मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

6 मिनिट वाचन

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

शेअर करा:
एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या काडीवर उभं राहिलेलं आर्थिक साम्राज्य!

इव्हार क्रुगर :जगातील सरकारांनाच गुंतवणुकीच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपतीची थक्क करणारी कहाणी
फसवणूक करणाऱ्यांना माणसांच्या स्वभावाचा अभ्यास चांगला असतो. सामान्य माणसाला कमी कष्टांत जास्त पैसे कमवायचे असतात. त्यासाठी तो कधी सोन्याच्या दागिन्यांच्या स्कीममध्ये गुंतवणूक करतो,कधी सागवानाच्या झाडांत, तर कधी ससे पाळण्याच्या व्यवसायात! सुरुवातीला परतावा मिळतो, काही लोकांना पैसेही मिळतात. मग ते इतरांना सांगतात, आणखी लोक गुंतवणूक करतात आणि एक दिवस अचानक कंपनीचा दरवाजा बंद होतो. गुंतवणूकदारांच्या हातात राहतात केवळ पावत्या आणि डोक्यात एकच प्रश्न—आपण फसलो कसे?पण एक मिनिट! फसवणूक होण्यासाठी बळी सामान्य माणूसच असावा, अशी काही अट नाही. एखाद्या देशाचं सरकारही फसू शकतं. तेही माचीसच्या काड्यांच्या व्यवसायात!

पहिल्या महायुद्धानंतर युरोपची अर्थव्यवस्था विस्कटली होती. अनेक देशांवर कर्जाचा डोंगर होता.सरकारी तिजोरीला खडखडाट होता आणि अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी तातडीने पैशांची गरज होती. अशा वेळी स्वीडनमधून एक उद्योगपती पुढे आला. त्याचं नाव होतं इव्हार क्रुगर (Ivar Kreuger). त्याचा व्यवसाय होता माचीसच्या काड्या बनवण्याचा; पण त्याची खरी महत्त्वाकांक्षा होती जगाच्या अर्थकारणावर वर्चस्व मिळवण्याची.त्याने सरकारांना एक प्रस्ताव दिला—आमच्या कंपनीला तुमच्या देशात माचीस उत्पादन आणि विक्रीची मक्तेदारी द्या. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला मोठं कर्ज देऊ!

माचीसची काडी म्हणजे किरकोळ वस्तू. पण तिच्या मक्तेदारीच्या बदल्यात एखाद्या देशाला लाखो-कोट्यवधींचं कर्ज मिळणार असेल, तर आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारला हा सौदा आकर्षक वाटणं स्वाभाविक होतं. क्रुगरने याच गरजेचा अचूक अंदाज घेतला होता.आणि इथेच सुरू झाली एका अशा आर्थिक साम्राज्याची कहाणी, ज्याची चमक जगाला थक्क करणार होती; पण ....

माचीसचा बादशहा आणि सरकारांची रांग
क्रुगरची खासियत केवळ माचीसच्या काड्या बनवण्यात नव्हती. तो एक कुशल आर्थिक रणनीतीकार होता. त्याने विविध देशांतील माचीस उत्पादक कंपन्या विकत घेतल्या, नवीन कारखाने उभारले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपलं वर्चस्व वाढवलं. त्याच्या व्यवसायाचं जाळं इतकं विस्तारलं की तो जगातील सर्वांत प्रभावशाली उद्योगपतींपैकी एक बनला.

त्याच्या योजनेत एक विलक्षण गोष्ट होती. सरकारांना कर्ज देऊन त्यांच्या देशातील माचीसची मक्तेदारी मिळवायची. म्हणजे सरकारला पैसा मिळणार, तर क्रुगरला खात्रीशीर बाजारपेठ मिळणार! वरकरणी दोघांचाही फायदा.
पोलंड, जर्मनी, फ्रान्स, हंगेरी, युगोस्लाव्हिया, रोमानिया, ग्रीस आणि बाल्टिक प्रदेशातील अनेक देशांशी त्याने अशा प्रकारचे व्यवहार केले. जर्मनीला १९२९ मध्ये १२५ दशलक्ष डॉलरच्या कर्जाचा करार करण्यात आला. त्याबदल्यात दीर्घ मुदतीची माचीस मक्तेदारी देण्याची तरतूद होती.

जरा विचार करा! एखाद्या देशातील माचीसच्या काड्यांवर मक्तेदारी मिळवण्यासाठी हा माणूस त्या देशाच्या सरकारला कर्ज देत होता. आजच्या भाषेत सांगायचं तर, एखाद्या उत्पादनाची बाजारपेठ मिळवण्यासाठी त्याने थेट देशाच्या सरकारलाच वित्तपुरवठा केला होता.
या व्यवहारांमधून क्रुगरने केवळ औद्योगिक साम्राज्य उभं केलं नाही, तर जगभरातील गुंतवणूकदारांचाही विश्वास संपादन केला. त्याच्या कंपन्यांचे शेअर्स आणि रोखे आकर्षक वाटत होते. नियमित लाभांश मिळण्याची अपेक्षा आणि उद्योगपतीच्या यशाची कीर्ती यामुळे गुंतवणूकदार त्याच्याकडे आकर्षित होत होते.
पण या चमकदार चित्रामागे एक गंभीर प्रश्न लपला होता—इतक्या मोठ्या साम्राज्याला चालवण्यासाठी लागणारा पैसा नेमका येतो कुठून?

