फॅशनच्या जगाने ज्याला 'स्टाईलचा अपमान' म्हणून हिणवलं,त्याच प्लास्टिकच्या छिद्र असलेल्या बुटांनी आज २.३ अब्ज डॉलर्सची बाजारपेठ काबीज केली आहे. एकीकडे नाईकी आणि आदिदासचे चकचकीत, देखणे शूज होते, तर दुसरीकडे 'बेडब' दिसणारे क्रॉक्स. या विरोधाभासातूनच एका अशा साम्राज्याचा जन्म झाला, ज्याने 'कुरूप' असण्यालाच आपला ब्रँड बनवलं.
२००२ मध्ये तीन उद्योजकांनी जेव्हा फेस रेझिनपासून बनवलेला हा बूट बाजारात आणला, तेव्हा त्यावर टीकेचा वर्षाव झाला. 'टाईम' मॅगझिनने तर याला जगातील सर्वात वाईट प्रॉडक्ट ठरवलं होतं. दिसायला एखाद्या प्लास्टिकच्या बोटीसारखा आणि अंगावर छिद्र असलेला हा बूट कोणाला आवडेल, असा प्रश्न सर्वांना पडला होता.पण क्रॉक्सने फॅशनपेक्षा आरामाला (Comfort) जास्त महत्त्व दिलं. सुरुवातीला हे बूट फक्त नर्सेस, शेफ आणि बागेत काम करणाऱ्या लोकांसाठी होते.दिवसभर उभं राहून काम करणाऱ्या या वर्गाला क्रॉक्सचा हलकेपणा आणि आराम भावला. टीका होत असतानाही विक्रीचा आलेख हळूहळू वर चढू लागला.
पण २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीने क्रॉक्सला जमिनीवर आणलं.कंपनीने गरजेपेक्षा जास्त विस्तार केला होता आणि इन्व्हेंटरी साचून राहिली होती.त्या एका वर्षात कंपनीला १८५ दशलक्ष डॉलर्सचा तोटा झाला. गुंतवणूकदार घाबरले होते आणि विश्लेषकांनी क्रॉक्सचा 'गेम ओव्हर' झाल्याचं जाहीर केलं होतं.
अशा वेळी कोणताही सामान्य ब्रँड काय करेल? तो आपलं डिझाइन बदलेल, बुटांना अधिक 'सुंदर' करण्याचा प्रयत्न करेल. पण क्रॉक्सने याच्या अगदी उलट केलं. त्यांनी आपला 'कुरूपपणा' बदलण्याऐवजी तो अधिक ठळक केला. त्यांनी 'जिबिट्स' (Jibbitz) नावाचे छोटे चार्म्स आणले, जे बुटांच्या छिद्रांमध्ये बसवता येत होते. ग्राहकांना आपले 'बेढब' बूट स्वतःच्या आवडीनुसार सजवण्याची संधी मिळाली.
क्रॉक्सने स्वतःच्या वेगळेपणाला शस्त्र बनवलं होतं. २०१७ नंतर चित्र पूर्णपणे बदललं. 'जेन झी' (Gen Z) पिढीला या बुटांमधील 'आयरोनी' आवडली. जे दिसायला खराब आहे, तेच कूल आहे, अशी एक नवी लाट आली. क्रॉक्सने पोस्ट मॅलोन, जस्टिन बीबर आणि अगदी केएफसी (KFC) सारख्या ब्रँड्ससोबत कोलाबोरेशन केलं.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बालेन्सियागा (Balenciaga) सारख्या लक्झरी ब्रँडने क्रॉक्ससोबत मिळून १,००० डॉलर्सचे प्लॅटफॉर्म क्रॉक्स लाँच केले. हाय-फॅशनच्या जगात हे बूट व्हायरल झाले. २०१९ पर्यंत कंपनीचा महसूल १ अब्ज डॉलर्सवर पोहोचला. त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीने क्रॉक्सला 'वर्क फ्रॉम होम'चा अनधिकृत गणवेश बनवून टाकलं.
२०२१ मध्ये क्रॉक्सचा महसूल २.३ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आणि त्यांच्या शेअरची किंमत ८ डॉलर्सवरून थेट १४० डॉलर्सच्या पार गेली. आज मुंबईच्या रस्त्यांपासून ते न्यूयॉर्कच्या रॅम्पपर्यंत क्रॉक्स दिसतात. ज्या छिद्रांमुळे त्यांची थट्टा उडवली गेली, तीच छिद्रं आज त्यांच्या यशाचं प्रतीक बनली आहेत.
क्रॉक्सचा हा प्रवास आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो. जेव्हा जग तुमच्यातल्या वेगळेपणाची थट्टा करतं, तेव्हा तो वेगळेपणा लपवू नका. उलट, त्यालाच तुमची ओळख बनवा. तुमची 'कमतरता' हेच तुमचं सर्वात मोठं मार्केटिंग टूल ठरू शकतं.तुमच्या कपाटातही असा एखादा 'कुरूप' पण आरामदायी क्रॉक्सचा जोडा आहे का?






