पॉल डिरॅक : विश्वाची कोडी सोडवणारा आणि रोजच्या आयुष्यालाही समीकरणात बसवणारा विलक्षण माणूस
एखादी संध्याकाळची पार्टी सुरू आहे. लोक गप्पा मारण्यात गुंग झालेत. दुसरीकडे संगीत सुरू आहे. कुणी हसतंय, कुणी नाचतंय. वातावरण अगदी मस्त रंगात आलंय.
आणि अचानक एक गृहस्थ गंभीर चेहऱ्याने म्हणतो—
“स्त्रीचा चेहरा सर्वांत सुंदर कोणत्या अंतरावर दिसतो, याला एक निश्चित वैज्ञानिक मर्यादा असली पाहिजे.”
आजूबाजूच्या लोकांच्या गप्पांना अचानक ब्रेक लागतो.
तो गृहस्थ पुढे सांगतो—
“एखाद्या बाईचा चेहरा खूप लांब अंतरावरून नीट कळणारच नाही. पण फार जवळ गेलात, तर चेहऱ्याच्या आकारातील विकृती, सुरकुत्या वगैरे अधिक ठळक दिसतील. म्हणजे असं कुठलं तरी ‘विशिष्ट अंतर’ असणार, ज्यावरून त्या बाईचं सौंदर्य नेमकं जाणवेल. त्यालाच म्हणायचं—optimal distance!”
हे ऐकल्यावर पार्टीचा मूडच बदलणार!
गप्पा मारणारी मंडळी आजूबाजूच्या बायकांकडे बघत ‘optimal distance’ मोजायला सुरुवात करतील!
हा प्रसंग म्हणजे १९२०–३० च्या दशकातील कोपनहेगनमधल्या एका पार्टीची आठवण.
प्रसिद्ध रशियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज गॅमोव्ह यांनी हा किस्सा सांगितला आहे.
आणि त्या रंगलेल्या पार्टीला ‘optimal distance’च्या गणितात गुंतवणारा तो गृहस्थ म्हणजे—भौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक!
पॉल डिरॅक अगदी खऱ्या अर्थाने शास्त्रज्ञ होता. तो जगाकडे इतरांपेक्षा थोड्या वेगळ्या कोनातून पाहणारा माणूस होता.
ज्या माणसाने विश्वातील सूक्ष्म कणांच्या हालचाली समजून घेण्यासाठी विलक्षण समीकरणं मांडली, इलेक्ट्रॉनसारखाच पण धनभार असलेल्या कणाचे अस्तित्व सैद्धांतिकदृष्ट्या सुचवले आणि पुढे त्या कणाला पॉझिट्रॉन म्हणून प्रयोगांनी सिद्ध केलं गेलं—
तोच माणूस रोजच्या आयुष्याकडेही त्याच नजरेने पाहत होता.
म्हणूनच स्त्रीचा चेहरा सुंदर दिसण्यासाठी किती अंतर ठेवावं, हा प्रश्नसुद्धा त्याच्यासाठी सामाजिक किंवा भावनिक नव्हता.
तो एक भौतिकशास्त्रीय प्रश्न होता!
आपण एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहतो आणि म्हणतो—
“वा! किती सुंदर!”
डिरॅकच्या डोक्यात मात्र प्रश्न कदाचित असा आला असेल—
“सुंदर दिसण्यामागची boundary condition काय?”
वरचा किस्सा वाचल्यावर आपल्याला लक्षात येतं ते एवढंच—
हे लोक वेगळा विचार करतात म्हणून ते शास्त्रज्ञ होतात की वेगळा विचार करण्यासाठीच ते शास्त्रज्ञ असतात, हा मात्र वेगळा प्रश्न!
आता आणखी एक गंमत.
१९३३ मध्ये पॉल डिरॅकला एर्विन श्रॉडिंगरसह भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.
श्रॉडिंगरही पॉल डिरॅकसारखाच नेहमीच्या वाटेवरून न चालणारा माणूस होता. त्याच्या नावावरचा Schrödinger's cat हा तर विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या सीमारेषेवर उभा असलेला जगप्रसिद्ध किस्सा आहे.
तो किस्सा नंतर कधीतरी.
तोपर्यंत—
आजपासून तुम्ही पार्टीला गेलात, एखाद्या लग्नाला गेलात, एखाद्या समारंभात गेलात आणि कुणी गंभीर चेहऱ्याने एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यावर भाष्य करायला लागलं…
तर डिरॅक आठवा.
आणि मनातल्या मनात एकच प्रश्न विचारा—
“पण optimal distance किती?”






