जमिनीचा इतिहास तपासण्यापूर्वी हा लेख वाचा.
महाराष्ट्र रेरा (MahaRERA) च्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात सध्या ४५,००० पेक्षा जास्त गृहप्रकल्प नोंदणीकृत आहेत. गेल्या वर्षभरात पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये नवीन वसाहतींच्या संख्येत तब्बल १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही आकडेवारी जितकी सुखावह वाटते, तितकीच ती एका मोठ्या धोक्याची नांदीही असू शकते.
मुंबई, पुणे, नागपूर किंवा नाशिक यांसारख्या शहरांच्या सीमा आता वेगाने विस्तारत आहेत. जिथे कालपर्यंत कारखाने होते, तिथे आज टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. चकाचक लाद्या, मॉडर्न अॅमेनिटीज आणि 'प्राइम लोकेशन'च्या जाहिरातींना भुलून आपण लाखो रुपये गुंतवतो. पण, ज्या जमिनीवर तुमची इमारत उभी आहे, त्या जमिनीचा ५० वर्षांचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?
हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील 'हिंकली' (Hinkley) हे शहर. १९९३ सालापर्यंत हे एक शांत शहर होतं, पण अचानक तिथल्या घराघरांतून भयावह बातम्या येऊ लागल्या. लहान मुलांच्या नाकातून सतत रक्त येणं, मोठ्या माणसांच्या अंगावर विचित्र रॅशेस येणं आणि अचानक कॅन्सरसारखे गंभीर आजार बळावणं हे नित्याचंच झालं होतं. या आजारांचं मूळ त्या जमिनीच्या इतिहासात दडलं होतं. एरिन ब्रोकोविच (Erin Brockovich) नावाची एक कायदेशीर क्लर्क एका रिअल इस्टेट केसच्या फाईल्स तपासत होती. तिला अचानक काही मेडिकल रेकॉर्ड्स त्या फाईल्समध्ये सापडले. रिअल इस्टेटच्या केसमध्ये लोकांच्या आरोग्याचे रिपोर्ट काय करत आहेत, या एका शंकेने जगातील सर्वात मोठ्या पर्यावरणीय घोटाळ्याचा पर्दाफाश झाला.
पॅसिफिक गॅस अँड इलेक्ट्रिक कंपनी (PG&E) नावाच्या कंपनीने १९५२ पासून हिंकलीमध्ये नॅचरल गॅस कॉम्प्रेसर स्टेशन चालवले होते. या यंत्रांना गंज लागू नये म्हणून 'हेक्झाव्हॅलेंट क्रोमियम' (Hexavalent Chromium) किंवा 'क्रोमियम-६' नावाचं रसायन वापरलं जायचं. हे रसायन अतिशय प्रभावी अँटी-रस्ट एजंट असलं, तरी ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असतं.सूत्रांनुसार, ही कंपनी क्रोमियमयुक्त सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना उघड्या तलावांमध्ये सोडून देत असे. हे विषारी पाणी हळूहळू जमिनीत झिरपलं आणि हिनकली शहराच्या भूगर्भातील पाण्याचा साठा दूषित झाला. तब्बल चार दशकं तिथले रहिवासी हेच विषारी पाणी पित होते आणि त्यानेच अंघोळ करत होते.
एरिन ब्रोकोविचने जिद्दीने घराघरांत जाऊन माहिती गोळा केली. तिने लोकांच्या आरोग्याच्या तक्रारींचा आणि जमिनीच्या दूषित पाण्याचा संबंध पुराव्यानिशी सिद्ध केला. या संघर्षाचा शेवट १९९६ मध्ये झाला. पीजी अँड ई कंपनीला तब्बल ३३३ दशलक्ष डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागली, जी त्या काळातील अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी सेटलमेंट होती.
हा विषय आणखी खोलवर समजून घ्यायचा असेल तर २००० साली ज्युलिया रॉबर्टचा एरिन ब्रोकोविचवर एक चित्रपट आला होता तो चित्रपट नक्की बघा
आता महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करूया. आपल्याकडेही ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ, पिंपरी-चिंचवड किंवा तळोजा यांसारख्या औद्योगिक पट्ट्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर निवासी प्रकल्प येत आहेत. पूर्वी जिथे रासायनिक खतं, रंग किंवा औषधांचे कारखाने होते, ती जमीन आता 'बिगर शेती' (NA) करून बिल्डरांच्या घशात घातली जात आहे.
यामागचं कारण असं की, शहरात जागा उरलेली नाही आणि कारखाने शहराबाहेर हलवले जात आहेत. पण, त्या जमिनीवर ५०-६० वर्षं जे रासायनिक प्रक्रियांचं पाणी साचलं, त्याचं काय झालं? जमिनीच्या थरांमध्ये आजही ते विषारी अंश शिल्लक असू शकतात. जर त्या जमिनीचं 'सॉईल टेस्टिंग' (Soil Testing) आणि 'वॉटर ऑडिट' व्यवस्थित झालं नसेल, तर हिंकलीची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही. भारतातील अनेक महानगरांमध्ये भूगर्भातील पाण्यात जड धातूंचे (Heavy Metals) प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळलं आहे. आर्सेनिक, शिसे आणि क्रोमियम यांसारखे घटक पिण्याच्या पाण्यातून शरीरात गेले, तर त्याचे परिणाम तात्काळ दिसत नाहीत. ते पाच-दहा वर्षांनी कॅन्सर किंवा किडनी निकामी होण्याच्या स्वरूपात समोर येतात.
सांगायचं ते असं,नवीन घर घेताना फक्त सातबारा किंवा रेरा सर्टिफिकेट पाहून भागणार नाही. त्या जमिनीवर पूर्वी काय होतं, याचा शोध घेणं आता अनिवार्य झालं आहे. जर तिथे पूर्वी एखादा केमिकल प्लँट होता, तर तिथली माती आणि पाणी किती खोलवर दूषित आहे, याची खात्री करून घेणं तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.
कॉर्पोरेट कंपन्यांचा नफा आणि बिल्डरांचा हव्यास यांच्यामध्ये सामान्य माणसाचा जीव स्वस्त झाला आहे. हिंकलीच्या केसने जगाला शिकवलं की, पर्यावरणाशी केलेली प्रतारणा कधी ना कधी मानवाच्या अंगलट येतेच. आपण ज्याला 'डेव्हलपमेंट' म्हणतो, ती खरोखरच सुरक्षित आहे का, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
विज्ञानाची कमाल अशी आहे की, ते जमिनीच्या पोटात दडलेले जुने गुन्हेही उकरून काढू शकतं. पण, त्यासाठी ग्राहकांनी सजग असणं गरजेचं आहे. फ्लॅटच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यू सुंदर असेल, पण त्या इमारतीच्या पायाखाली काय दडलंय, हे तपासण्याची जबाबदारी तुमची आहे.भविष्यात काय होणार, हे आजच्या आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. तुम्ही ज्या जमिनीवर तुमचं स्वप्नातलं घर उभारत आहात, ती जमीन खरोखरच 'राहण्यायोग्य' आहे की ती एक शांत ज्वालामुखी आहे?
तुमच्या बिल्डरला जमिनीच्या जुन्या वापराबाबत (Land Use History) प्रश्न विचारण्याचं धाडस तुम्ही दाखवणार का?






