माणूस माणसाला खातो? हा प्रश्न ऐकतानाच अंगावर काटा येतो. पण मानवजातीच्या इतिहासात याचे उत्तर दुर्दैवाने 'हो' असेच आहे!
काही लाख वर्षांपूर्वीचे आपले पूर्वज आजच्या अर्थाने पूर्ण विकसित माणूस नव्हते. त्यांच्यात आणि इतर प्राण्यांमध्ये फारशी सीमारेषा नव्हती. पुरातत्त्व संशोधनात सापडलेल्या मानवी हाडांवरील दातांच्या खुणा, हाडे फोडल्याचे पुरावे आणि कवट्यांवरील जखमा यावरून प्रागैतिहासिक काळात नरभक्षण होत असल्याचे दिसून आले आहे. निअँडरथल मानवांमध्येही अशा प्रथेचे पुरावे मिळाले आहेत.
पण नरभक्षणामागे नेहमीच भूक हे कारण नव्हते. काही समाजांमध्ये मृत व्यक्तीच्या शरीराचे सेवन हा धार्मिक किंवा अंत्यसंस्कारविधीचा भाग होता. काही ठिकाणी शत्रूच्या शरीराचे मांस खाण्यामागे त्याची शक्ती किंवा सामर्थ्य आत्मसात करण्याची श्रद्धा होती. अर्थात, अशा प्रथा काही विशिष्ट समाजांपुरत्याच मर्यादित होत्या; संपूर्ण प्रदेश किंवा खंडाला त्यासाठी जबाबदार धरणे चुकीचे ठरेल.
नरभक्षणाचा आणखी एक प्रकार म्हणजे जगण्यासाठी केलेले नरभक्षण. १९७२ मध्ये उरुग्वेच्या विमानाचा अँडीज पर्वतरांगांमध्ये अपघात झाला. विमानातील प्रवासी बर्फाच्छादित पर्वतांमध्ये अडकले. अन्न संपले, मदतीची आशा मावळली आणि मृत्यू समोर उभा ठाकला. अखेर जिवंत राहण्यासाठी काही प्रवाशांनी मृत सहकाऱ्यांच्या शरीराचे मांस खाण्याचा निर्णय घेतला. ही घटना माणसाच्या जगण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे आणि परिस्थितीच्या भीषणतेचे उदाहरण ठरली.
पण युगांडातील अलीकडची घटना यापेक्षा कितीतरी वेगळी आणि भयावह आहे.
२६ ऑक्टोबर २०२६ रोजी युगांडाचे लष्करप्रमुख जनरल मुहूझी कैनेरुगाबा यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक घोषणा केली. मुजुरिझी मोझेस (Mujurizi Moses) नावाच्या व्यक्तीला सुरक्षा दलांनी अटक केल्याचे त्यांनी सांगितले.
या व्यक्तीवर २०१० ते २०२५ या पंधरा वर्षांच्या काळात मसाका, इबांडा आणि काझो या जिल्ह्यांमध्ये तब्बल ३८ जणांची हत्या करून त्यांचे मांस खाल्ल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील तपशील ऐकले तर आणखी धक्का बसतो.मोझेस आपल्या साथीदारांच्या मदतीने रात्रीच्या वेळी घरांमध्ये घुसत असे. काही वेळा घराच्या भिंतींना छिद्र पाडून आत प्रवेश केला जाई. त्यानंतर धारदार शस्त्रांनी घरातील माणसांवर हल्ला केला जात असे. एका ख्रिश्चन धर्मगुरुच्या घरावर झालेल्या हल्ल्यात संपूर्ण कुटुंबाची हत्या झाल्याचे वृत्त आहे.
त्याची आणखी एक पद्धत म्हणजे महिलांना प्रेमसंबंधांचे आमिष दाखवून भेटायला बोलावणे. त्यानंतर त्यांची हत्या करून त्यांचे मांस खाल्ल्याचा आरोप आहे.
या व्यक्तीला यापूर्वीही अनेकदा अटक झाल्याचे वृत्त आहे. मात्र, कधी पोलिसांच्या ताब्यातून पळून जाणे, तर कधी संशयास्पद परिस्थितीत सुटका होणे, यामुळे तो पुन्हा मोकाट फिरत राहिला. डेली मॉनिटर या युगांडातील वृत्तपत्राने त्याच्या पूर्वीच्या अटक आणि पलायनांचे तपशील प्रसिद्ध केले आहेत.मात्र, या सगळ्या प्रकरणात एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी. ३८ हत्या आणि नरमांसभक्षणाचे आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.
माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले, समुद्राच्या तळाशी पोहोचला, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर नवनवीन चमत्कार घडवले. पण त्याच माणसाच्या मेंदूत क्रौर्याची अशी कोणती अंधारी गुहा दडलेली आहे, की जिथे दुसऱ्या माणसाचे मांस खाण्याची कल्पनाही प्रत्यक्षात उतरू शकते?
जंगलातील हिंस्र प्राणी भूक लागल्यावर दुसऱ्या प्राण्याची शिकार करतात. पण माणूस ? माणूस तर विचार करू शकतो, भावना समजू शकतो, नाती जपू शकतो... आणि तरीही तो असे काही करतो?
खरा भयपट पडद्यावर नसतो. कधी कधी तो माणसाच्याच चेहऱ्यामागे दडलेला असतो!








