मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

आकाशातून आलेले दरोडेखोर: हेलिकॉप्टर आले आणि पैसे घेऊन गेले!

5 मिनिट वाचन

२००९ मध्ये स्वीडनच्या स्टॉकहोममधील कॅश डेपोवर हेलिकॉप्टरने दरोडा टाकून कोट्यवधींची लूट करणाऱ्या चोरांची थरारक आणि हुशार योजना.

शेअर करा:
आकाशातून आलेले दरोडेखोर: हेलिकॉप्टर आले आणि पैसे घेऊन गेले!

२३ सप्टेंबर २००९. पहाटेचे सव्वापाच वाजले होते.स्टॉकहोम शहर अजून झोपेत होते.शहराच्या व्हास्ट्बर्ग भागातील रस्ते जवळजवळ निर्मनुष्य होते.शहरातल्या कॅश डेपोमध्ये मात्र काही कर्मचारी आपल्या नेहमीच्या पहाटेच्या कामात व्यस्त होते.कॅश डेपो म्हणजे रोख रक्कम ठेवण्याचा मोठा साठा असतो.एटीम सारख्या मशिनमध्ये दिवसभर पुरतील अशा नोटा नोटा भरणे हे या कॅश डेपोचे काम असते. साहजिक्च या डेपोच्या मोठ्या तिजोरीत कोट्यावधींचे चलन ठेवण्यात येते. व्हास्ट्बर्गच्या तिजोरीत कोट्यवधी स्वीडिश क्रोन सुरक्षित ठेवलेले होते.

अचानक आकाशात हेलिकॉप्टरचा आवाज घुमला.सुरुवातीला तो नेहमीचा आवाज वाटला पण काही सेकंदांत ते हेलिकॉप्टर त्या इमारतीच्या अगदी वर आले... आणि थेट छतावर उतरले. कॅशडेपोचे गेट अत्यंत सुरक्षित होते.कोणत्याही इतर वाहनांना गेटमधून प्रवेश नव्हता.पण आकाशातून उतरलेल्या हेलिकॉप्टरला अडवणार कोण? सुरक्षा रक्षकांच्या कडक तपासातून न जाता आकाशातून थेट प्रवेश!

हेलिकॉप्टरमधून सशस्त्र दरोडेखोर खाली उतरले.त्यांनी छतावरील काचेचा भाग (डोम) फोडला आणि इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर स्फोटकांचा वापर करून सुरक्षा दरवाजे तोडले.आत असलेल्या 21 कर्मचाऱ्यांना परिस्थितीची कल्पना आली.पण दरोडेखोरांचा उद्देश रक्तपात नव्हता.कर्मचाऱ्यांनी स्वत:ला सुरक्षित जागेत कोंडून घेतले आणि हेलिकॉप्टर गॅंगनी आपले लक्ष्य गाठले—तिजोरीतली रोख रक्कम.

पण या कथेतील सर्वात हुशार चाल अजून बाकी होती. कारण त्यांनी पोलिसांचाही विचार केला होता. दरोडा सुरू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली की, ताबडतोब काय होईल?

पोलिसांचे हेलिकॉप्टर उडेल.आकाशातून पाठलाग सुरू होईल. म्हणून दरोडेखोरांनी त्याचाही बंदोबस्त आधीच केला होता.

पोलिसांच्या हेलिकॉप्टर तळाजवळ त्यांनी बॉम्बसारखे दिसणारे खोटे बॉम्ब ठेवले होते. ते खरे की बनावट,हे तपासण्यातच पोलीसांचा वेळ जाणार हे दरोडेखोरांना माहिती होते महत्त्वाचे हे होते की पोलिसांना धोका वाटला.त्यामुळे पोलिसांचे हेलिकॉप्टर तातडीने उड्डाण करू शकले नाही.सोबतच जमिनीवरून पाठलाग होण्याचीही शक्यता होतीच. त्यासाठीही गॅंगने तयारी केली होती. रस्त्यांवर रोड स्पाइक्स(खिळे) टाकून ठेवले होते, जेणेकरून पोलिसांच्या गाड्यांचा वेग कमी होईल.

आता एक क्षण थांबून विचार करा. दरोडेखोरांनी फक्त ‘कुठून आत जायचे?’ याचा विचार केलेला नव्हता.

त्यांनी विचार केला होता— “आम्ही आत गेल्यावर पोलिस काय करतील?”

आणि त्यानंतरचा प्रश्न— “पोलिसांनी ते केले तर त्यांना कसे थांबवायचे?”

हे सगळे गृहित धरूनच त्यांनी तयारी केली होती.हीच या दरोड्याची खरी गंमत होती.

पोलिस आले.पण वेळ त्यांच्या हातातून निसटत होता.

पोलिस कॅश डेपोच्या मेन डोअरजवळ पोहोचले.,दरोडेखोर अजूनही आत होते.

