४ लाख १३ हजार ७९३! हा आकडा वाचायला एखाद्या शहराची लोकसंख्या वाटू शकते,पण ही संख्या आहे चोरीला गेलेल्या किटकॅट चॉकलेटच्या बारची. एकूण वजन करायचंच झालं, तर चक्क १२ टन!
हे ऐकल्यावर कल्पनेच्या भराऱ्या मनात सुरु झाल्या.
कदाचित एका तरुण मुलाने आपल्या प्रेयसीला लग्नासाठी विचारलं, तेव्हा तिने एक अजब अट घातली असेल .ती म्हणाली असेल , "मी तुला 'हो' म्हणेन, पण एका अटीवर... मला पुढच्या ५ वर्षांसाठी पुरेल एवढा किटकॅटचा स्टॉक हवाय!" आता या पठ्ठ्याने ही अट मनावर घेऊन हा डाका घातला असेल.
किंवा एखाद्या मुलाला त्याचे आवडते गाणे 'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला' प्रत्यक्षात आणायचे असेल म्हणून त्यानी ही गेम केली असेल.
पण जे घडलं ते ऐकून पोलिसांपासून कंपनीपर्यंत सगळेच चक्रावून गेले आहेत.त्याचं झालं असं की, स्विस फूड जायंट 'नेसले' (Nestlé) कंपनीचा एक भलामोठा ट्रक इटलीच्या कारखान्यातून पोलंडच्या दिशेने निघाला होता. या ट्रकमध्ये किटकॅटचे तब्बल ४ लाख १३ हजार ७९३ बार भरलेले होते. पण हा ट्रक पोलंडला पोहोचलाच नाही. वाटेतच तो 'मिस्टर इंडिया'सारखा गायब झाला.
ही चोरी साधीसुधी नव्हती. नेसले कंपनीने यावर एक अतिशय मिश्किल पण तितकीच गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. कंपनी म्हणाली, "चोरांची चव (Taste) एकदम क्लास आहे, हे आम्हाला मान्य आहे. पण मालाची चोरी होणं ही व्यवसायासाठी डोकेदुखी ठरतेय."
तुम्ही विचार करत असाल की, चोरांनी सोनं-चांदी किंवा महागडे आयफोन्स सोडून चॉकलेटच्या मागे का लागावं?
तर यामागचं डोकं एकदम 'शार्प' आहे. जर तुम्ही एखादा महागडा फोन चोरी केला, तर त्याला 'IMEI' नंबर असतो, तो रिमोटली लॉक करता येतो किंवा ट्रॅक करता येतो. पण चॉकलेटच्या बॉक्सला असा कोणताही युनिक नंबर नसतो. एकदा का वेष्टन फाडून चॉकलेट पोटात गेलं की पुरावा कायमचा नष्ट!
गोष्ट अशी आहे की, जगभरात आता 'कार्गो थेफ्ट' म्हणजे मालाच्या गाड्या लुटण्याचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. चोरी होणाऱ्या मालामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूंचा वाटा तब्बल २२% आहे. कारण काय? तर या वस्तू विकणं सर्वात सोपं असतं. कोणाला संशयही येत नाही आणि मागणी तर प्रचंड असते.
असाच एक प्रकार अमेरिकेत घडला होता, जिथे चोरांनी चक्क ३ लाख २५ हजार डॉलर्स किमतीचे गोठवलेले खेकडे (Frozen Crabs) लंपास केले होते.
आता या किटकॅट चोरीमुळे युरोपमध्ये 'ईस्टर' सणापूर्वी चॉकलेटचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेसलेने आता चोरांना पकडण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे. प्रत्येक चॉकलेट बारवर एक विशेष 'बॅच कोड' असतो. जर कोणी हे चोरलेलं चॉकलेट विकायला काढलं, तर ग्राहक तो कोड स्कॅन करून कंपनीला सावध करू शकतात.
पण सध्या तरी, त्या १२ टन चॉकलेटचं काय झालं, हे एक गूढच आहे. त्या प्रेयसीला तिचा ५ वर्षांचा स्टॉक मिळाला की चोरांनीच आपली 'ब्रेक' एन्जॉय केली, हे अद्याप समजलेलं नाही.
चोरीला गेलेल्या आयफोनचा माग काढता येतो, पण पोटात गेलेल्या चॉकलेटचा पुरावा फक्त समाधानाच्या ढेकरे तच उरतो.








