नऊ दिवस नऊ साड्या — भारताच्या वस्त्रवैभवाची रंगयात्रा
पहिला दिवस : महेश्वरी साडी — अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीने विणलेला वारसा!
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण भेट देणार आहोत अशा एका साडीला, जिच्या प्रत्येक धाग्यात इतिहास आहे, प्रत्येक काठात कलात्मकता आहे आणि प्रत्येक पदरात आहे एका समृद्ध परंपरेची कहाणी!
महेश्वर - नर्मदेच्या काठावर वसलेलं एक ऐतिहासिक शहर !इथल्या हातमागावर विणली जाणारी महेश्वरी साडी म्हणजे भारतीय वस्त्रपरंपरेचा एक देखणा आविष्कार!
राणी अहिल्याबाईंची दूरदृष्टी: महेश्वरी साडीचा इतिहास अठराव्या शतकातील महेश्वरशी आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या आश्रयाशी जोडलेला आहे.अहिल्याबाईंनी महेश्वरला आपली राजधानी बनवल्यानंतर शहरातील कला,कारागिरी आणि वस्त्रनिर्मितीला प्रोत्साहन दिलं.राजस्थान - गुजरात या राज्यांतून त्यांनी विणकर कारागिर आणले. सोबतच स्थानिक विणकाम परंपरेला राजाश्रय दिला.त्यामुळे महेश्वरी वस्त्रकलेला नवी ओळख मिळाली.अहिल्याबाईंच्या काळात विकसित झालेल्या या परंपरेने पुढे अनेक पिढ्यांच्या हातांतून प्रवास केला. ही कला आज भारताच्या हातमाग वारशाचा महत्त्वाचा भाग बनली आहे.
हलकी, नाजूक;पण रुबाब मात्र राजेशाही!
महेश्वरी साडीचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे तिचा हलकेपणा. भरजरी साड्यांचा डामडौल आवडणाऱ्यांपेक्षा साधेपणातलं सौंदर्य जपणाऱ्या स्त्रियांना ही साडी विशेष भावते.
सुती आणि रेशमी धाग्यांच्या मिश्रणातून विणल्या जाणाऱ्या अनेक महेश्वरी साड्यांना एक खास चमक असते. तिचे पट्टेदार किंवा चौकटींचे नमुने, वैशिष्ट्यपूर्ण काठ आणि उठावदार पदर तिला वेगळं व्यक्तिमत्त्व देतात. काही पारंपरिक काठांना महेश्वरच्या ऐतिहासिक वास्तुशैलीतून प्रेरणा मिळालेली दिसते.या नक्षींमध्ये ‘चटई’, म्हणजे विणलेल्या चटईसारखा भास निर्माण करणारा नमुना; ‘चमेली का फूल’, म्हणजे चमेलीच्या फुलाची नाजूक आकृती; ‘ईंट’, म्हणजे विटांच्या रचनेची आठवण करून देणारा नमुना; आणि ‘हीरा’, म्हणजे हिऱ्याच्या आकाराची भूमितीय नक्षी यांचा समावेश होतो..
महेश्वरी साडीची आणखी एक खासियत म्हणजे काही प्रकारांमध्ये काठाची रचना दोन्ही बाजूंनी आकर्षक दिसते. त्यामुळे तिचं सौंदर्य केवळ समोरूनच नव्हे, तर पदर आणि काठाच्या हालचालींतूनही खुलतं.
जांभळा, हिरवा, निळा, गुलाबी, लाल किंवा सौम्य सोनेरी छटा—प्रत्येक रंगात ही साडी वेगळाच साज धारण करते. नवरात्रीच्या पूजेला, कार्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमाला किंवा एखाद्या छोटेखानी समारंभाला ती सहज शोभून दिसते.
साडीच्या पदरात जपलेला वारसा : आजच्या फॅशनच्या जगात ट्रेंड बदलतात, रंग बदलतात, डिझाइन बदलतात. पण हातमागावर विणलेल्या साडीचं आकर्षण काळाच्या पलीकडे टिकतं. तिच्यात स्थानिक मातीचा गंध असतो, इतिहासाची साक्ष असते आणि कारागिराच्या श्रमांचा सन्मान असतो.
या नवरात्रीत महेश्वरी साडी नेसताना केवळ एक सुंदर वस्त्र परिधान करू नका; तिच्यामागची कहाणीही जाणून घ्या. तिच्या काठाकडे पाहताना अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीची आठवण ठेवा आणि तिच्या प्रत्येक धाग्यात विणकराच्या कष्टांचा सन्मान शोधा.
नऊ दिवस, नऊ साड्या — ही केवळ फॅशनची रंगयात्रा नाही. हा भारताच्या सांस्कृतिक वैभवाला आणि आपल्या परंपरा जिवंत ठेवणाऱ्या हातांना केलेला सलाम आहे!






