सप्टेंबर महिना म्हणजे फुलपाखरांचा महिना -(Big Butterfly Month)
आपल्या मोहक रंगसंगतीमुळे आणि फुलांवर भिरभिरत राहण्याच्या सवयीमुळे फुलपाखरे आपलं लक्ष हमखास वेधून घेतात मोकळ्या माळरानांप्रमाणेच गर्दीने गच्च भरलेल्या शहरातील अगदी छोट्या छोट्या बागांमध्ये सुध्दा फुलपाखरे बघायला मिळतात.फुलपाखरे केवळ छान दिसतात एवढंच नाही तर परागीभवनाचं महत्वाचं काम ती निसर्गात करत असतात. त्यामुळेच फुलपाखरे ही निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
संपूर्ण जगात साधारणपणे फुलपाखरांच्या १८००० प्रजाती आढळतात, त्यापैकी भारतामध्ये १५०० प्रजाती आहेत, तर आपल्या जैववैविध्यासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये फुलपाखरांच्या ३३३ प्रजाती नोंदवल्या गेल्या आहेत.
भारतात दरवर्षी सप्टेंबर महिना हा 'बिग बटरफ्लाय मंथ' (Big Butterfly Month) म्हणजेच फुलपाखरांचा महिना म्हणून साजरा केला जातो.हा महिना फुलपाखरांना समर्पित करण्यामागे फुलपाखरांचे महत्व अधोरेखित करणे आणि फुलपाखरांचे संवर्धनासाठी जनमत तयार करणे हेच मुख्य उद्देश आहेयपण हाच महिना का, तर यामागे आहे निसर्गातील हवामान बदल आणि फुलपाखरांचे जीवनचक्र.
जून ते ऑगस्ट दरम्यान भारतात जोरदार पाऊस पडतो.सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होऊन कडक ऊन पडायला सुरुवात होते. फुलपाखरे हे थंड रक्ताचे (Cold-blooded) कीटक असल्याने त्यांना उडण्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशाची (उन्हाची) अत्यंत गरज असते. हे त्यांना या महिन्यात चांगले मिळते, आणि त्यामुळे या काळात मोठ्या संख्येने फुलपाखरे उडताना दिसतात.
पावसाळ्यात अगदी सुरवातीपासूनच वनस्पतींना भरपूर पालवी फुटलेली असते, ज्यावर फुलपाखरे मोठ्या प्रमाणात अंडी घालतात. सप्टेंबर महिन्यापर्यंत फुलपाखरांची अंडी, अळी, कोष आणि पूर्ण फुलपाखरू या चारही अवस्था निसर्गतः पूर्ण होतात आणि हवेत शेकडो नवीन फुलपाखरे बागडू लागतात.या काळात म्हणजेच पावसाळ्यानंतर सगळीकडे रानफुले आणि वनस्पती मुबलक प्रमाणात बहरतात. यामुळे फुलपाखरांना त्यांचा मुख्य आहार असणारा मकरंद (फुलांमधील रस) भरपूर प्रमाणात मिळतो.
भारतातील अनेकविध निसर्ग संस्था एकत्र येऊन सप्टेंबर महिन्यात 'बिग बटरफ्लाय मंथ' साजरा करतात. या अंतर्गत देशभरात फुलपाखरांची गणना करणे, त्यांच्या प्रजातींची नोंद ठेवणे आणि त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे यासारखे विविध कार्यक्रम राबवले जातात.
संपूर्ण वर्षभरात सप्टेंबर महिन्यात फुलपाखरांची संख्या सर्वाधिक (Peak Population) असते, म्हणून हा महिना त्यांच्या नावाने साजरा केला जातो.
डॉ उदय कोतवाल
9422073458






