मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट

4 मिनिट वाचन

बोलण्याने हत्ती मिळवता येतो आणि बोलण्यानेच हत्ती गमावताही येतो. अवधच्या नवाबांच्या काळातली, बोलण्याच्या कलेची ताकद सांगणारी एक सुरेख गोष्ट.

शेअर करा:
गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट

बातही हाथी पाइये, बातही हाथी पाओं!

बोलण्याच्या कलेत किती ताकद असते,एक सुरेख गोष्ट आज वाचूया

अवधी भाषेत एक सुंदर म्हण आहे, 'बातही हाथी पाइये, बातही हाथी पाओं.' म्हणजे बोलण्याने हत्ती मिळवता येतो आणि बोलण्यानेच हत्ती गमावताही येतो.

म्हणजेच माणसाकडे बोलण्याचे कौशल्य असेल, तर केवळ शब्दांच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही साध्य करता येतात.

अवधच्या नवाबांच्या काळातली ही गोष्ट.नवाब आसफ उद्दौला त्यांच्या औदार्यासाठी इतके प्रसिद्ध होते की, त्या काळात लोक म्हणत असत, 'जिसको न दे मौला, उसको दे आसफ उद्दौला!' म्हणजे ज्याला परमेश्वरही काही देत नाही, त्याला आसफ उद्दौला देतात!

नवाबसाहेबांचा एक खास नियम होता.नमाज अदा करून ते बाहेर पडले की, वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक गरजू माणसाला आपल्या परीने काही ना काही मदत करायचे. त्यांच्या या दातृत्वाची चर्चा संपूर्ण राज्यात होती.

त्याच राज्यात एक अत्यंत गरीब वृद्ध स्त्री राहत होती. तिची परिस्थिती इतकी हलाखीची होती की, दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. एके दिवशी काही लोकांनी तिला सुचवले,

"बाई, तू ही एकदा नवाबसाहेबांना भेट. ते कुणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत."

त्या वृद्ध स्त्रीलाही ही कल्पना आवडली.

पण नवाबसाहेबांना भेटायला जायचे म्हणजे काहीतरी नजराणा घेऊन गेले पाहिजे, असा तिचा समज होता.

आता घरात द्यायला होते तरी काय?

बराच विचार केल्यावर तिला घरात पडलेली एक जुनी, गंजलेली, मोडकळीस आलेली तलवार दिसली. तिने तीच स्वच्छ केली आणि नवाबसाहेबांना भेट म्हणून देण्याचे ठरवले.

दुसऱ्या दिवशी नमाज अदा करून नवाबसाहेब बाहेर पडले आणि समोर येताच तिने मोठ्या आदराने ती तलवार त्यांच्या हातात दिली.

नवाबसाहेबांनी तलवारीकडे पाहिले. तिची अवस्था अत्यंत वाईट होती. गंज चढलेला,पात्यावर ठिकठिकाणी डाग आणि मूठही मोडकळीस आलेली. एखाद्या भंगारवाल्यानेही कदाचित ती घेतली नसती!

पण त्या वृद्ध स्त्रीकडे पाहून नवाबसाहेबांनी मन राखले.

ते म्हणाले, "तलवार तर चांगली आहे, पण आता मला हिचे काय करायचे? त्यापेक्षा तूच ती परत घेऊन जा."

त्यावर ती वृद्ध स्त्री मंद हसली आणि म्हणाली,

"नवाबसाहेब, मी तर असे ऐकले होते की,आमच्या नवाब साहेबांचा हात ज्या वस्तूला लागतो, तिचे सोने होते! म्हणूनच ही तलवार तुमच्यासाठी घेऊन आले होते. आता तुम्हीच ती परत देत आहात!"

वृद्ध स्त्रीचे हे उत्तर ऐकून नवाबसाहेबांना तिच्या चातुर्याची कल्पना आली.

तिची मागणी थेट नव्हती, तक्रारही नव्हती आणि मदतीसाठी याचना तर अजिबात नव्हती.

पण आपल्या बोलण्यातून तिने नवाबांच्या औदार्याला एक सुंदर आव्हान दिले होते.

नवाबसाहेब तिच्या हजरजबाबीपणावर खूश झाले. त्यांनी आपल्या कारभाऱ्यांना बोलावले आणि त्या तलवारीच्या वजनाइतके सोने त्या वृद्ध स्त्रीला देण्याचा हुकूम केला.