पण सुरक्षा दलासमोर आणखी एक अडचण होती.आत सशस्त्र गुन्हेगार असल्याने तातडीने इमारतीत घुसणे धोकादायक होते. त्यासाठी खास ट्रेनींग असलेल्या टॅक्टिकल युनिटची मदत आवश्यक होती. आणि दरोडेखोरांना नेमका हाच वेळ हवा होता.

त्यांनी पैसे गोळा केले.बॅगा भरल्या. त्या हेलिकॉप्टरमध्ये चढवल्या. आणि मग...हेलिकॉप्टर पुन्हा उडाले.

ज्या मार्गाने ते आले होते,त्याच आकाशमार्गानी परत गेले. पोलिस खाली उभे होते. हेलिकॉप्टर आकाशात दूर जात होते.आणि काही मिनिटांत स्टॉकहोमच्या पहाटेच्या आकाशात ते अदृश्य झाले. संपूर्ण दरोडा साधारण अर्ध्या तासात संपला.

लुटलेली रक्कम? सुमारे ३९दशलक्ष स्वीडिश क्रोन.म्हणजे जवळजवळ ४ कोटी क्रोन आजच्या भाषेत सांगायचे तर हा कोट्यवधी रुपयांचा दरोडा होता.

शोध सुरुच होता. हेलिकॉप्टर नंतर सापडले. पण लुटलेल्या पैशांचा बहुतांश भाग गायब.काही दिवसातच दरोडेखोरांना पोलीसांनी पकडले. त्यांची रवानगी जेलमध्ये झाली. पण ही कथा सांगण्याचा उद्देश पैशांबद्दल नाही.आता बघा,आज एखादी कंपनी आपली सुरक्षा मजबूत करते तेव्हा ती काय करते?

कंपनी CCTV कॅमेरे लावते.गार्ड ठेवते.अलार्म बसवते.दरवाजे मजबूत करते. सायबर सुरक्षेसाठी फायरवॉल उभी करते.

पण हेलिकॉप्टर दरोडा एक वेगळाच अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतो तो असा की सुरक्षा व्यवस्थेने ज्या हल्ल्याची तयारी केली आहे, तोच हल्ला शत्रू करेल याची खात्री आहे का? हा प्रश्न कधीच लक्षात घेतला नव्हता.

कॅश डेपोची सुरक्षा जमिनीवरून येणाऱ्या दरोडेखोरांसाठी मजबूत होती. पण दरोडेखोर छतावरून आले.

पोलिसांची प्रतिक्रिया वेगवान होती. पण त्यांच्या हेलिकॉप्टरला आधीच अडवले गेले.

पोलिसांच्या गाड्या तयार होत्या. पण रस्त्यावर अडथळे आधीच टाकले गेले होते.

म्हणजे दरोडेखोरांनी सुरक्षा भेदली नाही तर त्यांनी सुरक्षा व्यवस्थेच्या गृहीतकांना भेदले.

Business strategy मध्ये याला एक साधा धडा आहे—

Security म्हणजे फक्त भिंत मजबूत करणे नाही; तर समोरचा माणूस तुमच्या भिंतीला कुठून वळसा घालू शकतो, याचा विचार करणे.दरोडेखोरांनी डेपोची तिजोरी फोडण्यापूर्वी एक वेगळीच तिजोरी उघडली होती— पोलिसांच्या प्रतिसादाची.

त्यांनी सिस्टमचा अभ्यास केला. तिची ताकद समजून घेतली. मर्यादा शोधल्या. आणि मग त्या मर्यादांभोवती आपला संपूर्ण प्लॅन आखला.

म्हणूनच हा दरोडा आजही जगातील सर्वात धाडसी चोरींपैकी एक मानला जातो. कारण त्या दिवशी चोरांनी फक्त पैसे चोरले नव्हते. त्यांनी वेळ चोरला होता. पोलिसांचा प्रतिसाद देण्याचा वेळ!

आणि सुरक्षेच्या जगात कधी कधी... सगळ्यात महागडी चोरी पैशांची नसते.

ती असते—तुमच्या सिस्टममधल्या काही मिनिटांची.

(या कथेवर आधारित नेटफ्लिक्सने The Helicopter Heist. ही डॉक्युमेंटरी बनवली आहे.

वेळ असेल तेव्हा नक्की बघा !)

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका
लाइफस्टाइल

ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका

मध्ययुगीन काळात हात धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'अ‍ॅक्वामॅनिल' झारीची आणि त्यावर कोरलेल्या ॲरिस्टॉटल-फिलीसच्या कथेची गोष्ट.

१६ ऑक्टोबर, २०२६

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!
विज्ञान

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!

प्रकाशाच्या साहाय्याने मेंदूतील पेशींचे नियंत्रण करणाऱ्या 'ऑप्टोजेनेटिक्स' तंत्रज्ञानाचा शोध आणि २०२६ च्या नोबेल पुरस्काराची रंजक गोष्ट.

६ ऑक्टोबर, २०२६