काही साड्या केवळ नेसण्यासाठी नसतात; त्या म्हणजे मानवी कौशल्य, संयम आणि कल्पकतेचा अद्भुत आविष्कार असतात. भारतातील तीन वस्त्रपरंपरा याचीच साक्ष देतात. या वस्त्रांची निर्मिती करण्यासाठी काही महिने, तर कधी वर्षभराहून अधिक काळ लागतो. त्यामागचं तंत्र इतकं गुंतागुंतीचं आहे की, ते शिकण्यासाठी अनेक वर्षांची साधना करावी लागते.
१. पाटण पटोला — धाग्यांमध्ये आधीच विणलेली जादू !
गुजरातमधील पाटण येथील पाटण पटोला ही दुहेरी इकत (Double Ikat) पद्धतीने तयार होणारी रेशमी वस्त्रकला आहे. साळवी समाजातील कुशल विणकरांनी ही परंपरा अनेक पिढ्यांपासून जपली आहे.
ही साडी विणायला सुरुवात करण्यापूर्वीच तिच्या प्रत्येक धाग्याला विशिष्ट आकृतिबंधानुसार बांधून रंगवलं जातं.उभे -आडवे धागे, दोन्हींचं रंगकाम अत्यंत अचूक असावं लागतं. त्यानंतर हे धागे विणताना त्यांची जुळवाजुळव केली जाते आणि त्यातून अपेक्षित नक्षी साकारते.
एका पटोला साडीसाठी अनेक महिने, तर काही अत्यंत गुंतागुंतीच्या नमुन्यांसाठी वर्षभराहून अधिक काळ लागू शकतो.
२. काश्मिरी कानी — शालीत विणलेली सांकेतिक लिपी
जम्मू-काश्मीरमधील कानीहामा परिसराशी संबंधित असलेली कानी शाल ही कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे.
सामान्य विणकामात शटलचा वापर केला जातो.पण कानी शालीमध्ये रंगानुसार लहान लाकडी काड्यांचा किंवा बॉबिन्सचा वापर केला जातो. प्रत्येक ओळीत अनेक रंगांच्या धाग्यांची अचूक गुंफण करावी लागते.
आणखी वैशिष्ट्य म्हणजे विणकर नक्षी समोर ठेवून केवळ तिचं अनुकरण करत नाहीत. ते तालीम नावाच्या सांकेतिक सूचनांनुसार विणकाम करतात. एखाद्या संगीतकाराला स्वरलेखन वाचून संगीत सादर करता येतं, तसंच विणकर तालीम वाचून धाग्यांतून नक्षी साकारतो.
या प्रक्रियेत प्रचंड एकाग्रता, रंगांची जाण आणि हातांचा अचूक ताळमेळ आवश्यक असतो. त्यामुळे एका शालीच्या निर्मितीस अनेक महिने, कधी वर्षांहून अधिक काळही लागू शकतो.
३. जामदानी — हवेत तरंगणाऱ्या फुलांची कला
बंगालमध्ये आणि बांगला देशातल्या ढाका परिसरातील जामदानी वस्त्रकलेचं वैशिष्ट्य म्हणजे तिचे नाजूक धागे आणि हवेत तरंगत असल्याचा भास निर्माण करणाऱ्या फुलांच्या नक्षी.
या विणकामात नक्षी तयार करण्यासाठी अतिरिक्त धागे हाताने गुंफले जातात. विणकर छोट्या सुईसारख्या साधनाच्या मदतीने प्रत्येक आकृती साकारतो. अनेकदा त्याला नक्षीची रचना स्मरणात ठेवून अत्यंत बारकाईने काम करावं लागतं.
कापड अतिशय तलम असल्यामुळे धाग्यांमधील ताण, नक्षीची जागा आणि प्रत्येक हालचाल यांचं अचूक नियंत्रण आवश्यक असतं. एखाद्या छोट्याशा चुकीमुळे नक्षीचा समतोल बिघडू शकतो.
या तीन कलांमध्ये तंत्र वेगवेगळं आहे. पटोल्यात धाग्यांचं पूर्वनियोजित रंगकाम, कानीमध्ये सांकेतिक सूचनांनुसार रंगीत धाग्यांची गुंफण, तर जामदानीमध्ये अत्यंत तलम कापडावर हाताने नक्षी विणण्याचं कसब आहे.
तुमच्या मते, या तीनपैकी सर्वांत कठीण वस्त्रकला कोणती — पाटण पटोला, काश्मिरी कानी की जामदानी?








