प्रेम नको रे बाबा! प्रेमात पडताना माणूस काय काय करतो,याला काही सीमा नाही. प्रेमपत्रं लिहितो, फुलं देतो, गाणी म्हणतो, चंद्राला साक्षी ठेवतो... आणि समोरच्याला प्रेम नसेल तर शेवटी म्हणतो, “ठीक आहे, आपण Just friends म्हणून राहू!”
प्राण्यांच्या जगात मात्र ‘नकार’ देण्याच्या पद्धती काहीशा वेगळ्या आहेत.
इथे एखादी ड्रॅगनफ्लाय मादी नर आपल्यामागे लागतोय हे समजल्यावर ती उडता उडता चक्क खाली कोसळते... जमिनीवर निश्चल पडते... आणि मृत असल्याचे नाटक करते! होय,अगदी मेल्यासारखी!
आता तो नर तरी काय करणार? त्याचा उत्साह संपतोच . त्याचा उत्साह संपलाय हे लक्षात आलं की ती उठते आणि उडून जाते.
स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या निरीक्षणात ड्रॅगनफ्लायच्यामाद्यांनी नराच्या mating च्या प्रयत्नापासून बचाव करण्यासाठी ही युक्ती वापरल्याचे दिसले. ३५ माद्यांपैकी २७ माद्यांनी असे वर्तन केले आणि अनेक वेळा ते यशस्वीही झाले. संशोधकांच्या मते, हा प्रकार मादीला नको असलेल्या mating पासून वाचण्याची आयडिया असते.म्हणजे आपल्या भाषेत सांगायचे तर— “हनिमूनला जायचंय? थांब... आधी मी मरते!”
पण ड्रॅगनफ्लाय ही काही एकटीच अशी कलाकार नाही.
प्राण्यांच्या जगात ‘नको असलेल्या प्रेमापासून सुटका’ करण्याच्या अनेक भन्नाट पद्धती आढळतात.
काही युरोपियन बेडकात मादी बेडूक एखाद्या नराच्या सततच्या mating प्रयत्नामुळे त्रस्त झाली तर ती काही वेळ मेल्यासारखी निश्चल पडते. तिचे शरीर अगदी सैल पडते. नराला ती प्रतिसाद देत नाही. संशोधकांनी याला tonic immobility असे संबोधले आहे.
म्हणजे,“बोलू नकोस. हलू नकोस. काहीच करू नकोस. कदाचित हा विषय आपोआप संपेल!”
Iberian ribbed newt म्हणजे घोरपडीसारख्या दिसणाऱ्या प्राण्यात मादी नराच्या त्रासापासून सुटण्यासाठी असंच मेल्याचं नाटक करते. या शिकारी माशीच्या काही प्रजातींमध्येही मादीला नरापासून सुटण्यासाठी death feigning, म्हणजेच मृत असल्याचे नाटक करण्याची युक्ती वापरताना पाहिले गेले आहे.
काही फुलपाखरांमध्येही याच्याशी साधर्म्य असलेली युक्ती दिसते. नराच्या mating attempts पासून बचाव करताना मादी पंख मिटून निश्चल होऊ शकते आणि काही वेळा आधारावरून खाली पडल्यासारखी वागते.
फुलपाखरांच्या जगातली ही आवृत्ती म्हणजे— “माझ्याशी बोलू नका. मी सध्या ऑफलाइन आहे.”
पण आता वाचा एक मजेदार ट्विस्ट !!
काही किटकात नरच मृत असल्याचे नाटक करतो!
काही किटकात मेटिंग संपलं की मादी नराला संपवून टाकते. Pisaura mirabilis जातीच्या कोळ्यात नर मादीला एक खाद्यपदार्थ भेट म्हणून देतो. कारण या भेटीचा एक उद्देश मादीचे लक्ष खाद्याकडे वळवणे हा असतो.मादीने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर नर निश्चल पडून मृत असल्याचे नाटक करू शकतो. मादी खाद्य खाण्यात गुंतली की साहेब पुन्हा जिवंत!
म्हणजे, “मला खाणार असशील तर आधी ही भेट खा...” आणि तोपर्यंत साहेबांनी आपला पुढचा डाव साधलेला असतो.
प्राण्यांच्या जगात मेटिंग हा केवळ प्रणयाचा विषय नाही. तो उत्क्रांतीच्या संघर्षाचा भाग आहे.
नरासाठी आपली जनुके पुढच्या पिढीत पोहोचवण्याची संधी असते पण मादीसाठी प्रत्येक मेटिंग फायदेशीर असेलच असे नाही. खर्च होणारी ऊर्जा, संभाव्य दुखापत, नराचा सततचा त्रास आणि पुढे होणाऱ्या पिल्लांचा खर्च—या सगळ्यांचा हिशेब तिच्या शरीराला करावा लागतो.म्हणूनच काही प्रजातींमध्ये उत्क्रांतीने विलक्षण बचावाच्या युक्त्या जन्माला घातल्या आहेत.
कोणी मृत असल्याचे नाटक करते.
कोणी निश्चल पडते.
कोणी खाली कोसळते.
आणि कुणी खाद्याची भेट देऊन स्वतःचा जीव वाचवतो
आपण माणसं प्रेमभंग झाला की मित्रांना फोन करतो, कविता लिहितो, गाणी ऐकतो किंवा सोशल मीडियावर स्टेटस ठेवतो.प्राण्यांच्या जगात मात्र गोष्ट जरा वेगळी आहे.
तिथे प्रेमाचा प्रस्ताव नाकारायचा असेल तर... कधी कधी मेल्याचं नाटक करावं लागतं!
आणि म्हणूनच निसर्गाचा हा धडा लक्षात ठेवायला हरकत नाही— प्रेम सुंदर असतं... पण समोरच्याची इच्छा नसेल, तर निसर्गसुद्धा ‘नाही’ म्हणण्याचे मार्ग शिकवतो.






