८६ कोटींच्या गुंतवणूकीचे ३८००० कोटी !
एकेकाळी 'झोमॅटो कंपनी नक्की काय करते हे कोणालाही माहिती नव्हतं.ज्यांना झोमॅटो ही 'डिलिव्हरी' कंपनी आहे हे कळलं त्यांनाही या नव्या संकल्पनेचा अर्थ कळला नव्हता. घरपोच सेवा देणारी कंपनी पैसे कमावू शकते यावर कोणाचाही विश्वास नव्हता.थोडक्यात ज्या काळात झोमॅटोचं बिझिनेस मॉडेल हसण्यावारी नेण्याचा विषय होता त्या काळी एका गृहस्थांनी 'झोमॅटो' कंपनीत ८६ कोटी रुपये गुंतवले.हे वर्षं होतं २०१३ ! आज त्या ८६ कोटींचे ३८००० कोटी झाले आहेत !कोण आहेत हे गृहस्थ ? हे आहेत संजीव बिखचंदानी - ज्यांना आज जग ' स्टार्ट-अप'च्या दुनियेचे गॉडफादर म्हणून ओळखते !
ज्यांना संजीव बिखचंदानी यांचे नाव आजही कदाचित अनोळखी असेल त्यांना सध्याची नोकरी कदाचित Naukri.com च्या माध्यमातूनच मिळाली असेल,त्यांचं घर 99acres.com च्या मदतीने विकत घेतलं असेल आणि लग्नही Jeevansathi.com च्या मार्फत जमलं असेल. थोडक्यात आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर ज्या कंपन्यांनी मदत केली त्या सर्व कंपन्यांचे मालक आहेत संजीव बिखचंदानी - अर्थात ही गुंतवणूक त्यांच्या Info Edge च्या माध्यमातून केलेली आहे.
संजीव बिखचंदानी यांना हे यश आयतं ताटात वाढून आलं नाही.अनेक वर्षं सातत्याने केलेल्या मेहेनतीचं हे फळ आहे.अनेक वर्षे फारसं काही घडत नसतानाही आपला प्रयोग सुरू ठेवणाऱ्या माणसाचं हे यश आहे.
संजीव यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आणि १९८९ मध्ये अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून (IIM-A) एमबीए पूर्ण केले. त्यानंतर त्यांना एचएमएम या कंपनीत मार्केटिंगची नोकरी केली. पगार-प्रतिष्ठा- करिअरचा सरळ, सुरक्षित मार्गही होता पण १९९० मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनंतर अनेक वेगवेगळे प्रयोग सुरु झाले.औषधांच्या ट्रेडमार्कची माहिती गोळा करून ती कंपन्यांना उपलब्ध करून देणे, व्यवस्थापन आणि अभियांत्रिकीच्या नव्या पदवीधरांना कंपन्या किती पगार देतात याचे सर्वेक्षण करणे, सल्लागार स्वरूपाची कामे करणे—असे अनेक प्रयत्न सुरू होते. व्यवसाय सुरु झाला पण मोठं यश मात्र हाती येत नव्हते.
सगळ्याच नव्या व्यावसायिकांच्या समोर हे आव्हान असतं तेच संजीव बिखचंदानी यांच्यासमोरही होतं. अजून धंद्याची घडी धड बसली नाही मग घरखर्च भागवायचा कसा ? त्यांची पत्नी सुरभी हा काळात आधाराचा खांब होता.त्या स्वतः नोकरी करत होत्या.घरखर्चाचा मोठा आधार त्यांच्या पगाराचा होता.सुरभी यांच्या उत्पन्नामुळे कठीण काळात संसाराचा गाडा चालू राहिला. हा मुद्दा केवळ भावनिक नाही;तो उद्योजकतेच्या अर्थशास्त्राचा गाभा आहे.
एक निरीक्षण, ज्याने व्यवसायाची दिशा बदलली !
संजीव यांना नोकरीविषयक संकेतस्थळाची कल्पना सुचली ती एखाद्या महागड्या संशोधनातून नाही. ती आली एका साध्या निरीक्षणातून.
