मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

चित्रकाराने कल्पनेतून काढलं चित्र आणि वर्षभरानंतर तीच तरुणी समोर आली!

4 मिनिट वाचन

एखाद्या कलाकाराने आपल्या कल्पनेतील स्त्रीचं चित्र काढावं आणि वर्षभरानंतर तीच स्त्री अचानक त्याच्या प्रदर्शनात येऊन उभी राहावी, हा एखाद्या चित्रपटाचा प्रसंग वाटेल. पण इराणमधील अहद सादी आणि परिसा करमनेझाद यांची प्रेमकहाणी अशीच काहीशी आहे.

शेअर करा:
चित्रकाराने कल्पनेतून काढलं चित्र आणि वर्षभरानंतर तीच तरुणी समोर आली!

काही प्रेमकहाण्या पहिल्या नजरेत सुरू होतात. तर काही पहिल्या भेटीत. पण ही कहाणी सुरू झाली ती एका चित्रातून... आणि पूर्ण झाली दोन माणसांच्या सहजीवनात! कधी कधी चित्रकार चित्र रंगवत नसतो, तर नियतीच त्याच्या हातून एखादं भविष्य रेखाटून घेत असते!

एखाद्या कलाकाराने आपल्या कल्पनेतील स्त्रीचं चित्र काढावं आणि वर्षभरानंतर तीच स्त्री अचानक त्याच्या प्रदर्शनात येऊन उभी राहावी, हा एखाद्या चित्रपटाचा प्रसंग वाटेल. पण इराणमधील अहद सादी आणि परिसा करमनेझाद यांची प्रेमकहाणी अशीच काहीशी आहे.

इराणमधील अहद सादी या चित्रकाराच्या आयुष्यात असाच एक विलक्षण प्रसंग घडला.

२००८ साल. अहदसादी हा इराणमधला एक प्रयोगशील चित्रकार. त्यानी 'अझरनेगारी' (Azarnegari) नावाची एक आगळीवेगळी कलाशैली विकसित केली होती. या शैलीत रंग, कुंचला किंवा पारंपरिक चित्रकलेची साधनं वापरली जात नाहीत.त्याऐवजी कापडाचे छोटे तुकडे, जाळून -पेटवून उष्णतेच्या साहाय्याने एकमेकांशी जोडून त्यातून चित्र साकारलं जातं. आग आणि कापड यांच्या साहाय्याने रंग, पोत आणि आकार यांचा अनोखा खेळ घडवणारी ही कला आहे.

एक दिवस सादीनं आपल्या कल्पनाशक्तीला पूर्ण मोकळीक दिली. त्याच्या मनात एका स्त्रीची प्रतिमा होती. ती कशी दिसत असेल, तिच्या चेहऱ्यावरचे भाव कसे असतील, तिचं व्यक्तिमत्त्व कसं असेल, याची एक अस्पष्ट पण सुंदर कल्पना त्यांच्या मनात आकार घेत होती.

त्यानी त्या कल्पनेला चित्ररूप देण्याचं ठरवलं.

अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर त्यानी एका तरुणीचं चित्र साकारलं. ते चित्र त्यांच्या कल्पनेतील स्वप्नसुंदरीचं होतं.प्रत्यक्षात अशी कोणती स्त्री त्याच्या आयुष्यात नव्हती. ओळख नव्हती,नाव माहीत नव्हतं. पण तिचा चेहरा मात्र त्यांनी आपल्या कल्पनेतून घडवला होता.

हे चित्र पूर्ण झाल्यानंतर त्याच्या आईने ते पाहिलं. चित्रातील तरुणीकडे पाहून त्या हसल्या आणि मुलाला आशीर्वाद देत म्हणाल्या, 'एक दिवस हीच तुझी पत्नी होवो!'

आईच्या या शब्दांकडे सादीनी कितपत गांभीर्याने पाहिलं असेल, माहीत नाही. पण त्या चित्राने त्याच्या आयुष्यात एक वेगळंच स्थान मिळवलं होतं.

वर्षभरानंतर, म्हणजे २००९ मध्ये, सादीनी इराणमधील तब्रीझ शहरात हुनर-मुकद्दस गॅलरीमध्ये आपल्या चित्रांचं प्रदर्शन भरवलं. त्यात या स्वप्नसुंदरीचं चित्रही होतं.

प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांमध्ये परिसा करमनेझाद नावाची एक तरुणी होती. ती ग्राफिक डिझायनर आणि स्वतःही कलाकार होती. ती प्रदर्शनातील चित्रं पाहत पुढे जात होती. अचानक एका चित्रासमोर तिची पावलं थबकली.

भिंतीवर लावलेल्या त्या चित्रातली तरुणी तिच्यासारखीच दिसत होती!

केवळ चेहऱ्याची ठेवण नव्हे, तर डोळे, नाक, चेहऱ्यावरील भाव आणि एकंदर व्यक्तिमत्त्वही विलक्षण जुळणारं होतं. विशेष म्हणजे, हे चित्र सादीनी तिला प्रत्यक्ष भेटण्याच्या आधीच, जवळजवळ वर्षभरापूर्वी काढलं होतं.

