तिकीट नाही,पासपोर्ट नाही,तरीही एअर इंडियाच्या विमानाने गाठलं न्यूयॉर्क; दोन पोरांच्या अजब साहसाची ही 'विस्मृत' गोष्ट!
एका बाजूला आजच्या विमानतळावरची ती कडक सुरक्षा,जिथे पाण्याची बाटली नेली तरी सायरन वाजतात आणि प्रवाशांची कसून तपासणी होते. आणि दुसऱ्या बाजूला १९८५ सालची ती दोन पोरं,ज्यांनी सुरक्षेच्या सर्व भिंतींना 'ठेंगा' दाखवत थेट सातासमुद्रापार उड्डाण केलं. सुरक्षा आणि बालिश खोडकरपणा यांच्यातल्या या अजब लढाईत कोण जिंकलं असेल? उत्तर ऐकून तुमचं डोकं चक्रावून जाईल.
ही गोष्ट आहे आयर्लंडच्या डब्लिनमध्ये राहणाऱ्या १० वर्षांच्या कीथ बर्न आणि १३ वर्षांच्या नोएल मरे यांची. गोष्ट सुरू होते एका साध्या वाक्याने— "आई, आम्ही बाहेर खेळायला जातोय!" पण हे खेळायला जाणं त्यांना थेट न्यूयॉर्कला घेऊन जाईल, असं त्यांच्या घरच्यांना स्वप्नातही वाटलं नसेल. एअर इंडियाच्या कॉर्पोरेट इतिहासात ही घटना फारशी चर्चिली जात नाही,पण ही एका मोठ्या सुरक्षेच्या त्रुटीची आणि दोन मुलांच्या अचाट साहसाची कथा आहे.
कल्पना करा, खिशात एक रुपया नाही, हातात पासपोर्ट नाही, पण जिद्द मात्र हिमालय एवढी. या दोन पोरांनी आधी डब्लिनमधून लोकल 'DART' ट्रेन पकडली, तिथून एका फेरीत चोरून शिरले आणि थेट वेल्स गाठलं. तिथून पुन्हा ट्रेनने प्रवास करत त्यांनी लंडनचं हीथ्रो विमानतळ गाठलं. एखाद्या सराईत गुन्हेगारालाही जमणार नाही असं धाडस ही मुलं करत होती.
हीथ्रो म्हणजे जगातील सर्वात गजबजलेलं विमानतळ. तिथे या मुलांनी एक भन्नाट शक्कल लढवली. समोर चालणाऱ्या एका अनोळखी जोडप्याच्या अगदी जवळ हे असे चालले, जणू काही ते त्यांचेच आई-वडील आहेत. सुरक्षा रक्षकांना वाटलं, पोरं पालकांसोबत आहेत आणि त्यांनी चक्क त्यांना आत सोडलं!
आणि मग काय झालं? समोर उभं होतं एअर इंडियाचं विमान, जे न्यूयॉर्कला निघालं होतं. कोणतीही तपासणी नाही, बोर्डिंग पास नाही. ही दोन पोरं आरामात विमानात शिरली आणि रिकाम्या सीटवर जाऊन बसली. एअर होस्टेसला वाटलं, यांचे पालक आजूबाजूलाच कुठे तरी असतील. प्रवासात त्यांना मस्त जेवण मिळालं, सिनेमे बघायला मिळाले आणि बघता बघता विमान न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळावर उतरलं.
न्यूयॉर्कमध्ये उतरल्यावर त्यांना शहरात कसं जायचं हेच कळेना.त्यांनी थेट तिथल्या एका पोलीस ऑफिसरला गाठलं आणि विचारलं, "अहो काका, शहरात जाण्याचा रस्ता कुठला?" त्या एका निरागस प्रश्नाने अमेरिकन पोलिसांचे धाबे दणाणले. जेव्हा समजलं की या मुलांकडे तिकीट नाही की पासपोर्ट, तेव्हा संपूर्ण अमेरिकन सुरक्षा यंत्रणेत खळबळ माजली.
आता पुढे काय? अर्थातच या मुलांना काही जेलमध्ये टाकलं नाही. उलट, अमेरिकन ऑथोरिटीने त्यांना एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलं. तिथे त्यांना हवं ते खायला मिळालं, टीव्ही बघायला मिळाला. दरम्यान, आयर्लंडमध्ये त्यांच्या पालकांनी त्यांना शोधण्यासाठी आकाश-पाताळ एक केलं होतं. शेवटी, एका कडक सुरक्षेत त्यांना पुन्हा विमानात बसवून आयर्लंडला त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं. एअर इंडियासाठी हा एक मोठा धडा होता. या घटनेनंतर विमानतळांवरील सुरक्षेचे नियम जागतिक स्तरावर बदलले गेले.
आजच्या 'डिजिटल' युगात जिथे प्रत्येक पाऊल ट्रॅक केलं जातं, तिथे अशा धाडसाची कल्पना करणंही कठीण आहे. त्या दोन मुलांसाठी ती फक्त एक 'खेळायला जाणं' ही कृती होती, पण जगासाठी तो एक मोठा सुरक्षा धडा ठरला. कधीकधी निरागसता ही सर्वात मोठ्या यंत्रणेलाही कशी चकवा देऊ शकते, हेच यातून दिसतं.
एका साध्या 'खेळायला जातो' या वाक्यातून सुरू झालेला हा प्रवास न्यूयॉर्कच्या फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत पोहोचला, यावर आजही विश्वास ठेवणं कठीण जातं, नाही का?
(या मुलांचे तेव्हाचे आणि आताचे फोटो सोबत दिले आहेत.)






