१८ जून २०२६ च्या त्या सकाळी गुगलच्या मुख्यालयात एका ई-मेलने खळबळ वाढली.नोम शाजीरने (Noam Shazeer) आपला राजीनामा पाठवला होता. ज्या माणसाला परत आणण्यासाठी गुगलने दोन वर्षांपूर्वी तब्बल २.७ बिलियन डॉलर म्हणजे जवळपास २२ हजार कोटी रुपये मोजले होते, त्याने साध्या एका ई-मेलमध्ये लिहिलं होतं - "मी आता ओपन एआय (OpenAI) मध्ये जातोय."
नोम शाजीर हे नाव एआय (AI) च्या जगात देवासारखं मानलं जातं. २०२४ मध्ये गुगलने त्यांची 'कॅरेक्टर एआय' ही कंपनी विकत घेतली नव्हती, तर खरं तर नोम शाजीरला परत मिळवण्यासाठी ती प्रचंड किंमत मोजली होती. पण दोनच वर्षात हा 'सोन्याचा माणूस' हात सोडून गेला. त्याच आठवड्यात जॉन जंपर यांनीही गुगलला रामराम ठोकला. जॉन जंपर म्हणजे ती व्यक्ती जिने 'अल्फा फोल्ड' मॉडेल बनवून बायोलॉजीचं जग बदलून टाकलं होतं आणि ज्यांना २०२४ चं नोबेल पारितोषिक मिळालं होतं.
जेव्हा घराचा खांब निखळतो, तेव्हा भिंतींना तडे जाणारच. गुगलच्या बाबतीतही तेच झालं. १८ मेला अल्फाबेटचा (गुगलची पालक कंपनी) स्टॉक ४०८ डॉलरवर होता, जो त्याचा आजवरचा उच्चांक होता. पण २२ जून उजाडता उजाडता तो ३६२ डॉलरवर येऊन आदळला. फक्त पाच आठवड्यांत गुगलची किंमत-मार्केट कॅप २७९ बिलियन डॉलरने घसरली. एका दिवसात शेअर ६.५ टक्क्यांनी पडला - गेल्या वर्षभरातील ही सर्वात मोठी घसरण होती.
गुंतवणूकदार आता एकाच चिंतेत आहेत. गुगल एआय इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, डेटा सेंटर्ससाठी आणि चिप्ससाठी १९० बिलियन डॉलर खर्च करायला निघालंय. पण ज्यांच्या बुद्धीवर हे घर उभं राहणार होतं,तेच हात सोडवून निघून गेले आहेत.समजा, तुम्ही जगातील सर्वात महागडं रेस्टॉरंट बांधलं आणि मुख्य शेफच निघून गेला, तर ग्राहक येणार कुठून?
एआयच्या या युद्धात आता कोणाचंच पारडं जड नाहीये. चॅट जीपीटीचा (ChatGPT) मार्केट शेअर पहिल्यांदा ५० टक्क्यांच्या खाली आलाय. त्यांचं ५.६ व्हर्जन उशिरा येतंय, तर गुगलचं जेमिनी ३.५ सुद्धा रखडलंय. हे सगळं पाहून १९९० च्या दशकातील मायक्रोसॉफ्टची आठवण येते. तेव्हा मायक्रोसॉफ्ट सर्वात शक्तिशाली होती, पण त्यांचे हुशार इंजिनिअर्स नवीन स्वप्नं घेऊन छोट्या कंपन्यांमध्ये गेले. आणि त्याच छोट्या कंपन्यांमधून पुढे गुगल आणि ॲमेझॉन जन्माला आले. आज इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतोय की काय, असं वाटतंय.
गुगलने २.७ बिलियन डॉलर खर्च करून माणसांना तर आणलं, पण त्यांच्या कामात अडथळा ठरणाऱ्या 'कमिटी' संस्कृतीला ते हटवू शकले नाहीत. मोठ्या कंपन्यांमधील लाल फितीचा कारभार सृजनशील माणसांना गुदमरून टाकतो, हेच यातून पुन्हा सिद्ध झालं.
अमेरिकेत गुगलचे शेअर पडले तर आपल्या भारताचं काय? ऐका तर, भारतासाठी हे समीकरण थोडं गुंतागुंतीचं आहे. आपल्याकडच्या टीसीएस (TCS), इन्फोसिस (Infosys) आणि विप्रो (Wipro) सारख्या आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणावर गुगल क्लाउड आणि त्यांच्या एआय टूल्सवर अवलंबून आहेत. जर गुगल या शर्यतीत मागे पडलं, तर भारतीय कंपन्यांना अँथ्रोपिक (Anthropic) किंवा ओपन एआयच्या दारात जावं लागेल. पण या कंपन्यांची भारतातली उपस्थिती अजूनही मर्यादित आहे.
त्यामुळे जर तुम्ही आयटी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करत असाल, तर आता डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे. कारण तंत्रज्ञानाच्या जगात साम्राज्यं कोसळायला वेळ लागत नाही, फक्त एक 'राजीनामा' पुरेसा असतो.जाता जाता एक विचार करा, अब्जावधी डॉलर्सची यंत्रसामग्री महत्त्वाची की ती चालवणारा एखादा अफाट बुद्धिमत्तेचा माणूस? काय वाटतं तुम्हाला?






