मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा

4 मिनिट वाचन

फाळणीच्या विस्थापनानंतर ५ हजार रुपयांच्या बचतीवर जागतिक स्तरावर शाही एक्स्पोर्ट्सची निर्मिती करणाऱ्या महिला उद्योजक सरला आहुजा यांची प्रेरक गोष्ट.

शेअर करा:
५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा

तुमच्या अंगावरचा एखादा शर्ट, टी-शर्ट किंवा ड्रेस कदाचित तिच्या फॅक्टरीत शिवला गेला असेल.जगभरातल्या दुकानांमध्ये तिच्या कंपनीचे कपडे पोहोचतात. लाखो लोक तिच्या कंपनीत काम करतात. तरी तिचं नाव विचारलं तर बहुतेकांना सांगता येणार नाही.हीच या कथेची गंमत आहे.कारण सरला आहुजा यांना प्रसिद्ध व्हायचं नव्हतं. त्यांना काहीतरी उभं करायचं होतं.

१९४७सालची गोष्ट - देशाची फाळणी झाली आणि सरला आहुजा यांचं कुटुंब सिंधमधून भारतात आलं.आयुष्याची सुरुवातच विस्थापनाच्या धक्क्याने झाली. शिक्षणही फार पुढे जाऊ शकलं नाही.वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांचं लग्न झालं. दहावीपर्यंत शिक्षण झालं आणि त्यानंतर शाळेला रामराम.पण आयुष्याची शाळा अजून बाकी होती.

दिल्लीमध्ये काही वर्षांनी त्यांनी एका गारमेंट कारखान्यात नोकरी धरली. काम काय?
शिवणयंत्रावर बसून कपडे शिवायचे.दिवसभर मशीनचा आवाज. टर्र... टर्र... टर्र...
मात्र त्यांच्या आयुष्यात आणखी दोन जबाबदाऱ्या होत्या. दोन लहान मुलं.
नोकरी आणि मुलं दोन्ही सांभाळणं शक्य न झाल्याने त्यांनी नोकरी सोडली.
बहुतेक महिलांच्या आयुष्याची कथा इथेच संपते पण सरला आहुजा यांच्या आयुष्यात मात्र इथून खरी कथा सुरू झाली.

ते साल होतं १९७४-
सरलाकडे स्वतःची बचत होती—फक्त ५,००० रुपये. ते वगळता मोठं भांडवल नव्हतं. मोठी ऑफिसची जागा नव्हती. बिझनेस स्कूलची पदवी नव्हती. उद्योगक्षेत्रातलं मोठं नेटवर्क नव्हतं. होतं ते फक्त कामाचं ज्ञान आणि काहीतरी स्वतःचं उभं करण्याची जिद्द.
दिल्लीच्या रंजित नगरमध्ये त्यांनी एका छोट्याशा युनिटची सुरुवात केली.
फॅक्टरी तर उभी केली पण कामगार कुठून आणणार?
सरला आहुजा आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांमध्ये गेल्या. ज्या महिलांना इतर कोणी काम देण्यास तयार नव्हतं, त्यांना त्यांनी काम दिलं. त्या काळात हे काही सोपं नव्हतं.अनेक कुटुंबांना घरातील महिलांनी बाहेर जाऊन काम करणं मान्य नव्हतं. शेजाऱ्यांच्या तक्रारी सुरू झाल्या. विरोध झाला. धमक्याही मिळाल्या.पण सरला थांबल्या नाहीत.

ऑर्डर मिळाली की दिवस-रात्र काम. रात्र झाली की कारखाना बंद करण्याऐवजी दिवे सुरू.
आणि त्या स्वतः कामात गुंतलेल्या.१५ महिलांपासून सुरू झालेलं छोटंसं युनिट हळूहळू वाढत गेलं.
आणि मग त्या १५ महिला केवळ कामगार राहिल्या नाहीत. त्या एका कंपनीचा भाग बनल्या.
आज त्या कंपनीचं नाव आहे—Shahi Exports.

