मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र

4 मिनिट वाचन

१९९१ च्या गल्फ वॉरमध्ये जळालेल्या इराकी सैनिकाचे छायाचित्र घेणारे केनेथ जारेके आणि त्या एका फोटोने मांडलेले युद्धाचे विदारक वास्तव.

शेअर करा:
गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र

ते छायाचित्र-

केनेथ जारेके नावाच्या एका फोटोग्राफरने काढलेला हा फोटो जिवंतपणी जळून होरपळून गेलेल्या गेलेल्या एका इराकी सैनिकाचा होता. हा फोटो पाहिल्यावर अमेरिकन लोकांचा गल्फ वॉरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. पण अमेरिकेतील माध्यमांनी हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यास नकार दिला.

फेब्रुवारी १९९१.कुवेतच्या दिशेने जाणारा रस्ता मागे पडला होता. आता त्या रस्त्यावर परतीची घाई होती.हजारो इराकी सैनिक कुवेत सोडून इराकच्या दिशेने पळत होते. कुणी ट्रकमध्ये, कुणी लष्करी वाहनांत, तर कुणी ज्या वाहनाला हात लागेल त्यात बसून. काहींना कदाचित वाटत होते—युद्ध संपत आले आहे. आता घरी जाता येईल.

पण त्या रात्री तो रस्ता घरी जाण्याचा रस्ता राहिला नाही.आकाशातून हल्ला झाला. वाहनांचा लांबच लांब ताफा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. रस्ता वाहनांनी, धुराने आणि मृतदेहांनी भरून गेला.काही वेळाने तिथे शांतता पसरली.

आणि मग तिथे एक छायाचित्रकार पोहोचला.

केनेथ जारेके.

त्याच्या समोर एक जळून खाक झालेले लष्करी वाहन होते.आत एक सैनिक होता.

तो सैनिक आता जवळजवळ माणूस दिसत नव्हता. आगीने त्याचे शरीर काळवंडून टाकले होते. चेहऱ्यावरचे मांस जळून गेले होते. डोळे नव्हते—पण त्याची नजर जणू अजूनही कॅमेऱ्याकडे रोखलेली होती.

जारेके काही क्षण स्तब्ध उभे राहिले. कॅमेरा त्यांच्या हातात होता.

क्लिक......

एक छायाचित्र घेतले गेले.इतकेच.

पण त्या एका क्लिकमध्ये संपूर्ण युद्ध सामावले होते.

तो सैनिक कोण होता?

आपल्याला माहीत नाही.

कदाचित तो सद्दाम हुसेनचा कट्टर समर्थक असेल.

कदाचित त्याला सैन्यात भरती करण्यात आले असेल.

कदाचित तो बगदादच्या एखाद्या गरीब घरातील तरुण असेल, ज्याच्यासमोर सैन्यात जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नसेल.

त्याचे नाव काय होते?

आई-वडील कोण होते?

त्याला मुलं होती का?

त्याची पत्नी त्याची वाट पाहत होती का?

युद्ध संपल्यावर तो घरी परत येईल, अशी कुणाची तरी आशा होती का?

त्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्याच्यासोबतच कायमची जळून गेली होती.

पण छायाचित्र जळले नाही.ते अमेरिकेत पाठवण्यात आले.

आणि तिथे एक वेगळे युद्ध सुरू झाले. हे छायाचित्र छापायचे की नाही? काही संपादकांना ते अतिशय भीषण वाटले.

युद्धातील मृत्यू दाखवायचा किती? लोकांना सत्य दाखवायचे किती?

त्यांना युद्धाची स्वच्छ, निर्जीव चित्रं दाखवायची होती —दूरवरून दिसणारे बॉम्ब, आकाशात उडणारी विमानं, नकाशावर सरकणाऱ्या सैन्याच्या रेषा वगैरे वगैरे ...पण मृत सैनिकाचा चेहरा दाखवायचा नाही.

कारण तो चेहरा प्रश्न विचारतो.

“युद्ध म्हणजे नेमकं काय?”