परिसाला हा योगायोग पाहून आश्चर्याचा धक्का बसला.जणू कोणीतरी तिचं व्यक्तिचित्र तिच्या जन्माआधीच काढून ठेवलं होतं!

त्या प्रदर्शनात अहद आणि परिसा यांची भेट झाली. काही बोलणंही झालं. मात्र त्यांनी एकमेकांचे संपर्क क्रमांक घेतले नाहीत. प्रदर्शन संपलं आणि दोघांचे रस्ते पुन्हा वेगळे झाले.

पुढचे अठरा महिने दोघांचाही एकमेकांशी संपर्क नव्हता. आयुष्यात असे काही क्षण येतात, जे त्या वेळी महत्त्वाचे वाटत नाहीत; पण काळ पुढे गेल्यावर त्यांचं महत्त्व उमगतं. अहद आणि परिसा यांच्यासाठीही हा तसाच काळ होता.

अखेर एक दिवस सोशल मीडियावर अहद यांना परिसाचं प्रोफाइल सापडलं. प्रदर्शनातील ती अनोखी भेट त्यांच्या लक्षात होतीच. त्यांनी तिला संपर्क साधला. त्यानंतर दोघांनी भेटायचं ठरवलं.

यावेळी भेट झाली ती एका कॅफेमध्ये.

समोर बसलेल्या परिसाकडे पाहताना अहद यांच्या मनात कदाचित त्या जुन्या चित्राची आठवण पुन्हा जागी झाली असावी. ज्या स्त्रीची प्रतिमा त्यांनी आपल्या कल्पनेतून साकारली होती, तीच आज त्यांच्या समोर प्रत्यक्ष बसली होती.

या भेटीत अहद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि थेट लग्नाचा प्रस्ताव ठेवला. परिसाला हा प्रस्ताव अनपेक्षित होता. तिने तात्काळ उत्तर दिलं नाही. मात्र दुसऱ्या दिवशी तिने अहद यांना फोन केला आणि होकार कळवला.

पुढे दोघांनी विवाह केला. ज्या चित्राने त्यांच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण दिलं, ते मूळ चित्र आजही त्यांच्या घरात जपून ठेवलं आहे.

या कहाणीतील सर्वांत सुंदर गोष्ट कोणती? अहद यांनी परिसाला भेटण्यापूर्वी तिचं चित्र काढलं होतं, हा योगायोग? की त्या चित्राच्या निमित्ताने सुरू झालेल्या ओळखीचं रूपांतर आयुष्यभराच्या सहजीवनात झालं, ही गोष्ट?

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलएव्हरेस्ट म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी? जुन्को ताबेई यांनी मोडीत काढलेला तो अहंकार!जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला जुन्को ताबेई यांचा जिद्दीचा आणि संघर्षाचा प्रेरणादायी प्रवास.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

४४४ दिवस ५२ अमेरिकन नागरिक इराणच्या कैदेत: अमेरिकेच्या अगतिकतेची गोष्ट
राजकारण

४४४ दिवस ५२ अमेरिकन नागरिक इराणच्या कैदेत: अमेरिकेच्या अगतिकतेची गोष्ट

४ नोव्हेंबर १९७९ रोजी इराणमध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला झाला आणि ५२ नागरिकांना ४४४ दिवस ओलीस ठेवण्यात आले. जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेला आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तब्बल १४ महिने वाट पाहावी लागली. या थरारक संघर्षाची आणि अमेरिकेच्या अगतिकतेची ही गोष्ट.

४ नोव्हेंबर, २०२६

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट
लाइफस्टाइल

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट

बोलण्याने हत्ती मिळवता येतो आणि बोलण्यानेच हत्ती गमावताही येतो. अवधच्या नवाबांच्या काळातली, बोलण्याच्या कलेची ताकद सांगणारी एक सुरेख गोष्ट.

२ नोव्हेंबर, २०२६

सृजनमित्र २०२६: बोभाटाचा दिवाळी अंक. यंत्रांनी लिहिलेला मराठी अंक. ते चांगलं लिहू शकतं का?
लाइफस्टाइल

'माणूस खोटं बोलतो, मीटर बोलत नाही' हे वाक्य माणसाने लिहिलेलंच नाही!

बोभाटाच्या दिवाळी अंकातल्या २१ रचना पाच यंत्रांनी लिहिल्या आहेत. जमलंय की नाही, ते तुम्ही ठरवायचं.

५ नोव्हेंबर, २०२६

विक्षिप्त आणि विद्वान प्र.बा. जोग: ज्यांनी स्मशानात जाऊन 'ते' काम केलं!
लाइफस्टाइल

विक्षिप्त आणि विद्वान प्र.बा. जोग: ज्यांनी स्मशानात जाऊन 'ते' काम केलं!

विक्षिप्त आणि विद्वान या दोन शब्दात 'कहर' नावाचा आणखी एक शब्द टाकला की एकच नाव समोर येतं ते म्हणजे प्र.बा. जोग यांचं! यांच्या हुशारीचे आणि विक्षिप्तपणाचे किस्से एकत्र केले तर एक पाचशे पानाचं पुस्तक होईल.

३ नोव्हेंबर, २०२६