता.त्याच ढगळ चड्डीत.ध्यान दिसत होता.लॉक अप मधली चारपाच माणसं झोपलेली होती.पुठ्ठ्याचे खोके मोडून सपाट करून झोपायची सोय केलेली होती.खिडक्या उंचावर जाळीच्या होत्या.पंखा नसतोच. लाईट पिवळा.टोकाला संडास असावा.मधूनच घाणीचा भपकारा येत होता.पहिल्या मजल्यावर असूनही वारा नव्हता.गर्दी कमी आहे हे बघून मला जरा हायसं वाटलं.

"कल सवेरे कोर्ट मे खडे करेंगे. मेरा वकील आयेगा". मेहेता म्हणाला.त्यानी वकील पंधरा दिवसापासूनच तयार ठेवला होता.मिश्रानी पाण्याची बाटली समोर केली.

दोन घोट पोटात गेल्यावर मी मेहेता ला सांगीतलं "मेहेता ,कल तेरे घरमे ये लोग आयेंगे.मैने बताया वैसेही सब होगा तो तू छूटेगा."

मिश्राची चिंता मला करण्याचं कारण नव्हतं. जुना माणूस .पण राहून राहून काही प्रश्न मला सतवत होते. मेहेताला अटक करण्याच काहीच सबळ कारण नव्हतं. मेहेता ज्या बँकेत घोटाळा झाला तिथे मॅनेजर होता.इतर आरोपींनी मेहेताला ओळखतो असंही सांगीतलं नव्हतं.विरकरनी हे सगळं गेल्या महिन्याभरात चेक पण केलं होतं. मेहेता सतत सहकार्य करत होता. पण मेहेता एवढा घाबरला का होता? म्हणजे मेहेताची आणखी एक पॅरलल गेम चालली होती.

दुसरं म्हणजे मला आज नाही उद्या अटक होणार हे खरं पण आज घाईघाईनी का? होम मधून विरकर वर दबाव कसा आला असेल. ?होमनी दखल घ्यावी असं हे प्रकरण मोठं पण नव्हतं.मला ह्या प्रकरणात लवकर अटक व्हावी अशी कुणाची इच्छा असेल?

मी गेम काळजीपूर्वक खेळतो.मोहरी आपली जागा सोडून पळत नाहीत. कारण त्यांचं पोट भरेल एवढं मिळत असतं. सगळ्यात मोठा प्रश्न. मी फक्त दहा लाखाच चेक ईब्राहीम मुल्ला मधून उडवला होता. गेमप्लॅन तसा होता.पण तक्रार आणखी साठ लाखाची होती. हे साठ लाख कुणी उडवले? मी नाही. मग कोण? एक भयानक शंका माझ्या मनात आली. माझ्या पटावर एक आणखी नवा अनाहूत खेळाडू होता. चोरावर मोर?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

३५० दशलक्ष डॉलर्स घेऊन अदृष्य झालेला 'तो': जॉन रफोची न सुटलेली गुढ कथा
लाइफस्टाइल

३५० दशलक्ष डॉलर्स घेऊन अदृष्य झालेला 'तो': जॉन रफोची न सुटलेली गुढ कथा

अमेरिकन बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा करून २८ वर्षांपासून फरार असलेल्या जॉन रफोची थरारक आणि रहस्यमयी कथा.

२९ एप्रिल, २०२६