आपल्या मोबाईलवर एखादी मजेदार, आकर्षक किंवा धक्कादायक पोस्ट येते.आपण ती वाचतो...आवडते...आणि पुढच्याच क्षणी बोट “Forward” किंवा “Share” बटणाकडे जाते. कधी कधी तर आपण विचारही करत नाही.पण जरा थांबा!
Forward करण्यापूर्वी एक मिनिट विचार केला तर?
याच साध्या सवयीसाठी आहे — Think Twice ही संकल्पना !
ही अशी कल्पना आहे की जी तुम्हाला माहिती पुढे पाठवण्याआधी थोडा वेळ थांबायला आणि पुन्हा विचार करायला भाग पाडते.
कारण एखाद्याने तुम्हाला एखादी पोस्ट पाठवली, म्हणजे त्याने तुम्हाला तिचा पुढचा “carrier” समजले आहे.तो तुम्हाला ओळखतो त्याला नक्कीच वाटले असेल —मी फक्त फॉरवर्ड करतो हा माणूस ही पोस्ट पुढे पाठवेलच पाठवेल.”
थोडक्यात तो तुम्हाला गृहित धरतो आहे.
पण तुम्ही ती पुढे पाठवण्यापूर्वी स्वतःलाच काही प्रश्न विचारलेत तर?
ही पोस्ट मला मुद्दाम पाठवली आहे का? कोणी माझ्या भावनांचा किंवा माझ्या विश्वासाचा वापर करून माझ्याकडून काही कृती करवून घेत आहे का?त्याच्यासाठी मी केवळ दुसऱ्याचा संदेश पुढे नेणारा ‘माणूस’ तर बनत नाही ना?
आणखी एक महत्त्वाचा प्रश्न — मी ही पोस्ट पुढे पाठवणार आहे त्या व्यक्तीला ती खरंच हवी आहे का?
कारण तुमच्यासाठी ती मनोरंजक असली, तरी समोरच्या व्यक्तीसाठी ती कदाचित अनावश्यक असू शकते.
कदाचित त्याला वाटेल —
“हा इसम पुन्हा पुन्हा काहीतरी forward करणार!”
हळूहळू तुमची प्रतिमा त्याच्या मनात तयार होते.
तुम्ही त्याच्या नजरेत Perpetual Forwarder बनता.आणि मग प्रश्न फक्त एका पोस्टचा राहत नाही. तुमची digital reputation त्यातून तयार होते.
समोरच्या व्यक्तीला असेही वाटू शकते —
“हा माझ्या privacy चा विचार करतो का?”
“मी न मागितलेली माहिती तो मला का पाठवतोय?”
म्हणूनच गरज आहे ती एका छोट्याशा सवयीची — फॉरवर्ड करण्यापूर्वी एक पॉज घ्या !
आणि विचार करा —ही पोस्ट पुढे ढकलायला हवीच आहे का ? मिनिटभर थांबा आणि निर्णय घ्या !
जर तुम्हाला खात्री असेल की हे लगेच पाठवायचे आहे — पाठवा.
काही प्रॉब्लेम नाही .
पण जर तुमच्या मनात क्षणभर का होईना, प्रश्न आला — “हे खरंच पाठवायला हवे का?”
एक पूर्ण मिनिट थांबा. इतका छोटासा वेळ कदाचित पुरेसा असेल.कारण त्या एका मिनिटात उत्साह कमी होऊ शकतो.भावना स्थिर होऊ शकतात. आणि कदाचित तुम्हाला जाणवेल —
“नको. हे पाठवण्याची गरज नाही.”
किंवा उलट —
“हो. हे पाठवणे योग्य आहे.”
दोन्ही निर्णय तुमचेच.
Think Twice तुमच्यासाठी निर्णय घेत नाही.
ते फक्त तुम्हाला निर्णय घेण्यासाठी एक क्षण थांबायला सांगते.
आजच्या instant world मध्ये ही एक छोटीशी सवय मोठा फरक करू शकते.
कारण प्रत्येक गोष्ट लगेच पाठवणे आवश्यक नसते.
प्रत्येक आकर्षक पोस्ट share करणे आवश्यक नसते.
आणि प्रत्येक गोष्ट आपल्या contact list मधील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे तर अजिबात आवश्यक नसते.
कधी कधी...
एक मिनिट थांबणे म्हणजेच शहाणपण असते.
म्हणून पुढच्या वेळी Forward बटणावर बोट ठेवण्यापूर्वी —
Think Twice! Forward करण्यापूर्वी एक मिनिट विचार करा.
कदाचित त्या एका मिनिटामुळे तुम्ही एक चुकीचा संदेश, एक गैरसमज किंवा एक अनावश्यक digital footprint तयार होण्यापासून थांबवाल. Think Twice काय म्हणता ?






