एका भामट्याने देशाच्या चलनव्यवस्थेलाच लावला चुना!- इतिहासातील सर्वांत भन्नाट आर्थिक घोटाळ्यांपैकी एक
कल्पना करा, तुम्ही बाजारात जाता. खिशातून पाचशे रुपयांची नोट काढता. दुकानदार ती तपासतो, प्रकाशात धरतो,कागद चाचपतो आणि समाधानाने खिशात ठेवतो.कारण ती नोट खरी असते.पण आता कल्पना करा,ती नोट खऱ्या सरकारी छापखान्यात, खऱ्या छपाईच्या साच्यावर, सरकारी नोटांसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदावर आणि शाईवर छापलेली आहे.मग ती बनावट कशी ठरणार?
हा प्रश्न आजच्या काळातला नाही. जवळपास शंभर वर्षांपूर्वी पोर्तुगालमध्ये एका महाभामट्याने हाच प्रश्न प्रत्यक्षात उतरवला. त्याने नोटा बनवल्या नाहीत; त्याने नोटा छापण्याचा अधिकारच बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवला!
त्याचं नाव होतं आर्तूर आल्विश दोस रॅश (Artur Alves dos Reis). आणि त्याच्या कारनाम्यामुळे पोर्तुगालच्या आर्थिक व्यवस्थेला असा धक्का बसला, की त्याचे पडसाद लंडनमधील न्यायालयाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत उमटले.
एका कागदाने उघडले पैशांचे दार!
रॅशचा जन्म १८९८ मध्ये झाला. त्याच्या आयुष्यात फसवणूक नवी नव्हती. बनावट कागदपत्रांचा वापर करून त्याने आधीही कायद्याला गुंगारा दिला होता. पण यावेळी त्याच्या महत्त्वाकांक्षेचा आकारच वेगळा होता.एखाद्या दुकानदाराला फसवून काही रुपये मिळवण्याऐवजी त्याला संपूर्ण आर्थिक व्यवस्थेच्या विश्वासाचा फायदा घ्यायचा होता.
त्याने पोर्तुगालच्या मध्यवर्ती बँकेच्या नावाने अधिकृत दिसणारी कागदपत्रे तयार केली.त्यावर सरकारी शिक्के,संबंधित अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि गोपनीय सरकारी मोहिमेचा आभास निर्माण करणारा मजकूर होता.
या कागदपत्रांनुसार अंगोलासारख्या आफ्रिकेतील पोर्तुगीज वसाहतीसाठी स्वतंत्रपणे नोटा छापण्याची गरज होती.
आणि त्यासाठी त्याने निवडली लंडनमधील वॉटर्लो ॲंड कंपनीला
पोर्तुगालच्या खऱ्या नोटा छापण्याचे काम याच कंपनीकडे होते.
त्याने बनावट नोटा छापण्याची विनंती केली नव्हती. अधिकृत नोटांच्या छपाईसाठी बनावट परवानगी सादर केली होती.
हा फरक छोटा वाटेल; पण या फरकानेच इतिहास घडवला!
कंपनीतील प्रमुख व्यक्तींना व्यवहार अधिकृत असल्याचा विश्वास बसला.काही संशयास्पद बाबी असूनही छपाईची प्रक्रिया सुरू झाली. पोर्तुगालच्या चलनातील ५०० एस्कुडोच्या नोटा छापण्यात आल्या.त्यावर प्रसिद्ध पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामाचे चित्र होते.
या नोटा बनावट छापखान्यात छापल्या नव्हत्या. त्या खऱ्या छपाईच्या साच्यांवरून तयार झालेल्या ड्युप्लिकेट नोटा होत्या.
पण या नोटा तर अधिकृत कंपनीने छपल्या होत्या तर मग त्याबनावट कशा ?
एकच नंबर, दोन नोटा! प्रत्येक नोटेची एक ओळख असते—तिचा क्रमांक.दोन नोटांना एकच क्रमांक मिळाला, संशय निर्माण होणारच !
रॅशच्या योजनेतील हाच सर्वांत मोठा धोका होता.
त्याने आधीच चलनात असलेल्या नोटांचे क्रमांक पुन्हा वापरण्याची व्यवस्था केली होती.
छापणाऱ्या कंपनीला त्याने सांगितले की या नोटा अंगोलामध्ये वापरण्यासाठी आहेत.
