सोन्याच्या खाणी असलेला गरीब देश बुर्कीना फासो !
एकेकाळी फ्रेंच अंमलाखाली असलेला हा देश 'अपर व्होल्टा' या नावाने ओळखला जायचा. ब्लॅक व्होल्टा -व्हाइट व्होल्टा -रेड व्होल्टा अशा तीन नद्या या देशातून वाहतात, म्हणून या देशाचे नाव अपर व्होल्टा ठेवण्यात आलं होतं.१९५८ नंतर त्याचं रुपांतर 'रिपब्लिक ऑफ अपर व्होल्टा' मध्ये झालं.१९६० साली स्वातंत्र्य मिळाल्यावरही बरीच वर्षं याच नावाने हा देश ओळखला जायचा.१९८४ साली या देशाचं नाव 'बुर्कीना फासो' ठेवण्यात आलं. त्यावेळी या देशाचे अध्यक्ष थॉमस सनकारा होते. त्यांनी या देशात बोलल्या जाणार्या मूर आणि डिओउला या दोन भाषांमधले शब्द घेऊन बुर्कीना फासो या नावाची निर्मिती केली. बुर्कीना म्हणजे स्वतःसोबत प्रामाणिक आणि फासो म्हणजे आपल्या पित्याची भूमी! म्हणून बुर्कीनो फासो या देशाच्या नावाचा अर्थ 'प्रामाणिक माणसांचा देश' असा समजला जातो.
आफ्रिकेतल्या अनेक देशांत सोन्याच्या खाणी आहेत, बुर्कीना फासो त्यापैकी एक आहे. या देशाचे उत्पन्न एका नाही तर दोन प्रकारच्या सोन्यावर अवलंबून आहे. एक सोने खाणीतले, तर दुसरे सोने म्हणजे कापूस! लांब धागा देणारा उच्च दर्जाचा जीएम बियाणांपासून घेतलेला कापूस या देशातून बाहेर पाठवला जातो. अमेरिकेतला सुप्रसिध्द अंतर्वस्त्रांचा ब्रँड व्हिक्टोरिया सिक्रेट इथल्याच कापसांतून बनवलेल्या तलम सुती कापडाचा वापर करतो. व्हिक्टोरिया सिक्रेटला लागणारे कापड मात्र अमेरिकेत बनत नाही. बुर्कीना फासोचा कापूस आधी भारतात येतो, आलोक इंडस्ट्रीज ही कंपनी (आता रिलायन्स कंपनीचा भाग ) या कापसापासून धागा बनवून कापडाची निर्मिती करते. त्यानंतर त्या कापडापासून अंतर्वस्त्रांची निर्मिती श्रीलंकेत केली जाते आणि विक्रीसाठी अमेरिकेत पोहचते. साहजिकच बुर्कीना फासोच्या पदरात फार मोठा नफा पडतच नाही. या देशात कापूस वेचण्यासाठी बाल कामगारांचा सर्रास वापर केला जातो. याबद्दल व्हिक्टोरिया सिक्रेट कंपनीला टीकेला सामोरे जावे लागले. बाल कामगार ही बुर्कीनासारख्या देशातील अपरिहार्यता आहे असे म्हणावे, तर मग सोन्याच्या खाणींतून आलेला पैसा जातो कुठे?
सत्यता अशी आहे की या देशातून अधिकृतरित्या सोने पाठवले जाते, पण त्यावर वर्चस्व देशाबाहेरच्या कंपन्यांचे आहे .या देशात सोन्याचा सुकाळ आहे, पण अधिकृत खाणींपेक्षा अनधिकृत खाणींची संख्या जास्त आहे.साहजिकच सोन्याच्या तस्करीचे प्रमाण मोठे आहे. या देशाचे अनेक नागरीक 'सूटकेस स्मगलर' आहेत. ही माणसं पकडली जातात.पण आज नाही तर उद्या २५/३० किलो सोन्याची तस्करी यशस्वी झाली तर श्रीमंत होईन या आशेवर ही तस्करी चालत असते. त्याखेरीज संघटीत गुन्हेगारी करणार्या टोळ्या मोठ्या प्रमाणात तस्करी करत असतात. बुर्कीना फासोच्या जवळच्या एका 'टोगो' नावाच्या देशातून शेकडो टन सोने बाहेर पाठवले जाते. पण टोगोत तर सोन्याच्या खाणीच नाहीत. बुर्कीनाचे सोने टोगोतून बाहेर जाते आणि त्याचे पैसे देशाबाहेरच जमा केले जातात. यापेक्षाही घातक बाब अशी आहे की खाणीतले सोने मिळवण्यासाठी अजूनही पार्याचा वापर केला जातो. पार्याच्या वाफेमुळे होणार्या आरोग्याच्या समस्या सोन्याच्या हव्यासासमोर फिक्या ठरल्या आहेत.
