मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

हाय-टेक सोलर फार्म आणि मेंढ्यांचा कळप: पोलंडमध्ये फोक्सवॅगनचा अनोखा प्रयोग

3 मिनिट वाचन

पोलंडमधील सोलर प्लांटमध्ये गवत कापण्यासाठी मशीनऐवजी १०० मेंढ्यांचा वापर करणारा फोक्सवॅगनचा ॲग्रिव्होल्टेइक्स प्रकल्प.

शेअर करा:
हाय-टेक सोलर फार्म आणि मेंढ्यांचा कळप: पोलंडमध्ये फोक्सवॅगनचा अनोखा प्रयोग

एकीकडे फोक्सवॅगनसारखी बलाढ्य कंपनी अत्याधुनिक इलेक्ट्रिक गाड्या बनवून जगाला 'फ्युचर' दाखवत आहे, तर दुसरीकडे याच कंपनीच्या एका मोठ्या सोलर प्लांटमध्ये गवत कापण्यासाठी कोणतंही रोबोटिक मशिन नाही, तर चक्क १०० मेंढ्यांचा कळप तैनात करण्यात आला आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि हजारो वर्षांपासून चालत आलेली मेंढपाळाची पद्धत यांचा हा मेळ सध्या ऑटोमोबाईल विश्वात कुतूहलाचा विषय ठरतोय.

पोलंडमधील पोझ्नान (Poznan) येथील कारखान्यात हा अनोखा उपक्रम सुरू आहे. या कारखान्याला वीज पुरवण्यासाठी १८.३ मेगावॅटचा एक अवाढव्य सोलर फार्म उभारण्यात आला आहे. यात ३१,००० पेक्षा जास्त सोलर पॅनेल्स आहेत. या पॅनेल्सच्या खाली वाढणारं गवत कापण्यासाठी कंपनीने पारंपारिक पेट्रोलवर चालणाऱ्या लॉनमोअर्सना सुट्टी देऊन 'वेलकोपोलस्का' जातीच्या १०० मेंढ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रक्रियेला विज्ञानाच्या भाषेत 'ॲग्रिव्होल्टेइक्स' (Agrivoltaics) म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, जिथे एकाच जमिनीवर सौर ऊर्जा निर्मिती आणि पशुपालन किंवा शेती या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात. आकडेवारी सांगते की, हा सोलर प्लांट कारखान्याला लागणाऱ्या वार्षिक विजेच्या जवळपास २५ टक्के वीज पुरवतो. कडक उन्हाच्या दिवसात तर या प्लांटमधून कारखान्याची १०० टक्के विजेची गरज भागवली जाते.

मेंढ्यांचा वापर करण्यामागे एक व्यावहारिक कारणही आहे.सोलर पॅनेल्सच्या खाली अशा काही अरुंद जागा असतात, जिथे मोठी मशिनरी पोहोचू शकत नाही. तिथे या मेंढ्या सहज पोहोचून गवत फस्त करतात. बदल्यात या अवाढव्य सोलर स्ट्रक्चर्समुळे मेंढ्यांना कडक ऊन आणि पावसापासून हक्काची सावली आणि संरक्षण मिळतं.

हा केवळ एक खर्च वाचवण्याचा जुगाड नसून, यामागे मोठं वैज्ञानिक संशोधन सुरू आहे. फोक्सवॅगनने यासाठी पोझ्नान युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ सायन्सेससोबत हातमिळवणी केली आहे. शास्त्रज्ञ सध्या या गोष्टीचा अभ्यास करत आहेत की, सोलर पॅनेल्सच्या सावलीमुळे मेंढ्यांना उन्हापासून संरक्षण मिळते आणि तिथल्या मातीचा दर्जा कसा सुधारतो. यामुळे पर्यावरणाचा दुहेरी फायदा होतोय. मशिन चालवण्यासाठी लागणारं इंधन आणि त्यातून होणारे उत्सर्जन पूर्णपणे थांबलं आहे. शिवाय, मेंढ्यांच्या विष्ठेमुळे जमिनीला नैसर्गिक खत मिळून तिथल्या जैवविविधतेत मोठी वाढ झाली आहे. या ठिकाणी आता अनेक प्रकारचे कीटक आणि स्थानिक वन्यजीव वास्तव्यास आले आहेत, जे आधी मशिनच्या आवाजामुळे तिथे फिरकत नसत.

विशेष म्हणजे, फोक्सवॅगनचा हा पहिलाच प्रयोग नाही. अमेरिकेतील टेनेसी येथील चॅटानूगा (Chattanooga) प्लांटमध्येही त्यांनी अशाच प्रकारे ५० मेंढ्या तैनात केल्या आहेत. तिथे तर या मेंढ्यांच्या रक्षणासाठी 'बुरिटो' नावाचा एक गाढवही ठेवण्यात आला आहे, जो लांडग्यांपासून मेंढ्यांचं रक्षण करतो.

तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं, तरी काही कामांसाठी आजही निसर्गाची मदत घेणं अधिक फायद्याचं आणि शाश्वत ठरतं, हेच या प्रयोगातून सिद्ध होतंय. आपण स्मार्ट फॅक्टरीच्या गप्पा मारतो, पण खरा 'स्मार्टनेस' हा निसर्गाशी जुळवून घेण्यातच आहे, असं नाही का वाटत?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

जेव्हा स्वतःची घागर स्वतः भराल, तेव्हाच कळेल निसर्गाची खरी किंमत!
लाइफस्टाइल

जेव्हा स्वतःची घागर स्वतः भराल, तेव्हाच कळेल निसर्गाची खरी किंमत!

फुकट मिळणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीची नासाडी आणि भविष्यातील पाणी टंचाईच्या संकटावर प्रकाश टाकणारा विचारप्रवर्तक लेख.

१० जून, २०२६

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? भाग-२
लाइफस्टाइल

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? भाग-२

ज्या जमिनीवर तुमची टोलेजंग इमारत उभी आहे, तिचा ५० वर्षांचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? जमिनीच्या प्रदूषणाचा वेध घेणारा लेख.

१३ ऑक्टोबर, २०२६

प्लास्टिकचा 'वापरा आणि फेका' पॅटर्न: मानवी अस्तित्वासाठी मोठा धोका
आरोग्य

प्लास्टिकचा 'वापरा आणि फेका' पॅटर्न: मानवी अस्तित्वासाठी मोठा धोका

मानवी रक्त आणि अन्नामध्ये मिसळणारे मायक्रोप्लास्टिकचे कण आरोग्यासाठी किती घातक ठरत आहेत, यावर एक विशेष अहवाल.

२९ मे, २०२६

सप्टेंबर महिना म्हणजे फुलपाखरांचा महिना - Big Butterfly Month
विज्ञान

सप्टेंबर महिना म्हणजे फुलपाखरांचा महिना - Big Butterfly Month

भारतात दरवर्षी सप्टेंबर महिना हा 'बिग बटरफ्लाय मंथ' म्हणून का साजरा केला जातो आणि फुलपाखरांचे निसर्गातील महत्त्व काय आहे? जाणून घ्या.

१ सप्टेंबर, २०२६