जगभरात लोक भारतीयांचा तिरस्कार का करतात? अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १,५०,००० डॉलर्सच्या वर गेले आहे, जे तिथल्या स्थानिक गोऱ्या अमेरिकन नागरिकांच्या सरासरी उत्पन्नापेक्षा तब्बल ५० टक्क्यांनी जास्त आहे. हा आकडा भारतीयांची केवळ प्रगती दाखवत नाही, तर एका जागतिक मत्सराचा पाया रचतोय.
आज सोशल मीडियावर कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा ब्रिटनमधील भारतीयांच्या वागणुकीवर टीका करणारे हजारो व्हिडिओ दिसतात. कुणी कचरा टाकल्याचं सांगतं, तर कुणी गोंधळ घातल्याचं. पण वस्तुस्थिती अशी आहे की, हा राग शिस्तीपेक्षा जास्त 'आर्थिक असुरक्षिततेतून' येतोय. जेव्हा एखादा बाहेरून आलेला माणूस तुमच्या देशात येऊन तुमच्यापेक्षा महागडं घर घेतो आणि तुमच्या कंपन्यांचा CEO बनतो, तेव्हा स्थानिक लोकांच्या अहंकाराला ठेच लागते.खरं सांगायचं तर, भारतीयांचा तिरस्कार करण्यामागे 'नागरी शिस्त' किंवा 'स्वच्छता' हे केवळ वरवरचे बहाणे आहेत.खरी मेख वेगळीच आहे. जगभरात जिथे जिथे भारतीय गेले, तिथे त्यांनी तिथल्या स्थानिकांपेक्षा जास्त संपत्ती कमावली. हेच या रागाचं मूळ कारण आहे.
इतिहासाची पानं उलटली तर हेच चित्र पुन्हा पुन्हा दिसतं. १९७२ मध्ये युगांडाचा हुकूमशहा ईदी अमीन याने ९० दिवसांच्या आत सर्व भारतीयांना देश सोडायला सांगितलं होतं. त्याचं कारण भारतीयांकडे नागरी शिस्त नव्हती हे नव्हतं. कारण हे होतं की, युगांडाच्या अर्थव्यवस्थेवर भारतीयांची पकड होती. तिथले बँका, कारखाने आणि व्यापार भारतीयांच्या हातात होता.
बर्मामध्येही (म्यानमार) हेच घडलं. १९३० च्या दशकात भारतीयांनी तिथल्या जमिनी आणि व्यवसाय आपल्या कष्टाने ताब्यात घेतले होते. स्थानिकांना वाटलं की हे लोक आमचा घास हिरावून घेतायत. परिणामी, दंगली झाल्या आणि भारतीयांना हाकलून देण्यात आलं. कॅरिबियन बेटांवरही जेव्हा भारतीय मजूर म्हणून गेले आणि नंतर तिथले जमीनदार बनले, तेव्हा असाच द्वेष पसरला होता.
आज हेच चक्र अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये फिरतंय. आकडेवारी सांगते की, अमेरिकेतील टॉप ५०० कंपन्यांपैकी अनेक कंपन्यांचे नेतृत्व भारतीय करत आहेत. ब्रिटनचे माजी पंतप्रधान भारतीय वंशाचे होते. ऑस्ट्रेलियात भारतीय समुदाय रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक करतोय. स्थानिक तरुणांना ज्या नोकऱ्या मिळत नाहीत, तिथे भारतीय तरुण आपल्या टॅलेंटच्या जोरावर बाजी मारतायत.
यामागचं कारण भारतीयांची 'सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट' आहे. आपण शून्यातून विश्व निर्माण करायला घाबरत नाही. पण हीच जिद्द समोरच्याला भीतीदायक वाटते. आपल्याकडे एक म्हण आहे, 'पिकतं तिथे विकत नाही', पण भारतीयांच्या बाबतीत 'जिथे जातात तिथे सोनं करतात' असं झालंय. आणि हेच सोनं जगाच्या डोळ्यात खुपतंय.
अनिवासी भारतीयांनी नागरी शिस्तीचे मुद्दे नक्कीच सुधारले पाहिजेत, त्यात दुमत नाही. पण म्हणून भारतीयांना टार्गेट करणं हे केवळ शिस्तीपुरतं मर्यादित नाही. हा एक प्रकारचा आर्थिक वर्णद्वेष आहे. आपण श्रीमंत होतोय, आपण प्रबळ होतोय आणि हीच गोष्ट जगाला पचवणं जड जातंय.
एकेकाळी आपण मजूर म्हणून जगभर गेलो होतो, आज आपण मालक म्हणून तिथे उभे आहोत. हा प्रवास अनेकांना सहन होत नाहीये. मग प्रश्न असा उरतो की, आपण आपली प्रगती थांबवायची की जगाने आपला मत्सर करणं थांबवायला हवं?