बॉम्ब?

रणनीती?

विजय?

की एखाद्या अनोळखी माणसाचे जळालेले शरीर?

अमेरिकन माध्यमांनी ते छायाचित्र त्या वेळी प्रकाशित केले नाही. पण ब्रिटनमधील The Observer ने ते छापले. त्याखाली जणू एकच संदेश होता—

हे युद्धाचे खरे रूप आहे. नंतर हे छायाचित्र जगभर पोहोचले.

१९९२ मध्ये World Press Photo ने त्याला पुरस्कारही दिला.पण या कथेचा सर्वात अस्वस्थ करणारा भाग पुरस्कार नव्हता.

तो होता—छायाचित्रकाराचा प्रश्न. जारेके यांनी एकदा म्हटले होते:

“If we’re big enough to fight a war, we should be big enough to look at it.”

म्हणजे—

“आपण युद्ध करण्याइतके मोठे असू, तर ते युद्ध प्रत्यक्ष पाहण्याइतकेही मोठे असायला हवे.”

त्या सैनिकाचे नाव आपल्याला आजही माहीत नाही. त्याची बाजू आपल्याला माहीत नाही.

तो दोषी होता की बळी—हेही कदाचित आपण कधीच ठरवू शकणार नाही.

पण त्याचा जळालेला चेहरा मात्र इतिहासाच्या कॅमेऱ्यात कायमचा अडकून राहिला.

कारण युद्धाच्या विजयाची अनेक छायाचित्रे असतात.

पण पराभूत माणसाचा मृत चेहरा—युद्धाची किंमत सांगणारे छायाचित्र असते.

आणि कधी कधी,एक छायाचित्र हजार भाषणांपेक्षा जास्त सत्य सांगते.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

सॅन फ्रान्सिस्कोचा 'सम्राट': जोशुआ नॉर्टनची अजब गजब सत्ता!
लाइफस्टाइल

सॅन फ्रान्सिस्कोचा 'सम्राट': जोशुआ नॉर्टनची अजब गजब सत्ता!

१८५९ मध्ये स्वतःला अमेरिकेचा सम्राट घोषित करणाऱ्या जोशुआ नॉर्टनच्या लहरीपणाचा संपूर्ण सॅन फ्रान्सिस्कोने २१ वर्षे प्रेमाने आदर केला.

२५ ऑगस्ट, २०२६

बँका स्वतःच स्वतःचं 'मुंडण' का करून घेतात? समजून घ्या हेअरकटचं गणित
लाइफस्टाइल

बँका स्वतःच स्वतःचं 'मुंडण' का करून घेतात? समजून घ्या हेअरकटचं गणित

बड्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ करताना बँका 'हेअरकट' कसा घेतात आणि सर्वसामान्यांवर याचा काय परिणाम होतो? सविस्तर विश्लेषण.

१ सप्टेंबर, २०२६

खिशातल्या 5G क्रांतीचा खरा जनक: आरोग्यस्वामी पॉलराज यांची थक्क करणारी गोष्ट!
विज्ञान

खिशातल्या 5G क्रांतीचा खरा जनक: आरोग्यस्वामी पॉलराज यांची थक्क करणारी गोष्ट!

भारतीय नौदलात सोनाव यंत्रणा विकसित करून पुढे स्टॅनफोर्डमध्ये वायरलेस डेटाचा वेग वाढवणाऱ्या 'MIMO' तंत्रज्ञानाचा शोध लावणारे पॉलराज यांची गोष्ट.

२५ ऑगस्ट, २०२६

भारतीय प्रमाण वेळ मिर्झापूरच्या हातात कशी आली?
विज्ञान

भारतीय प्रमाण वेळ मिर्झापूरच्या हातात कशी आली?

भारताची प्रमाणवेळ ठरवणारा रेखांश उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमधूनच का जातो? जाणून घ्या भारतीय प्रमाणवेळेचा (IST) रंजक इतिहास आणि गणित.

१ सप्टेंबर, २०२६