विक्षिप्त आणि विद्वान या दोन शब्दांत वर्णन करता येईल अशी अनेक व्यक्तिमत्वं महाराष्ट्रात एकाच शहरात बहुसंख्येने आढळतात.अर्थात या शहराचं नाव पुणे आहे हे आम्ही सांगायलाच हवं असं नाही. तर या विक्षिप्त आणि विद्वान या दोन शब्दात 'कहर' नावाचा आणखी एक शब्द टाकला की एकच नाव समोर येतं ते म्हणजे प्र.बा. जोग यांचं ! यांच्या हुशारीचे आणि विक्षिप्तपणाचे किस्से एकत्र केले तर एक पाचशे पानाचं पुस्तक होईल.
एक नमुना बघा ! हे गृहस्थ व्यवसायाने वकील होते. एक दिवस त्यांनी आपल्या बंगल्याचं नाव बदललं. नवं नाव होतं 'मोरारजी कृपा'.मोरारजी देसाईंनी 'दारुबंदी'चा कायदा आणल्यावर जोगांकडे येणाऱ्या खटल्यांची संख्या जोरात वाढली आणि त्यामुळे उत्पन्नही ! म्हणून बंगल्याचं नाव मोरारजी कृपा !
प्र.बा. जोग त्यांच्या विद्वत्तेच्या जोरावर ते पुणे शहराचे उपमहापौर झाले.त्या काळात त्यांच्या व्याख्यानात ते जे काही म्हणाले त्त्यापासून आजही मराठी तरुणांनी प्रेरणा घ्यावी !
"कोण म्हणतो या देशात बेकारी आहे. भरपूर कामं आहेत.काम करायची युवकांची तयारी हवी.मी घरावर बोर्ड लावला होता येथे कोणतेही काम करून मिळेल.एक दिवस फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य तुळपुळे यांचा निरोप आला.त्यांच्या घरात खूप झुरळं झालेली.ती त्यांना मारून हवी होती.मी हो म्हटलं.त्याचे तीन रुपये पडतील सांगितलं.त्यांच्या घरातल्या कपाटातलं सामान बाहेर काढून औषध फवारून दिलं.अर्धी बादली भरतील इतकी झुरळं मारली.पैसे घेऊन घरी परत"
“एकदा पुण्यात एक मारवाडी स्त्री वारली. अंत्यसंस्कार करण्यासाठी तिचं शव स्मशानात नेलं. सगळे आप्तस्वकीय जमले. दहन करण्यापूर्वी असं लक्षात आलं की ती स्त्री गरोदर असताना मृत झाल्यानं प्रथेप्रमाणे तिचं दहन करता येणार नाही.तिच्या पोटातील मूल बाहेर काढून मग तिचं दहन करावं लागेल.हे काम करणारा एक ठरावीक न्हावी होता.त्याला आणायला काही जण गेले तर कळले की तो मारवाडात गेलाय. मग काही जण गावातल्या डॉक्टरांकडे गेले व ऑपरेशन करून मूल बाहेर काढून द्या म्हणू लागले.डॉक्टरांनी सांगितलं,ते शव घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये या.पण प्रथेनुसार स्मशानात नेलेले प्रेत बाहेर आणता येत नाही.साऱ्यांनाच उशीर व्हायला लागला. तेवढ्यात एकाच्या लक्षात आलं. कोणतेही काम करून मिळेल, असा बोर्ड लावणारे प्र.बा.जोग आहेत.मग मंडळी माझ्याकडे आली.काम ऐकल्यावर मी मनातून चरकलोच.पण तरीही हो म्हटलं. मी डॉक्टर नव्हतो.पण प्रेत फाडूनच मूल बाहेर काढायचं असल्यानं हो म्हटलं.वडील डॉक्टर होते. त्यांची बॅग माळ्यावर चढून शोधून काढली.बॅगेतून धारदार कात्री, सुरी, दाभण, दोरा, सुतळी असं सामान घेऊन डॉक्टरच्या रुबाबात गेलो. स्मशानात सारे वाटच पाहत होते.तिथल्या दोघा लोकांना आडवं धोतर धरायला लावून आडोसा निर्माण केला.मूल बाईच्या पोटात असतं हे माहीत असल्यानं सुरी खूपसून मी पोट कापलं.त्यातल्या रक्तानं हात बुळबुळीत होत होते. सुरी धरणं अवघड होत होतं. जवळच्या राखेत हात घासून कोरडे करून पुन्हा काम सुरू केल. मूल बाहेर काढून दिलं.दाभणीच्या साहाय्यानं पुन्हा पोट शिवून दिलं. तिथं जमलेल्या लोकांची सुटका झाली."माझा आकार मला मिळाला. इतकंच नाही तर तिथं जमलेल्यातल्या एकानं मारवाडी असूनही मला पाच रुपये बक्षिसी दिली"
युवकांनो,हिम्मत असेल तर कामं आहेत.मी बेकार आहे म्हणून रडत बसू नका.