१९२९ : संकटाची चाहूल

ऑक्टोबर १९२९ मध्ये अमेरिकेतील शेअर बाजार कोसळला. त्यानंतर सुरू झालेल्या महामंदीने जागतिक अर्थव्यवस्थेला हादरवून सोडलं. बँका सावध झाल्या, कर्जपुरवठा आटला आणि नवीन भांडवल उभं करणं कठीण झालं.
क्रुगरच्या साम्राज्याची आर्थिक रचना मोठ्या प्रमाणावर कर्ज, नवीन भांडवल आणि गुंतागुंतीच्या आर्थिक व्यवहारांवर अवलंबून होती. जुन्या देण्यांची परतफेड आणि नव्या आर्थिक बांधिलक्या पूर्ण करण्यासाठी त्याला सतत पैशांची गरज होती. नवीन पैसा येण्याचा प्रवाह थांबला, तशी त्याची आर्थिक कोंडी वाढू लागली.
आणि मग हळूहळू पडद्यामागचं वास्तव समोर येऊ लागलं.
कंपन्यांच्या आर्थिक हिशेबांमध्ये गंभीर अनियमितता आढळल्या. काही मालमत्तांची किंमत आणि उपलब्ध रोख रक्कम यांबाबत दाखवलेली आकडेवारी प्रत्यक्ष परिस्थितीशी जुळत नव्हती. पुढील तपासात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार उघड झाले. क्रुगरच्या साम्राज्याने निर्माण केलेल्या विश्वासाला तडे जाऊ लागले.
आता प्रश्न फक्त माचीसच्या काड्यांचा राहिला नव्हता. प्रश्न होता हजारो गुंतवणूकदारांच्या पैशांचा, बँकांच्या कर्जांचा आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा.

पॅरिसमधील शेवट
१२ मार्च १९३२. रोजी पॅरिसमधील आपल्या निवासस्थानी इव्हार क्रुगर मृतावस्थेत आढळला. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींनुसार त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूने आधीच डळमळीत झालेल्या आर्थिक साम्राज्याचा ऱ्हास अधिकच वेगाने झाला. पुढील तपासणीत आर्थिक अनियमिततांचा मोठा पट उलगडला आणि त्याच्या कंपन्यांचे पतन जागतिक वित्तीय बाजारांसाठी मोठा धक्का ठरले.
त्याच्या साम्राज्याच्या पतनामुळे स्वीडनमधील अनेक सामान्य गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले. बँकांनाही मोठे धक्के बसले. क्रुगरच्या कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली आणि त्याने निर्माण केलेल्या आर्थिक व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या.

एकेकाळी अनेक देशांच्या सरकारांना कर्ज देणारा हा उद्योगपती शेवटी स्वतःच्या आर्थिक बांधिलक्या पूर्ण करू शकला नाही.
माचीसच्या काडीने आग पेटवता येते. पण तीच काडी संपूर्ण आर्थिक साम्राज्याला आग लावू शकते, याचं क्रुगरचं उदाहरण जगाच्या आर्थिक इतिहासात कायमचं नोंदलं गेलं.

या कहाणीचा खरा धडा: क्रुगरच्या प्रकरणातून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. आर्थिक फसवणुकीचं मूळ केवळ सामान्य माणसाच्या अज्ञानात किंवा पैशाच्या हव्यासात नसतं. मोठमोठ्या संस्था, बँका आणि सरकारंसुद्धा आकर्षक परतावा, तातडीची पैशांची गरज आणि प्रतिष्ठित व्यक्तीवर ठेवलेला विश्वास यांमुळे चुकीचे निर्णय घेऊ शकतात.
फसवणूक करणारा माणूस तुमच्या लोभाचा फायदा घेतो; पण तो तुमच्या विश्वासाचाही फायदा घेतो.
आणि म्हणूनच आर्थिक व्यवहारांत एक प्रश्न नेहमी विचारायला हवा—समोरचा माणूस मला इतका मोठा फायदा देतो आहे, तर त्याला त्यातून नेमकं काय मिळतं आहे?
क्रुगरच्या काळात या प्रश्नाचं उत्तर अनेकांना उशिरा मिळालं. आजही तेवढंच महत्त्वाचं आहे.
कारण फसवणुकीची युक्ती बदलते, तिचं स्वरूप बदलतं, आकडे बदलतात; पण माणसाच्या मनातल्या झटपट श्रीमंत होण्याच्या इच्छेचा फायदा घेण्याची कला मात्र तशीच राहते.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!
लाइफस्टाइल

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!

कच्छचे अज्रख आणि आंध्र प्रदेशचे कलमकारी या दोन्ही पारंपरिक वस्त्रकलांमागे कोणतं प्राचीन रसायनशास्त्र दडलं आहे? वाचा सविस्तर.

१५ ऑक्टोबर, २०२६

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर
विज्ञान

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर

दक्षिण ध्रुवावरील २.५ किमी खोल बर्फात न्यूट्रिनो पकडणारी महाकाय दुर्बीण उभारणारे शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन आणि त्यांचा नोबेल सन्मान.

७ ऑक्टोबर, २०२६

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!
विज्ञान

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!

प्रकाशाच्या साहाय्याने मेंदूतील पेशींचे नियंत्रण करणाऱ्या 'ऑप्टोजेनेटिक्स' तंत्रज्ञानाचा शोध आणि २०२६ च्या नोबेल पुरस्काराची रंजक गोष्ट.

६ ऑक्टोबर, २०२६

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? भाग-२
लाइफस्टाइल

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? भाग-२

ज्या जमिनीवर तुमची टोलेजंग इमारत उभी आहे, तिचा ५० वर्षांचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? जमिनीच्या प्रदूषणाचा वेध घेणारा लेख.

१३ ऑक्टोबर, २०२६