प्लास्टिकमुक्त पाण्याचं 'मॅग्नेटिक' स्वप्न:व्हर्जिनियातल्या एका पोरीने जगाला दाखवलेला आरसा
तुम्ही दिवसाला आठ पेले पाणी पिताय म्हणजे तुम्ही आरोग्यदायी जीवन जगताय,हा तुमचा गोड गैरसमज आहे. वास्तविक,तुम्ही दरवर्षी एका क्रेडिट कार्डच्या वजनाइतके प्लास्टिक नकळत पोटात ढकलत आहात.हे वाचून कदाचित तुमची तहान पळेल,पण हेच आजचं विदारक सत्य आहे.आपण ज्याला 'शुद्ध' पाणी समजतो,त्यात डोळ्यांना न दिसणारे प्लास्टिकचे कण म्हणजेच मायक्रोप्लास्टिक्स एखाद्या विषासारखे भिनलेले आहेत.
व्हर्जिनियामधील मिया हेलर या हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलीने जे करून दाखवलंय,ते पाहून मोठमोठ्या सरकारी यंत्रणांनी आता लाजेनं मान खाली घालायला हवी.मियाने एक असं फिल्टर बनवलं आहे, जे पिण्याच्या पाण्यातून तब्बल ९६ टक्के मायक्रोप्लास्टिक्स बाहेर काढतं. विशेष म्हणजे,यासाठी तिने 'फेरोफ्लुइड' नावाच्या चुंबकीय तेलाचा वापर केला आहे.ही बातमी मार्च २०२६ च्या सुरुवातीलाच जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे.
आपल्याकडे महाराष्ट्रात उन्हाळा सुरू झाला की आपण 'माठातलं पाणी' किंवा 'आर.ओ. फिल्टर'च्या गप्पा मारतो.पण या साध्या वाटणाऱ्या पाण्यात १ नॅनोमीटर ते ५नॅनोमीटर आकाराचे प्लास्टिकचे तुकडे पोहत असतात,हे कुणाच्या ध्यानीमनीही नसतं.अमेरिकेच्या एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सीने (EPA) या कणांची व्याख्या केली असली, तरी त्यावर उपाय शोधण्यात सरकारी तिजोरी नेहमीच रिकामी असते.
मिया हेलरने नेमका याच मुद्द्यावर बोट ठेवलं आहे. एकदा विचार करून पाहा, हे मायक्रोप्लास्टिक्स फक्त पर्यावरणात नाहीत,तर ते आता आपल्या रक्तात, हाडांच्या आत आणि चक्क मेंदूतही पोहोचले आहेत.नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, माणसासह १३०० प्रजातींच्या शरीरात हे प्लास्टिक आढळलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, न जन्मलेल्या बाळाच्या नाळेत (placenta) आणि पुरुषांच्या वीर्यातही प्लास्टिकचे कण सापडले आहेत.१९९० पासून आपल्या शरीरातील प्लास्टिकचं प्रमाण सहा पटीने वाढलं आहे.
मियाचं हे तंत्रज्ञान सोपं आहे,पण अत्यंत हायटेक! तिने फेरोफ्लुइड नावाच्या एका अशा तेलाचा वापर केला, जे चुंबकीय आहे. हे तेल पाण्यात सोडलं की ते प्लास्टिकच्या कणांना आपल्याकडे खेचून घेतं आणि त्यांना चिकटून बसतं. मग चुंबकाच्या साहाय्याने हे तेल आणि त्याला चिकटलेलं प्लास्टिक पाण्याबाहेर काढलं जातं.
या प्रक्रियेत सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे हे तेल पाण्यापेक्षा जाड असतं.ते फिल्टरमध्ये अडकू नये आणि पाण्याचा प्रवाह व्यवस्थित राहावा, यासाठी मियाने प्रचंड मेहनत घेतली.तिने तयार केलेला प्रोटोटाइप एखाद्या पिठाच्या पिशवीच्या आकाराचा आहे.यात तीन छोटे कप्पे आहेत. पहिल्या कप्प्यात अशुद्ध पाणी असतं, दुसऱ्यात चुंबकीय तेल आणि तिसऱ्या कप्प्यात चुंबकाच्या साह्याने प्लास्टिक वेगळं केलं जातं. हे तेल पुन्हा पुन्हा वापरता येतं, हे या तंत्रज्ञानाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे.