एका निरुपयोगी, गंजलेल्या तलवारीच्या बदल्यात त्या वृद्ध स्त्रीला सोन्याची प्राप्ती झाली.

तलवारीचे वजन तेवढेच राहिले; पण ती सादर करण्याची पद्धत मात्र सोन्याहून अधिक मौल्यवान ठरली!

या गोष्टीचा मथितार्थ सांगताना कवी वसीम बरेलवी यांचा एक सुंदर शेर आठवतो.

कौन सी बात कहाँ, कैसे कही जाती है,

ये सलीका हो तो हर बात सुनी जाती है।

म्हणजे काय बोलायचे, कुठे बोलायचे आणि कसे बोलायचे,याचे भान असेल तर तुमचे म्हणणे ऐकलेही जाते आणि मान्यही केले जाते.

शब्द हे केवळ संवादाचे माध्यम नसतात. योग्य वेळी, योग्य पद्धतीने वापरलेले शब्द माणसाचे नशीबही बदलू शकतात.

अवधी भाषेतील ती म्हण म्हणूनच फार काही सांगून जाते...

'बातही हाथी पाइये, बातही हाथी पाओं!'

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

टॅग्स:

संबंधित लेख

एव्हरेस्ट म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी? जुन्को ताबेई यांनी मोडीत काढलेला तो अहंकार!
लाइफस्टाइल

एव्हरेस्ट म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी? जुन्को ताबेई यांनी मोडीत काढलेला तो अहंकार!

जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला जुन्को ताबेई यांचा जिद्दीचा आणि संघर्षाचा प्रेरणादायी प्रवास.

१६ मे, २०२६

महाकवी कालिदासाचा गर्वहरण करणारी ती 'म्हातारी'
लाइफस्टाइल

महाकवी कालिदासाचा गर्वहरण करणारी ती 'म्हातारी'

महाकवी कालिदासाचा अहंकार एका साध्या वृद्ध महिलेने चार प्रश्नांत कसा मोडीत काढला? विद्वत्ता आणि अनुभवाची ही एक बोधप्रद कथा.

२२ मार्च, २०२६

खऱ्या छापखान्यात छापल्या 'बनावट' नोटा: पोर्तुगालला हादरवणारा घोटाळा
लाइफस्टाइल

खऱ्या छापखान्यात छापल्या 'बनावट' नोटा: पोर्तुगालला हादरवणारा घोटाळा

नोट खऱ्या सरकारी छापखान्यात, खऱ्या साच्यावर छापलेली असेल, तर ती बनावट कशी ठरणार? जवळपास शंभर वर्षांपूर्वी पोर्तुगालमध्ये एका महाभामट्याने हाच प्रश्न प्रत्यक्षात उतरवला.

२ नोव्हेंबर, २०२६

सोन्याच्या खाणी, तरीही गरीब: बुर्कीना फासो देशाची कहाणी
लाइफस्टाइल

सोन्याच्या खाणी, तरीही गरीब: बुर्कीना फासो देशाची कहाणी

या देशाचे उत्पन्न दोन प्रकारच्या सोन्यावर अवलंबून आहे: खाणीतले सोने आणि कापूस. तरीही ५०% हून अधिक जनता दारिद्र्य रेषेखाली जगते आहे.

३० ऑक्टोबर, २०२६

३८ जणांची हत्या करून मांस खाल्ल्याचा आरोप: युगांडातील भयावह प्रकरण
लाइफस्टाइल

३८ जणांची हत्या करून मांस खाल्ल्याचा आरोप: युगांडातील भयावह प्रकरण

माणूस माणसाला खातो? युगांडात मुजुरिझी मोझेस नावाच्या व्यक्तीवर पंधरा वर्षांत ३८ जणांची हत्या करून त्यांचे मांस खाल्ल्याचा आरोप आहे. हे आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.

३० ऑक्टोबर, २०२६

१६ किलोचे सोन्याचे झुमके; याला झुमका म्हणावं की झुंबर ते तुम्हीच ठरवा!
लाइफस्टाइल

१६ किलोचे सोन्याचे झुमके; याला झुमका म्हणावं की झुंबर ते तुम्हीच ठरवा!

जोयअलुक्कास या भारतीय कंपनीने दुबईत १६ किलोहून अधिक वजनाच्या सोन्याच्या भव्य झुमक्यांची निर्मिती केली आहे. ‘मयूर सहस्र’ असे नाव असलेले हे झुमके २२ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आले आहेत.

२९ ऑक्टोबर, २०२६