पाच हजार रुपयांच्या बचतीपासून सुरू झालेला हा प्रवास आज ५० हून अधिक कारखान्यांपर्यंत पोहोचला आहे. हे कारखाने भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरले आहेत आणि कंपनी दरवर्षी १५ कोटींपेक्षा अधिक कपड्यांची निर्मिती करते.

आज Shahi Exportsमध्ये १.१३ लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात—आणि त्यातील ७० टक्क्यांहून अधिक महिला आहेत.
ज्या समाजाला कधीकाळी महिलांनी घराबाहेर पडून काम करणं मान्य नव्हतं, त्याच महिलांना रोजगाराच्या जगात मोठ्या संख्येने आणण्याचा हा प्रवास होता. Walmart, Target, Gap, Kohl’s, H&M यांसारख्या जागतिक ब्रँड्ससाठी उत्पादन करण्यापर्यंत हा प्रवास पोहोचला.

पण सरला आहुजा यांच्या कथेतील आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. ती म्हणजे महिलांना रोजगार देण्यापलीकडची भूमिका.
२००७ मध्ये Shahi Exportsने Gapच्या PACE कार्यक्रमाचा भारतातील पहिला पायलट प्रकल्प राबवला. या उपक्रमातून महिलांना संवादकौशल्य, निर्णयक्षमता आणि आर्थिक साक्षरता अशा गोष्टींचं प्रशिक्षण देण्यात आलं.म्हणजे केवळ ‘नोकरी’ नव्हे तर सगळ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता.आणि गंमत अशी की एवढं मोठं साम्राज्य उभं करणाऱ्या सरला आहुजा यांचं नाव मात्र आजही सामान्य ग्राहकाला फारसं माहीत नाही.
कदाचित त्यांना त्याची गरजही नाही.

१९७४ मध्ये हातात होते ५,००० रुपये आणि १५ महिला.
आज त्यांच्या उभ्या केलेल्या उद्योगात १.१३ लाखांहून अधिक माणसं काम करतात, ५० पेक्षा जास्त कारखाने उभे आहेत आणि दरवर्षी १५ कोटींपेक्षा अधिक कपड्यांचं उत्पादन होतं.
हा प्रवास केवळ व्यवसायाचा हिशेब नाही. तो एका स्त्रीच्या जिद्दीचा विस्तार आहे.
आणि तिच्या कथेतला सर्वांत सुंदर धडा कदाचित एका वाक्यात सांगता येईल—
प्रसिद्ध होण्याची घाई करू नका.असं काहीतरी उभं करा, ज्याकडे दुर्लक्ष करणं जगाला शक्य होणार नाही.
उद्या तुम्ही कपाट उघडून एखादा शर्ट बाहेर काढाल.
लेबलवर कदाचित सरला आहुजा यांचं नाव नसेल.
पण त्या कपड्याच्या प्रत्येक टाक्यात कुठेतरी एका स्त्रीची गोष्ट शिवलेली असेल—
पाच हजार रुपयांपासून सुरुवात करून लाखो आयुष्यांना कामाची संधी देणाऱ्या सरला आहुजा यांची.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!
विज्ञान

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!

प्रकाशाच्या साहाय्याने मेंदूतील पेशींचे नियंत्रण करणाऱ्या 'ऑप्टोजेनेटिक्स' तंत्रज्ञानाचा शोध आणि २०२६ च्या नोबेल पुरस्काराची रंजक गोष्ट.

६ ऑक्टोबर, २०२६

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!
लाइफस्टाइल

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!

विमान किंवा परवाना नसताना बागेतल्या खुर्चीला ४२ फुगे बांधून १६ हजार फूट आकाशात झेप घेणाऱ्या लॅरी वॉल्टर्सची अजब सत्यकथा.

१३ ऑक्टोबर, २०२६

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!
लाइफस्टाइल

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

१४ ऑक्टोबर, २०२६