मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

अडीच मिनिटांत विमान अपहरणाचा थरार संपवणारा पायलट: उरी बार-लेव्ह

4 मिनिट वाचन

एका धाडसी पायलटच्या प्रसंगावधानामुळे आकाशातच हायजॅकर्सचा डाव उलथवून लावणारी एल अल फ्लाईट २१९ ची थरारक कथा.

शेअर करा:
अडीच मिनिटांत विमान अपहरणाचा थरार संपवणारा पायलट: उरी बार-लेव्ह

६ सप्टेंबर १९७० रोजी कॅप्टन उरी बार-लेव्ह ॲमस्टरडॅमहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एल -अलच्या प्रवासी विमानाचे उड्डाणाची तयारी करत होते. या फ्लाईट्ची (El Al Flight 219 ) सुरुवात तेल अवीवहून झाली होती आणि ॲमस्टरडॅम हा त्यातील दुसरा टप्पा होता.

उड्डाणापूर्वी शिफोल विमानतळावरील एका सुरक्षा अधिकाऱ्याने बार-लेव्ह यांना चार प्रवासी संशयास्पद दिसत आहेत असं सांगितलं. त्यापैकी दोघांकडे सेनेगलचे पासपोर्ट होते आणि त्या दोन्ही पासपोर्टचे क्रमांक सलग होते.उरलेल्या दोघांकडे होंडुरासचे पासपोर्ट होते. विशेष म्हणजे या चौघांनीही विमानाचे तिकीटं अगदी शेवटच्या क्षणी काढली होती.

बार-लेव्ह यांनी सेनेगलच्या दोन्ही प्रवाशांना विमानात चढू दिलं नाही.होंडुरासचे पासपोर्ट असलेल्या दोघांची कसून तपासणी करायला विमातळाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं पण ती तपासणी प्रत्यक्षात झालीच नाही!

बार-लेव्ह यांना वाटले की ते दोघं सुरक्षा तपासणीतून निर्दोष ठरले आहेत. तरीपण त्यांनी खबरदारी म्हणून सुरक्षा अधिकारी अविहू कोल यांना फर्स्ट क्लासमध्ये बसण्याऐवजी कॉकपिटमध्ये आपल्या सोबत राहण्यास सांगितलं.

त्या काळात विमानांचे अपहरण वारंवार होत होते. १९६८ मध्ये एल अलच्या अल्जेरियाला जाणाऱ्या विमानाचं अपहरण झाल्यानंतर कंपनीने आपल्या प्रत्येक विमानात सशस्त्र सुरक्षा अधिकारी ठेवण्याची पद्धत सुरू केली होती.

विमान २९,००० फूट उंचीवर पोहोचत असतानाच कॉकपिटमधला आपत्कालीन दिवा लागला.

बार-लेव्ह यांना क्षणात समजलं—विमानाचे अपहरण झालं आहे!

आणि त्यांचा संशय खरा ठरला. विमानात चढलेले तेच दोघे ‘होंडुरन’ अपहरणकर्ते होते.

त्याच वेळी एका फ्लाइट अटेंडंटने इंटरकॉमवरून घोषणा केली की, दोन व्यक्ती बंदुका आणि हातबॉम्ब घेऊन कॉकपिटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आत येऊ दिले नाही, तर ते विमानातील सर्व प्रवाशांना ठार मारतील.

फ्लाइट इंजिनियर उरी झाख यांनी कॉकपिटच्या छोट्या झरोक्यातून बाहेर पाहिले.त्यांना एका अपहरणकर्त्याच्या हातात बंदूक दिसली—आणि जी एका अपहरणकर्त्याने महीला फ्लाइट अटेंडंटच्या डोक्यावर रोखलेली होती.

तो अपहरणकर्ता होता पॅट्रिक आर्ग्युएलो. तो Popular Front for the Liberation of Palestine (PFLP) शी संबंधित होता. त्याच्यासोबत असलेली दुसरी अपहरणकर्ता होती लीला खालिद.

फ्लाइट अटेंडंटने बार-लेव्ह यांना सांगितले की, त्यांनी कॉकपिटचे दार उघडले नाही तर आर्ग्युएलो तिला ठार मारणार आहे.