ते पूर्वी काम करत असताना सहकारी Business Indiaसारख्या व्यावसायिक नियतकालिकांची पाने उलटताना दिसत. पण त्यांचे खरे लक्ष लेखांपेक्षा शेवटच्या पानांवरील नोकरीच्या जाहिरातींकडे असे. लोकांना नोकरी हवी होती; कंपन्यांना योग्य उमेदवार हवे होते. तरीही नोकरीच्या जाहिराती शोधण्यासाठी एकाच ठिकाणी जाण्याची सोय नव्हती.
संजीव यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला—या विखुरलेल्या जाहिराती एकाच ठिकाणी आणल्या तर?
२ एप्रिल १९९७ रोजी Naukri.com सुरू झाले. सुरुवातीला विविध नियतकालिकांतील सुमारे एक हजार नोकरीच्या जाहिराती एकत्र करून संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या. सुरुवातीचे काही महिने जाहिराती विनामूल्य होत्या. नंतर पुण्यातल्या एका कंपनीनं जाहिराती देण्याची तयारी दाखवली. त्या पहिल्या ग्राहकाकडून मिळालेला प्रतिसाद म्हणजे कल्पनेला बाजारपेठ मिळू शकते, याचा प्रत्यक्ष पुरावा होता.
Naukri.com सुरू झाले तेव्हा संजीव यांच्याकडे आजच्या स्टार्टअप्सना सहज उपलब्ध होणारे मोठे कार्यालय,मार्केटींगचं कोट्यवधींचे बजेट किंवा मोठ्या गुंतवणूकदारांचा पाठिंबा नव्हता. वापरलेले कॉम्प्युटर आणि साधे कार्यालय, खर्चावर नियंत्रण आणि उत्पन्न मिळवण्याचे नवनवे मार्ग—हीच त्यांची शस्त्रे होती. घरखर्चासाठी पत्नीच्या पगाराचा आधार होता. काही अतिरिक्त वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी त्यांनी व्यवस्थापन संस्थांमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून शिकवण्याचे कामही केले.
या प्रवासात एक महत्त्वाचा बदल घडला. नोकरीच्या जाहिरातींचे संकलन करणारी वेबसाइट आता भरती प्रक्रियेसाठी कंपन्यांना उपयोगी पडणारे व्यासपीठ बनत होती. नोकरीच्या जाहिराती, उमेदवारांची माहिती आणि भरतीसाठी लागणाऱ्या सेवा यांतून व्यवसायाचा पाया मजबूत झाला. पण त्यांना इथंच थांबायचं नव्हतं.एका व्यवसायाने यश मिळवले म्हणून त्याच्यावर विसंबून राहण्याऐवजी Info Edge ने इतर क्षेत्रांतही पाऊल टाकले.
आधी Naukri.com आलं -त्यानंतर एक मालिकाच सुरु झाली असं म्हणायला हरकत नाही.
Naukri.com मुळे नोकरी मिळाल्यावर पुढचं टार्गेट असतं लग्न -
त्यासाठी आलं Jeevansathi.com -
नोकरी मिळाली - लग्न झालं. हवी आहे रहायला एक जागा -त्यासाठी आलं 99acres.com
नंतरच्या काही वर्षात मुलांच्या शिक्षणासाठी काही तरी आधार हवाच होता
म्हणून पुढची पायरी होती Shiksha.com
हे सगळं या क्रमात सांगण्याचा उद्देश असा की संजीव बिखचंदानी यांनी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक कंपनी उभी केली.
हे सगळं घडत असताना संजीव बिखचंदानी यांनी 'स्टार्टअप' या संकल्पनेची ताकद ओळखली होतीच. त्यांच्या इन्फोएज कंपनीच्या माध्यमातून अनेक 'स्टार्टअप' कंपन्या 'बालकावस्थेत' असताना त्यात गुंतवणूक करायला सुरुवात केली. त्या गुंतवणूकीच्या यशाचे दोन नमुने म्हणजे Zomato आणि Policy Bazaar .झोमॅटोत त्यांनी केलेल्या गुंतवणूकीचा आकडा या लेखाच्या सुरुवातीलाच दिला आहे.
आपण काय करावं बरं ? असा प्रश्न तुमच्या मनात उभा असेल तर आम्ही एकच सांगू : संजीव बिखचंदानी यांच्यासारखा विचार करायला शिका ,यश तुमची वाट बघतंच असेल !








