आग्रा :२७ फेब्रुवारी १८१५ची रात्र. यमुनेच्या काठावर पांढरा ताजमहाल चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेला.ब्रिटिश गव्हर्नर-जनरल लॉर्ड हेस्टिंग्ज आपल्या कुटुंबासह ताज पाहायला आले होते. त्यांच्या डायरीत त्या रात्रीची नोंद आहे—निःशब्द रात्र, शुभ्र संगमरवरावर पडलेला चंद्राचा प्रकाश आणि त्या दृश्याने भारावलेले पाहुणे.
पण त्या क्षणी त्यांच्यासोबत आणखी एक माणूस तिथे होता—सीताराम. त्याच्या हातात बंदूक नव्हती, राजकीय सत्ता नव्हती, मोठे नाव नव्हते. होते ते फक्त कागद, रंग आणि कुंचला. आणि त्याने त्या रात्रीचा ताज कागदावर अनेक शतकं जिवंत ठेवला
पुढच्या दिवशी हेस्टिंग्जचा ताफा आग्र्याहून निघाला.सीताराम मात्र त्या दृश्याला मनात घेऊन पुढे गेला. पुढील काही महिन्यांत त्याने आपल्या जलरंगांतून उत्तर भारताचा एक असा दृश्य-इतिहास तयार केला, जो आज अनेक शतकांनंतरही आपल्याला त्या काळात घेऊन जातो.
हेस्टिंग्जचा प्रवासही विलक्षण होता. १८१४-१५मध्ये कलकत्त्याजवळच्या बॅरकपूरपासून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत आणि तिथून दिल्ली, आग्रा मार्गे पुन्हा कलकत्त्यापर्यंत—सुमारे पंधरा महिन्यांचा प्रवास. ब्रिटिश सत्ता ज्या प्रदेशावर विस्तारत होती, त्या प्रदेशाची पाहणी, भारतीय राजे-वजीरांशी भेटी आणि वाटेत दिसणारी वास्तू, नद्या, डोंगर, शहरं आणि निसर्ग यांची नोंद.
या संपूर्ण प्रवासासाठी हेस्टिंग्जने सीतारामला सोबत घेतले. आजच्या भाषेत सांगायचे तर तो एक प्रकारचा ‘travelling visual documentarian’ होता.
पण सीताराम केवळ चित्रांची नोंद करत नव्हता. त्याची नजर भारतीय होती. म्हणूनच त्याची चित्रे त्या काळातील युरोपीय कलाकारांच्या चित्रांपेक्षा वेगळी दिसतात. इंग्रजी शैलीचा प्रभाव असूनही भारतीय प्रकाश, रंग आणि तपशील यांच्यावर त्याची स्वतःची पकड होती.
साधारण अडीच वर्षांत एकूण २२९ जलरंगचित्रे. दहा अल्बम. हा प्रकल्प पूर्ण झाला; त्यातील जवळपास निम्मा काळ प्रवासात गेला.
सीतारामने आग्र्याचा ताज वेगवेगळ्या कोनांतून, वेगवेगळ्या वेळेला टिपला. सकाळचा ताज, दिवसाचा ताज, संध्याकाळचा ताज आणि—सर्वांत मोहक—चंद्रप्रकाशातील ताजमहाल .
पण कथा इथे संपत नाही.
ही २२९ चित्रे ब्रिटनला गेली आणि पुढे तब्बल १५० वर्षे जणू इतिहासाच्या अंधाऱ्या कपाटात हरवून गेली.
हेस्टिंग्जच्या मुलीला हा संग्रह वारशाने मिळाला. पुढे तिचे लग्न स्कॉटलंडमधील ब्यूट घराण्यात झाले आणि अल्बम Mount Stuart House येथे गेले. १९७४मध्ये या दहा अल्बमपैकी दोन लिलावात आले. त्यानंतर संशोधकांना या संग्रहाचा मागोवा घेता आला.१९९५मध्ये उरलेले आठ अल्बम ब्रिटिश लायब्ररीने मिळवले. अशा प्रकारे दोन शतकांपूर्वी भारतीय भूमीवर एका भारतीय कलाकाराने काढलेली चित्रे पुन्हा जगासमोर आली.
त्या रात्री ताजमहाल चंद्रप्रकाशात उभा होता.हेस्टिंग्जने तो पाहिला.
सीतारामने तो चित्रात बंदिस्त केला.आणि काळाने त्या चित्राला १५० वर्षे लपवून ठेवले.
पण काही सौंदर्यांना काळ कायमचे हरवू शकत नाही.ते फक्त थोडा वेळ लपवू शकतो.






