“तू जन्माला आलास तेव्हा तू रडत होतास आणि तुझ्या भोवतालचं जग आनंद साजरा करत होतं.आयुष्य असं जग की, तू या जगातून निघून जाशील तेव्हा जग रडत असेल—आणि तू मात्र समाधानाने हसत असशील.”
खरंच, माणसाच्या आयुष्याचं याहून सुंदर मोजमाप काय असू शकतं?
आपण किती वर्षं जगलो, किती पैसा कमावला,किती मोठ्या पदावर पोहोचलो किंवा किती मालमत्ता मागे ठेवली—यापेक्षा एक प्रश्न कदाचित अधिक महत्त्वाचा आहे— आपण गेल्यानंतर किती माणसांना आपली उणीव जाणवेल?
आजचा काळ विलक्षण आहे. माणसाला चंद्रावर पाठवण्याची क्षमता आपल्याकडे आहे; पण रस्ता ओलांडून नव्या शेजाऱ्याशी ओळख करून घ्यायला आपल्याला वेळ नाही.
हजारो किलोमीटर दूर असलेल्या लक्ष्यावर अचूक क्षेपणास्त्र डागण्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे आहे; पण आपल्या मुलाला दिलेला “रविवारी क्रिकेट मॅच बघायला घेऊन जाईन” हा शब्द पाळणं मात्र अनेकदा जमत नाही.
ई-मेल आला. मोबाइल आला. इंटरनेट आलं. सोशल मीडिया आला. व्हिडिओ कॉल आला.
जगाच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या माणसाशी आपण काही सेकंदांत संपर्क साधू शकतो.
पण प्रश्न असा आहे— इतके ‘कनेक्टेड’ झाल्यानंतरही आपण एकमेकांपासून इतके दूर का गेलो?
संपर्काची साधनं वाढली; संवाद कमी झाला.
माहिती वाढली; समजूतदारपणा कमी झाला.
वेग वाढला; पण आपण कुठे चाललो आहोत याचं भान हरवलं.
आणि या सगळ्या धावपळीत आयुष्यात सर्वाधिक महत्त्वाच्या गोष्टीच नजरेआड झाल्या.
एक अस्वस्थ करणारा प्रश्न
कल्पना करा, तुमचा या जगातील शेवटचा दिवस आला आहे.
मागे वळून आयुष्याकडे पाहताना तुम्हाला काय दिसेल?
तुम्ही किती माणसांच्या आयुष्याला स्पर्श केला?
तुमच्यामुळे एखाद्या माणसाचं आयुष्य थोडं तरी चांगलं झालं का?
तुमच्या कामाने, विचारांनी किंवा वागण्याने पुढच्या पिढीसाठी काही मूल्य निर्माण झालं का?
आणि सर्वात महत्त्वाचं—
शेवटचा श्वास घेतल्यानंतर तुम्ही मागे काय ठेवून जाणार आहात?
बँकेतील शिल्लक नव्हे.
घरं आणि गाड्या नव्हेत.
पदव्या आणि पुरस्कारही नव्हेत.
तर—
तुमच्या अस्तित्वामुळे इतरांच्या आयुष्यात पडलेला फरक.
आयुष्य थांबत नाही
आयुष्याची एक विचित्र सवय आहे.
तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा ताबा घेतला नाही, तर आयुष्य तुमचा ताबा घेतं.
आपण म्हणतो—
“पुढच्या आठवड्यात करू.”
आठवडा महिन्यात बदलतो.
“थोडं स्थिर झाल्यावर करू.”
महिने वर्षांत बदलतात.
“निवृत्त झाल्यावर माझ्या आवडीचं करीन.”
आणि अचानक एक दिवस लक्षात येतं—
आपण आयुष्य जगण्याऐवजी आयुष्य पुढे ढकलत राहिलो.
दिवस आठवड्यांत, आठवडे महिन्यांत आणि महिने वर्षांत कधी बदलले, ते कळलंच नाही.
मग उरते ती एक बोचरी भावना—
“मी जे होऊ शकलो असतो, ते झालोच नाही.”
प्रसिद्ध नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांना आयुष्याच्या अखेरीस एक प्रश्न विचारण्यात आला—
“तुम्हाला पुन्हा आयुष्य जगण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल?”
ते काही क्षण विचारात पडले.
आणि मग खोल उसासा टाकून म्हणाले—
“मी ती व्यक्ती व्हायला आवडलं असतं, जी मी होऊ शकलो असतो... पण कधी झालोच नाही.”
