आज जी स्टोरी सांगणार आहे ती अशा काळातली आहे जेव्हा वर्तमानपत्र हे एकच माध्यम बातम्यांसाठी उपलब्ध होते.अशा काळी जेव्हा वर्तमानपत्रांचे 'क्रेडीट रेटींग' त्यांच्या सत्याच्या पाठराखणीवर अवलंबून असायचे. अमेरिकेत वॉशिंग्टन पोस्ट हे असे वर्तमानपत्र होते (आजही आहे) की त्यात एखादी बातमी आली की त्याची सत्य असत्य पडताळणी करायच्या फंदात कोणीही पडायचं नाही.असा मान मिळवणार्या 'वॉशिंग्टन पोस्ट'ला पण एक जबरदस्त धक्का दिला त्यांच्याच एका पत्रकार मुलीने म्हणजे जॅनेट कूक या मुलीने !
जॅनेट 'वॉशिंग्टन पोस्ट' ची नवी पत्रकार होती.या व्यवसायात आफ्रीकन- अमेरिकन म्हणजे निग्रो खूपच कमी असतात.त्यामुळे जॅनेट कूकचे खास कौतुकच सगळ्यांना होते.कामाला लागल्यानंतर आठ महिन्यातच जॅनेटने एक सणसणीत हृदय हेलावून टाकेल अशी एक स्टोरी केली.
वयाच्या आठव्या वर्षी मादक पदार्थांच्या म्हणजे हेरॉइनच्या आहारी गेलेल्या जीमी नावाच्या एका मुलाची ही कहाणी होती.आजच्या भाषेत सांगायचे तर काही तासातच ती 'व्हायरल न्यूज' झाली.
पोलीस,सामाजीक कार्यकर्ते,राजकारणी त्या मुलाच्या शोधात लागले पण त्याचा पत्ताच लागेना.
लोकलज्जेस्तव तो मुलगा आणि पालक अज्ञातवासात गेले असतील असे गृहित धरण्यात आले.
एप्रील १९८३ साली या वार्तांकनासाठी जॅनेटला पुलिट्झर(Pulitzer Prize) देण्यात आले.
हा मान पहिल्यांदाच एका आफ्रीकन अमेरिकन मुलीने मिळवला होता.सगळीकडे जॅनेट कूकच्या नावाची चर्चा सुरु झाली.पण वॉशिंग्टन पोस्ट हे वेगळेच वर्तमानपत्र आहे.त्यांनी त्यांच्या "ombudsman" म्हणजे लोकपालातर्फे बातमीची चाचणी सुरु केली.आणि काही तासातच त्यांना पहिला धक्का बसला.
जॅनेटने नोकरी मिळ्वण्यासाठी लिहिलेली तिची शैक्षणिक पात्रता खोटी आहे असे त्यांच्या लक्षात आले.एक सदस्य मंडळ जॅनेटकडे पोहोचले आणि काही तासांच्या प्रश्नांच्या भडीमारानंतर अंतिम सत्य बाहेर आले ते असे की हेरॉइनच्या आहारी गेलेल्या जीमीची बातमी केवळ खोटी आणि कपोलकल्पित होती.वॉशिंग्टन पोस्ट'ची अनेक वर्षांची कमावलेली इभ्रत धुळीला मिळाली.जॅनेटचा राजीनामा लिहून घेण्यात आला.
त्यानंतर काहीच तासात जॅनेटला (Pulitzer Prize) परत देण्यासाठी भाग पाडण्यात आले.
सांगायची गोष्ट अशी आता व्हॉट्सॅपसारख्या माध्यमातून दिवसभरात हजारो बातम्या तुमच्याकडे येतात किंवा ढकलल्या जातात.बर्याच बातम्या काही तासातच इतक्या वेगाने पसरतात की त्यांना 'व्हायरल न्यूज'चे मानांकन मिळते पण...'व्हायरल न्यूज' नेहेमीच खरी असते असं नाही.अगदी देशातल्या १ नंबरच्या पेपराच्या नावाने छापून आली तरीही !