आता बार-लेव्ह यांच्यासमोर काही सेकंदांत निर्णय घेण्याचे आव्हान होते.

त्या काळी एल अलच्या वैमानिकांना अशा परिस्थितीत अपहरणकर्त्यांशी संघर्ष करण्याऐवजी त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. कारण पायलटने ‘हिरो’ बनण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती बिघडली, तर शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ शकत होते.

पण बार-लेव्ह साधेसुधे पायलट नव्हते. १९४८ च्या स्वातंत्र्ययुद्धात ते किशोरवयीन असतानाच वैमानिक म्हणून काम करत होते आणि १९५६ च्या युद्धातही त्यांनी सेवा बजावली होती.

त्यांनी निर्णय घेतला. “हे माझ्या विमानाचे अपहरण करू शकणार नाहीत!” आणि त्यानंतर त्यांनी जे केले, ते जवळजवळ अविश्वसनीय होते.

बार-लेव्ह यांनी दुसऱ्या महायुद्धातील लढाऊ विमानांच्या “Split-S” या युद्धतंत्रासारखी अचानक हालचाल केली आणि विमानाचे नाक खाली झुकवत जोरदार डाईव्ह सुरू केला. विमान तब्बल १०,००० फूट खाली—फक्त एका मिनिटात!

सीटबेल्ट लावून बसलेले प्रवासी आपल्या जागी सुरक्षित राहिले; पण विमानातील अपहरणकर्त्यांचा तोल गेला आणि ते अक्षरशः जमिनीवर फेकले गेले.बार-लेव्ह यांनी विमानावर नियंत्रण मिळवताच सुरक्षा अधिकारी अविहू कोल यांनी क्षणाचाही विलंब न करता आर्ग्युएलोला ठार केले.लीला खालिदने विमानाच्या लॉबीत एक हॅंडग्रेनेड फेकून दिला. सुदैवाने तो फुटलाच नाही. काही क्षणांतच ती बेशुद्ध पडली आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिला अटक केली.आणि हे सर्व घडले तेव्हा विमानाच्या उड्डाणाला सुरुवात होऊन अवघे अडीच मिनिटे झाली होती!

एका पायलटने काही सेकंदांत घेतलेला धाडसी निर्णय—आणि १०,००० फूटांची ती अचानक झेप—यामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.

(आपण पायलट नाही आहोत पण आयुष्यातल्या इतर अनेक संकट काळात वापरायचे Split-S तंत्र तुमच्याकडे तयार ठेवले आहे का ?)

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

१७० वर्षांपूर्वीचा 'तो' कायदा आणि आजही सुरू असलेला लढा: विधवा विवाहाची क्रांती!
लाइफस्टाइल

१७० वर्षांपूर्वीचा 'तो' कायदा आणि आजही सुरू असलेला लढा: विधवा विवाहाची क्रांती!

ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या प्रयत्नांमुळे १८५६ मध्ये आलेला हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा आणि भारतीय स्त्रीच्या हक्कांचा सुरू असलेला संघर्ष.

१६ जुलै, २०२६

१८ बाय १४ फुटांची अंधारकोठडी आणि भारताची गुलामी: 'ब्लॅक होल ऑफ कलकत्ता'
लाइफस्टाइल

१८ बाय १४ फुटांची अंधारकोठडी आणि भारताची गुलामी: 'ब्लॅक होल ऑफ कलकत्ता'

१७५६ मधील ब्लॅक होल ऑफ कलकत्ता घटनेचा ब्रिटिशांनी कसा प्रोपोगंडा म्हणून वापर केला आणि भारताच्या गुलामीचा पाया रचला गेला.

२० जून, २०२६

जगातल्या प्रत्येक अ‍ॅव्होकॅडोमागे दडलेली आहे एका पोस्टमनची १०० वर्ष जुनी गोष्ट!
लाइफस्टाइल

जगातल्या प्रत्येक अ‍ॅव्होकॅडोमागे दडलेली आहे एका पोस्टमनची १०० वर्ष जुनी गोष्ट!

आज जगभरात खाल्ल्या जाणाऱ्या ८०% हून अधिक हास अ‍ॅव्होकॅडोचा शोध रुडॉल्फ हास नावाच्या साध्या पोस्टमनने कसा लावला?

२० जून, २०२६