सांस्कृतिक वैभव हे या देशाचे आणखी वैशिष्ट्य आहे. या छोट्याशा देशात वेगवेगळ्या ६० वंशाच्या जमाती आहेत. प्रत्येक जमातीचे स्वत:ची ओळख देणारे संगीत आहे. आफ्रिकेतल्या अनेक कलाविष्कारांमध्ये हा देश अग्रेसर आहे. आफ्रिकन हस्तकलेची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे हा देश आहे.आफ्रिका म्हटले की मुखवटे हा प्रकार आलाच! प्रत्येक जमातीचे वैशिष्ट्यपूर्ण मुखवटे हा एक अभ्यासाचा विषय आहे. बोबो जमातीत लाल-काळ्या पांढर्या पट्ट्यांचे फुलपाखरांचे मुखवटे बनवले जातात. मोस्सी या जमातीत अँटीलोपचे मुखवटे असतात. लोबी जमात लाकडाच्या कोरीव कामातून मुखवटे बनवते.
या देशाचे घोड्यावर मोठेच प्रेम आहे. त्यांची राष्ट्रीय निशाणी घोडाच आहे. त्यामुळे त्यांना 'काउबॉइज ऑफ वेस्ट आफ्रिका' असेही म्हणतात. अनेक संरक्षित वने या देशात आहेत. त्यापैकी नाझींगा संरक्षित वनात पश्चिम आफ्रिकेतल्या सर्वात जास्त हत्तीची संख्या आहे. ही संरक्षित वने टुरिस्ट ॲट्रॅक्शन्स समजली जातात. गेल्या पाच वर्षांत वाढत्या हिंसाचारामुळे हा व्यवसायही डबघाईला आला आहे.
इतर आफ्रिकन देशांमध्ये जी समस्या आहे ती या देशातही आहे, ती म्हणजे अस्थिर राजकीय वातावरण! १९८४ साली थॉमस सनकारा या 'आफ्रिकेचा चे गेव्हारा' या टोपण नावाने ओळख्ल्या जाणार्या नेत्याकडे देशाचे नेतृत्व आले. त्याची सत्ता डाव्या बाजूस झुकलेली अत्यंत अल्पजीवी म्हणजे चारच वर्षांची होती.पण या काळात अनेक क्रांतीकारी निर्णय त्याने घेतले. साक्षरता अभियान - जमीन महसूलाचे नवे नियम, रेल्वे मार्गाची बांधणी, विद्युतीकरण, रस्ते बांधणी असे अनेक प्रकल्प मार्गी लावले.बहुपत्नीत्व- महिलांची सुंता अशा जाचक प्रथांवर त्याने बंदी आणली.पण चार वर्षांतच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आणि त्यानंतरच्या अस्थिर वातावरणात सर्व कार्यक्रम बारगळले. परिणामतः आजही देशाच्या शहरी भागात विद्युतीकरण ५६ % आणि ग्रामीण भागात केवळ १% विद्युतीकरण झाले आहे. गेल्या काही वर्षांत कट्टर इस्लामी पंथांचा या देशाच्या राजकारणावर प्रभाव आला आहे. मानवी हक्कांच्या अनेक समस्या आहेत. गेल्या पाच वर्षांत अल कायदा आणि इसीस या कट्टरवादी संघटनांमुळे हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हजारो लोकांची हत्या झाली आहे आणि लाखो लोक देश सोडून बाहेर गेले आहेत.
सध्या या देशात उपासमार -रोगराई- हिंसाचार आणि बेरोजगारी या मोठ्या समस्या आहेत. सोने आणि कापूस वगळता नगदी पीक कोणतेच नाही, त्यामुळे ५०% हून अधिक जनता दारिद्र्य रेषेखाली जगते आहे. शिक्षणाचा प्रसार थांबला आहे. पण आफ्रिकेत हे काहीच नवे नाही. त्यांच्या नशिबात गेली शेकडो वर्षे हेच आहे.