त्यावर नंतर अंगोला असा शिक्का मारला जाईल,त्यामुळे त्या पोर्तुगालमधील मूळ नोटांपासून वेगळ्या ओळखता येतील.
कागदोपत्री युक्तिवाद तयार होता.प्रत्यक्षात मात्र या नोटा पोर्तुगालमध्येच पोहोचल्या.
रॅशने या पैशांचा उपयोग स्वतःची Banco de Angola e Metrópole ही बँक उभी करण्यासाठी केला.त्याच्या आर्थिक व्यवहारांचा आवाका वाढला. त्याने मालमत्ता घेतल्या,व्यवसायांत पैसे गुंतवले आणि पोर्तुगालच्या मध्यवर्ती बँकेचे समभाग मिळवण्याचाही प्रयत्न केला.
हा सगळा प्रकार म्हणजे चोरी केलेल्या पैशातून चोरी उघड करणाऱ्या संस्थेवरच ताबा मिळवण्याचा प्रयत्न होता!
आणि अखेर नोटांवरचे क्रमांक बोलू लागले!
डिसेंबर १९२५. पोर्तुगालमध्ये ५०० एस्कुडोच्या नोटांबाबत संशय निर्माण होऊ लागला.लिस्बन आणि इतर ठिकाणी एकाच क्रमांकाच्या दोन नोटा आढळण्याची समस्या समोर आली.तपास सुरू झाला आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे उभ्या केलेल्या आर्थिक साम्राज्याचा पाया हादरला.
४ डिसेंबरला संशयास्पद आर्थिक व्यवहारांबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. तपास पुढे गेला आणि ५ व ६ डिसेंबरदरम्यान ड्युप्लिकेट नोटांचे पुरावे सापडले. डिसेंबरच्या सुरुवातीला रॅशला अटक झाली.
पण आता प्रश्न केवळ एका गुन्हेगाराला पकडण्याचा नव्हता. पोर्तुगालच्या चलनव्यवस्थेसमोर एक विलक्षण संकट उभे राहिले होते.
खऱ्या नोटा आणि अनधिकृतपणे छापलेल्या त्यांच्या हुबेहूब प्रती यांतील फरक सामान्य माणसाला कसा कळणार?
त्यामुळे बँकेने ५०० एस्कुडोच्या संबंधित प्रकारातील सर्व नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. नागरिकांकडील नोटा बदलून देण्याची प्रक्रिया सुरू झाली.
एका माणसाने बनवलेल्या घोटाळ्याची किंमत अख्ख्या देशाला मोजावी लागली. ज्यांनी नोटा प्रामाणिकपणे मिळवल्या होत्या, त्यांनाही त्या बदलून घ्याव्या लागल्या. चलनाच्या विश्वासार्हतेला धक्का बसला आणि राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली.
गुन्हेगार तुरुंगात; पण कंपनीचे काय?
रॅशला वीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. पण नुकसान भरपाईचे काय ?
पोर्तुगालच्या बँकेने नोटा छापणाऱ्या कंपनीविरुद्ध न्यायालयीन लढा दिला.कंपनीने अधिकृत परवानगीशिवाय नोटा छापून वितरित केल्यामुळे बँकेचे नुकसान झाले, असा दावा करण्यात आला.या खटल्यात नुकसानभरपाईची रक्कम वेगवेगळ्या न्यायालयांत बदलत गेली. अखेरीस १९३२ मध्ये ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायिक स्तरावर असलेल्या House of Lords ने पोर्तुगालच्या बँकेच्या बाजूने निर्णय दिला. कंपनीला £६१०३९२ नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.
आणि इथेच या अद्भुत घोटाळ्याचा खरा धडा दडलेला आहे.
रॅशने अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठी आधुनिक संगणक वापरले नव्हते.त्याला डिजिटल हॅकिंगची गरज नव्हती.त्याने वापरला तो माणसांचा विश्वास, संस्थांची प्रतिष्ठा आणि कागदपत्रांच्या अधिकृततेवर असलेला भरवसा.
पैसा कागदावर छापता येतो; पण त्या कागदाला मूल्य देणारा असतो विश्वास. आणि तोच विश्वास फसवला, तर खऱ्या नोटाही संकट निर्माण करू शकतात.







