एका मासिकातून दरमहा ३ कोटींची कमाई: एक अजब बिझनेस मॉडेल
विमानाने ऊड्डाण केले आणि बाहेर बघण्यासारखं काहीच दिसत नसलं की इंडिगोचे प्रवासी समोरच्या सीटच्या खिशात हात घालून 'हॅलो ६ई' (Hello 6E) मॅगझिन बाहेर काढतात.आपल्याला वाटतं की हे मासिक इंडिगो प्रवाशांचा टाईमपास व्हावा म्हणून हे मासिक छापत असेल पण या मासिकातून इंडिगो दर महिन्याला ३ कोटी रुपये कमावते.
इंडिगो एअरलाईन्सकडे सध्या ४०० हून अधिक विमाने दिमतीला आहेत. प्रत्येक विमानात १८० प्रवाशांची आसनक्षमता असते.डीजीसीएच्या (DGCA) ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२६ मध्ये १.३८ कोटी प्रवाशांनी विमान प्रवास केला असून इंडिगोचा बाजारपेठेतील हिस्सा ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
या मासिकाच्या एका अंकात मुखपृष्ठासह सुमारे ५१ जाहिराती असतात. सूत्रांनुसार, सर्व डिस्काउंट देऊन एका जाहिरातीचे मूल्य सुमारे ६ लाख रुपये इतके असते. ५० जाहिरातींचा हिशोब लावला तर एका महिन्यात ३ कोटी रुपये महसूल केवळ या एका मॅगझिनमधून जमा होतो. विशेष म्हणजे, छपाई आणि कर्मचाऱ्यांचा पगार मिळून यावर फक्त ३० लाख रुपये खर्च येतो.
मॅनेजमेटच्या भाषेत याला 'स्टॅटिक मीडिया प्लेसमेंट' (Static Media Placement) म्हणतात.प्रवासी विमानात असताना इंटरनेटपासून लांब असतो. अशा वेळी त्याचे लक्ष समोर असलेल्या छापील साहित्याकडे सहज वळते. आकडेवारी सांगते की, इंडिगोच्या या मासिकाची वाचकसंख्या अनेक नामांकित वृत्तपत्रांपेक्षाही जास्त आहे.
हा केवळ विरंगुळा नसून मानवी एकाग्रतेचा केलेला व्यापार आहे. भारतात सध्या एसी बसेस आणि प्रीमियम टॅक्सींमध्ये अशा मॉडेलसाठी मोठी संधी आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात लोक ४-५ तास एकाच जागी बसून असतात. सध्या या ठिकाणी वाचण्यासाठी कोणतेही दर्जेदार साहित्य उपलब्ध नसते.नव्या उद्योजकांसाठी हा एक न वापरलेला आणि अत्यंत फायदेशीर असा बाजार आहे. जिथे लोक एकत्र जमतात, तिथे जाहिरातींना किंमत मिळते. लोकांच्या रिकाम्या वेळेला महसुलात रूपांतरित करणे हीच भविष्यातील सर्वात मोठी जाहिरात क्रांती ठरेल.
मोठ्या संधी नेहमी डोळ्यांसमोर असतात, फक्त त्या ओळखण्यासाठी व्यावसायिक दृष्टीची गरज असते.






