मराठी माणसाच्या घरात मी कधीच हिरे किंवा मौल्यवान रत्ने बघीतली नाहीत.मराठी कुटुंबांचा सगळा भर सोन्याच्या दागीन्यावरच ! तोडे -पाटल्या -बिलवर -वाकी -ठुशी -तन्मणी- बाजूबंद -चपला हार -पोहेहार -बोरमाळ जेव्हढ्या प्रकारचे दागीने बघीतले त्यात खरी रत्ने काही बघायला मिळाली नाहीत.मोत्यांचा वापर मात्र बर्याच ठिकाणी दिसला त्यापैकी काही मोती तर बसराच्या दर्जाची होती.तन्मण्याच्या खोडात किंवा नथीत जे काही बघीतले ते साधे शोभीवंत खडे.याचं एक कारण कदाचित असं असावं की सोनं मोडल्यावर जी किंमत मिळते ती रत्नांना मिळत नाही.गेल्या
दोन -अडीचशे वर्षाततली मराठी माणसाची आर्थिक स्थिती बघता हिर्यापेक्षा सोनं 'विमा' म्हणून वापरलं जात होतं.याचा अर्थ असा नाही की मराठ्यांकडे जडजवाहिर नव्हते पण लढाया आणि दुष्काळ यांना कायम तोंड देता देता संग्रहाला वेळ मिळाला नाही हे खरेच!
पेशवाई संपल्यावरचा आढावा घेतला तर पेशव्यांपेक्षा त्यांचे सरदार जास्त श्रीमंत होते.तरीसुध्दा पेशवाईत रत्नांचा बर्यापैकी संग्रह असावा .
थोरले माधवराव पेशवे जेव्हा गेले तेव्हा सती रमाबाईंनी जो धर्मादाय केला त्यात हातातल्या कंगन्या(जास्त रुंद नसलेल्या बांगड्या )बाळशास्त्रींच्या पत्नीस दिल्या.त्यात पंचेचाळीस हिरे आणि चौर्याण्णव हिरकण्या होत्या.त्यांनी एक हिर्याची अंगठी पटवर्धनांना दिली ज्यात आतमध्ये गणपतीची मूर्ती होती.माधवरावांची स्मरणी मोत्यांची होती ज्याची किंमत त्याकाळात पाच हजाराच्या वर होती.
ह्या सगळ्या वस्तू वैयक्तीक वापरातील असल्यामुळे खजीन्याची कल्पना त्यावरून येणार नाही.
यासाठी १८५८ साली नानासाहेबांचा खजीना ब्रिटीशांनी कानपूरच्या विहीरीततून पाणी उपसून काढला त्याची जंत्री बघा.
"विहीरीच्या तळाशी लाकडी ओंडके अडकवून त्याखाली अनेक सोन्याच्या लाद्या दाबून ठवल्या होत्या.त्या लाद्या काढल्यावर चांदीची अंबारी नजरेस पडली अंबारीच्या खाली दारुगोळ्यांच्या पेट्या होत्या .या पेट्यांमध्ये सोन्याची नाणी भरून ठेवली होती. त्या दिवशी अंदाजे दोन लाख पौंडाची संपती बाहेर काढण्यात लष्कराला यश मिळाले. "
सन १८५८ मध्ये नानासाहेब पेशवे नेपाळ नरेशाच्या आश्रयाला गेले.जो पत्रव्यवहार उपलब्ध आहे त्यावरून जंगबहादूरानी पेशव्यांना आश्रय देण्याचे नाकारले होते.नेपाळ आणि ब्रिटिशांच्या कराराप्रमाणे 'जे ब्रिटीशांचे शत्रू ते नेपाळचे शत्रू' अशी त्यांची निती होती.
तरी पण मग नानासाहेबांना नेपाळमध्ये आश्रय कसा मिळाला .हा फार रंजक किस्सा आहे.
नानासाहेब नेपाळजवळ देवंदारीला गेले तेव्हा केदारनाथ नावाच्या अधिकार्याने त्यांचे स्वागत केले.काही वेळानी जंगबहादूराचे म्हणजे नेपाळच्या पंतप्रधांनाचे आगमन झाले.त्यानी नानासाहेबांना सांगीतले की काशी बाई (नानांची पत्नी )आणि इतर बायका नेपाळात राहू शकतात पण नाना नाही.त्यानंतर नानांनी पाचू ,हिरे माणिक,मोती यांनी जडवलेला नवलखा हार काढून जंगबद्दूराला दिला.जंगबहाद्दूरानी फारच कमी किंमत सांगितल्यावर काशीबाईंनी वाटाघाटी केल्या आणि नवलखा हाराच्या मोबदल्यात नियमीत करभरणा मिळतील अशी काही गावे मागून घेतली.
त्यानंतर जंगबहादूरानी नानांच्या नेपाळात असण्याकडे दुर्लक्ष करण्याचे मान्य केले.याच पध्दतीने नानांकडे असलेला तीन इंच लांबीचा पाचू पण जंगबहाद्दूराकडे गेला.उतरणीच्या शेवटच्या पायरीवर नानांकडे एव्हढी संपती होती तर पेशवाईच्या ऐन भरात काय असेल त्याची कल्पना करा.
नानासाहेब पेशव्यांच्या नवलखा हाराचे पुढे काय झाले ? हिरे- मोती , पाचू आणि माणके यांच्या जडावात असलेला नवलखा हार त्या काळात जगातला अत्यंत मोठा ठेवा समजला जायचा.हा हार पहिल्या बाजीरावाने त्या काळात नऊ लाखात बनवून घेतला होता.नानासाहेबांकडून नवलखा हार मिळाल्यावर जंगबहाद्दूरांनी त्यातले मोठे हिरे - पाचू आणि माणके काढून घेतली आणि हार छोट्या मापाचा केला.१९०१ साली जंगबहादूराच्या कुटुंबाला पैशाची चणचण होती म्हणून त्यांनी हा नवलखा हार दरभंगाच्या मजाराजांना विकून टाकला.
सोबतच नानांसाहेबांनी दिलेला तीन इंच लांबीचा पाचू ज्याला शिरोमणी म्हटले जायचे तो पण दरभंगाच्या महाराजांनी विकत घेतला.
(सोबतचा फोटो दरभंग्याचे महाराज कमलेश्वर यांचा आहे. त्यांच्या गळ्यातला नवलखा हार आपण बघू शकतो.)