या एका वाक्यात कितीतरी न जगलेल्या आयुष्यांची वेदना दडलेली आहे.
आपल्यापैकी किती जणांच्या मनात असंच एखादं आयुष्य लपलेलं असतं?
एखाद्याला चित्रकार व्हायचं होतं.
एखाद्याला शिक्षक.
कुणाला पुस्तक लिहायचं होतं.
कुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता.
कुणाला समाजासाठी काही करायचं होतं.
पण आपण स्वतःलाच सांगत राहिलो—
“कधीतरी...”
आणि आयुष्यातील सर्वात धोकादायक शब्द कदाचित हाच आहे—कधीतरी!
मग करायचं काय?
माझ्या आयुष्याला अधिक अर्थ कसा मिळेल?
माझ्या कामातून कायमस्वरूपी काही योगदान कसं देता येईल?
आणि आयुष्य इतकं गुंतागुंतीचं न ठेवता, हा प्रवास संपण्याआधी त्याचा आनंद कसा घेता येईल?
या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एका गोष्टीपासून सुरू होतं—
तुमचा ‘कॉलिंग’ शोधा.
‘कॉलिंग’ म्हणजे केवळ करिअर नव्हे.
ज्या कामात तुमची क्षमता, तुमची आवड आणि जगासाठी निर्माण होणारं मूल्य—या तिन्ही गोष्टी एकत्र येतात, ती तुमची दिशा.
प्रत्येक माणसाकडे काही ना काही खास क्षमता असते.कुणाला उत्तम शिकवता येतं. कुणाला माणसं जोडता येतात. कुणी उत्तम लिहितो. कुणी समस्या सोडवतो. कुणी नेतृत्व करतो. तर कुणाच्या केवळ उपस्थितीनेही दुसऱ्याला धीर मिळतो.
प्रश्न एवढाच—
आपण आपल्या त्या गुणांचा पुरेपूर उपयोग करतो आहोत का?
नोकरी सोडण्याची गरज नाही
‘तुमचा कॉलिंग शोधा’ याचा अर्थ उद्या सकाळी राजीनामा द्या आणि हिमालयात निघून जा,असा अजिबात नाही.
तुम्ही करत असलेली नोकरीही तुमच्या जीवनध्येयाचा भाग होऊ शकते.
फक्त त्या कामात ‘तुम्ही’ अधिक उतरायला हवे.
तुम्हाला जे उत्तम जमतं,त्यावर अधिक भर द्या.
तुमच्या कामामुळे दुसऱ्या माणसाला काय फायदा होतो, हे शोधा.
“माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी बदलेल” याची वाट पाहणं बंद करा.
कारण बदल नेहमी दुसऱ्यापासून सुरू होत नाही.
तो आपल्यापासून सुरू होतो.
“जगात जो बदल पाहायचा आहे, त्या बदलाची सुरुवात स्वतःपासून करा.”
आपल्या आयुष्याचा अर्थ सापडण्यासाठी जगाने बदलण्याची वाट पाहण्याची गरज नाही.
आपण बदललो की आपल्या कामाकडे पाहण्याची दृष्टी बदलते.
काम बदलतं.
नाती बदलतात.
प्राधान्यक्रम बदलतात.
आणि हळूहळू—
आयुष्यही बदलतं.
शेवटी प्रश्न तुम्ही किती वर्षं जगलात हा नसतो.
प्रश्न असतो—
त्या वर्षांमध्ये तुम्ही किती ‘जिवंत’ होता?
किती माणसांना तुम्ही उभं केलं?
किती चेहऱ्यांवर हसू आणलं?
किती आयुष्यांमध्ये काहीतरी चांगलं सोडून गेलात?
आणि म्हणून कधीतरी शांतपणे स्वतःला एक प्रश्न विचारा—
“मी या जगात नेमकं कशासाठी आलो आहे?”
उत्तर लगेच मिळेलच असं नाही.
पण त्या उत्तराचा शोध सुरू झाला, तरी आयुष्याची दिशा बदलू शकते.
कारण शेवटी आपल्या समाधीवर किती सुंदर शब्द लिहिले आहेत, यापेक्षा एक गोष्ट अधिक महत्त्वाची—
आपण जिवंत असताना किती माणसांच्या मनावर आपलं नाव लिहिलं गेलं.