आज बाजारात मिळणारे महागडे फिल्टर्स फक्त क्षार कमी करतात किंवा बॅक्टेरिया मारतात.पण प्लास्टिकच्या या सूक्ष्म शत्रूशी लढण्याची ताकद त्यांच्यात नाही. मियाने यासाठी एक 'टर्बिडिटी सेन्सर' देखील बनवला, जो पाण्यात किती प्लास्टिक शिल्लक आहे हे अचूक मोजतो. तिच्या या कल्पनेला २०२५ च्या रिजेनेरॉन इंटरनॅशनल सायन्स अँड इंजिनीअरिंग फेअरमध्ये गौरवण्यात आलं आणि पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस सोसायटीने तिला ५०० डॉलर्सचं विशेष बक्षीस दिलं.
आता मुद्दा असा आहे की, आपण इतके प्रगत झालो आहोत,पण एका शाळेतल्या मुलीला जे सुचलं ते कोट्यवधींचं बजेट असणाऱ्या संस्थांना का सुचलं नसावं?
मिया म्हणते की, फेरोफ्लुइड सध्या मोठ्या प्रमाणावर तयार करणं महाग आहे, म्हणून तिने हे सिस्टीम घराघरातल्या सिंकखाली बसवता येईल अशा पद्धतीने डिझाइन केलं आहे. ही मुलगी भविष्यात हे उत्पादन बाजारात आणण्यासाठी उत्सुक आहे आणि माझ्या मते, हेच खऱ्या अर्थाने 'भविष्यातलं पाणी' असणार आहे.
आपल्या महाराष्ट्रात आपण विहिरीच्या पाण्याला 'तीर्थ' मानतो. पण आज त्या विहिरींमध्येही प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. मियाचं हे संशोधन आपल्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. प्लास्टिक खाऊन आपण कॅन्सर, हृदयाचे विकार आणि अल्झायमरसारख्या आजारांना निमंत्रण देत आहोत. साध्या वाटणाऱ्या या प्लास्टिकमुळे मानवी हार्मोन्समध्येही बिघाड होत असल्याचे पुरावे आता समोर येत आहेत.
तंत्रज्ञानाची प्रगती म्हणजे , जी मानवाच्या अस्तित्वावर आलेल्या संकटाचा मुकाबला करते. मिया हेलरने दाखवून दिलंय की, वय लहान असलं तरी विचार किती मोठे असू शकतात. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की, आपण अशा तंत्रज्ञानाचं स्वागत करणार की पुन्हा एकदा 'ब्रँडेड' पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन स्वतःचं आरोग्य धोक्यात घालणार?
भविष्यात काय होणार, हे सांगणं कठीण असलं तरी एक गोष्ट नक्की,मियाने शोधलेलं हे 'मॅग्नेटिक' उत्तर प्लास्टिकच्या या महाभयंकर संकटावरचा प्रभावी तोडगा ठरू शकतं.आणखी एक गोष्ट म्हणजे, जेव्हा सरकारं हात वर करतात, तेव्हाच अशी एखादी 'मिया' उभी राहते आणि जगाला जगण्याची नवी दिशा दाखवते. आपण मात्र अजूनही प्लास्टिकच्या पिशवीत दूध आणि भाजी आणण्यातच धन्यता मानतोय, हे आपलं दुर्दैव नाही का?
तुमच्या किचनमधील सिंकखाली मियाचं हे छोटं फिल्टर लागलेले दिवस आता फार लांब नाहीत. पण प्रश्न असा उरतो की, तंत्रज्ञान प्लास्टिक गाळून काढेलही, पण आपल्या मानसिकतेत रुतलेलं प्लास्टिक आपण कधी बाहेर काढणार?








