गुर्मी आणि माज असलेल्या लोकांचा धंदा कसा बुडतो याचं उदाहरण म्हणजे अँड्र्यू मेसन आणि त्याच्या ग्रुपॉन कंपनीची कहाणी !!
ग्रुपॉन ही अमेरिकेतील एक ऑनलाइन डील्स आणि डिस्काउंट कूपन देणारी कंपनी आहे.लोकांना रेस्टॉरंट्स, स्पा, पर्यटन, फिटनेस, मनोरंजन आणि इतर स्थानिक सेवांवर ५०% ते ९०% पर्यंत सवलत मिळवून देणे हा या कंपनीचा मुख्य व्यवसाय होता. अँड्र्यू मेसनने २००८ मध्ये ग्रुपॉन या स्टार्टअपची स्थापना केली."एकत्रित ग्राहकांना मोठी सवलत" ही संकल्पनेतून ग्रुपॉनचा जन्म झाला.२००८ मधील जागतिक आर्थिक मंदीच्या काळात लोक स्वस्त पर्याय शोधत होते आणि स्थानिक व्यवसायांना ग्राहकांची गरज होती. त्यामुळे ग्रुपॉनची संकल्पना प्रचंड यशस्वी ठरली.
२०१० साली गुगलने अँड्र्यू मेसनला ६ अब्ज डॉलर्सची ऑफर दिली, पण त्याने ती धुडकावली.वॉल स्ट्रीटच्या दिग्गजांनी जेव्हा मेसनला विचारलं की तू एवढे पैसे का नाकारलेस? तेव्हा त्याने उत्तर दिलं होतं, "कारण आमची कंपनी जगातली सर्वोत्कृष्ट कंपनी आहे." हा आत्मविश्वास होता की अतिशहाणपणा, हे पुढच्या तीन वर्षांत जगाने पाहिलं.२०१३ मध्ये कंपनीचे शेअर्स ७५ टक्क्यांनी कोसळले आणि अँड्र्यू मेसनला बोर्डाने बाहेरचा रस्ता दाखवला.नुकत्याच झालेल्या एका बिझनेस कॉन्फरन्समध्ये मेसनच्या त्या निर्णयाचा उल्लेख 'सिलिकॉन व्हॅलीतील सर्वात महागडी चूक' म्हणून करण्यात आला.
२०११ मध्ये ग्रुपऑनचा आयपीओ (IPO) आला तेव्हा कंपनीचं व्हॅल्युएशन १३ अब्ज डॉलर्सवर पोहोचलं होतं. शेअर २० डॉलर्सवर उघडला आणि बघता बघता २८ डॉलर्सवर गेला.मेसन एका रात्रीत अब्जाधीश झाला. ग्रुपऑनच्या ऑफिसात रोज पार्ट्या सुरू झाल्या.त्यावेळी ग्रुपऑनचा वाढीचा वेग वर्षाला २२८ टक्के इतका होता. फेसबुक, गुगल आणि ॲमेझॉन या तिघांच्या एकत्रित वेगापेक्षाही ग्रुपऑन वेगाने वाढत होती. पण या यशाच्या झगमगाटात एक गंभीर आजार लपलेला होता, ज्याकडे मेसनने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं.
ग्रुपऑनचे बिझनेस मॉडेल ५० टक्क्यांच्या डिस्काउंट कुपन्सवर आधारित होते.यात तीन मुख्य समस्या होत्या.पहिली म्हणजे, ही कल्पना कॉपी करणं खूप सोपं होतं.दुसरी गोष्ट म्हणजे, कुपन घेऊन डिस्काउंट घेतला की ग्राहक पुन्हा त्याच दुकानात कधीच फिरकत नसे. ग्राहक फक्त स्वस्तात मिळतंय म्हणून येत होते, कंपनीशी नातं जोडायला नाही. तिसरी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे नफ्याचा खोटा आकडा. मेसनने 'ACSOI' नावाचं एक वेगळंच गणित मांडलं होतं, ज्यात मार्केटिंगचा अवाढव्य खर्च नफ्यातून वजाच केला जात नसे.अमेरिकेच्या शेअर बाजार नियामक संस्थेने (SEC) यावर आक्षेप घेतला, पण मेसनने तो अहंकारात फेटाळून लावला.
फेब्रुवारी २०१२ मध्ये जेव्हा कंपनीने मोठा तोटा जाहीर केला, तेव्हा गुंतवणूकदारांचे पाय जमिनीवर आले. शेअरचा भाव थेट २.६० डॉलर्सवर कोसळला.गुंतवणूकदारांनी मेसनला जाब विचारला की तुम्ही खोटं बोललात का? फेब्रुवारी २०१३ मध्ये अँड्र्यू मेसनला त्याच्याच कंपनीतून काढून टाकण्यात आले. सांगायचं असं की भक्कम पायाशिवाय मिळालेली प्रगती हा एक आभास असतो. नफ्याशिवाय वाढलेला व्यवसाय म्हणजे विनाशाच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे. ६ अब्ज डॉलर्स नाकारण्याचा अहंकार अखेर ७५ टक्क्यांच्या घसरणीत आणि अपमानात रूपांतरित झाला.
अतिवेगाने धावणाऱ्या कोणत्याही स्टार्टअपसाठी मेसनचा हा किस्सा आजही एक धोक्याची घंटा आहे. यशाच्या शिखरावर असताना जमिनीवर पाय असणं किती गरजेचं असतं, हे ग्रुपऑनच्या पडझडीवरून स्पष्ट होतं.






