भारताची प्रमाणवेळ ठरवताना मिर्झापूर नावाच्या शहराची भूमिका आहे,हे सांगितलं की Gen Z चा पहिला प्रश्न असेल—
“अच्छा… म्हणजे भारतीय प्रमाण वेळ कालीन भैय्याने ठरवली होती का?”
-नाही! भारताची वेळ ठरवताना तिथे ना कालीन भैय्या होता, ना गुड्डू पंडित, ना कुणाच्या हातात कट्टा.
होतं फक्त पृथ्वीचं फिरणं आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांचं गणित. पण योगायोग असा की भारताच्या प्रमाणवेळेसाठी निवडलेला 82°30′ पूर्व रेखांश उत्तर प्रदेशातील मिर्झापूरजवळून जातो.
म्हणजे देशाचं घड्याळ सुरू करण्यासाठी मिर्झापूरने काही खुर्ची खेचून घेतली नव्हती; पण इतिहासाने त्याच्या अंगणातून एक अदृश्य रेषा काढली आणि सांगितलं—
“बस्स! इथून वेळ मोजायची.”
आता ही रेषा एवढी महत्त्वाची का?कारण पृथ्वी गोल आहे. आणि ती स्वतःभोवती फिरते. ती ३६०अंश फिरते २४ तासांत. म्हणजे १५ अंशाला एक तास.आणि एका अंशाला चार मिनिटं. मिर्झापूरच्या आसपासचा ८२.५ अंश पूर्व रेखांश घेतला तर गणित होतं—
८२.५ × ४ = ३३० मिनिटं. म्हणजे ५ तास ३० मिनिटं. आणि जन्माला आली—
भारतीय प्रमाणवेळ =(GMT + ५.३०)
आता कल्पना करा, हीच बैठक आज Mirzapurच्या पात्रांनी घेतली असती.
कालीन भैय्या टेबलावर हात आपटून म्हणाले असते—
“भारत की एक ही टाइम होगी!”
गुड्डू लगेच म्हणाला असता—
“पण मुंबईवाल्यांना सूर्य उशिरा दिसतो!”
“दिसू दे.”
“कोलकात्यात लवकर उगवतो!”
“उगवू दे.”
“मग वेळ?”
कालीन भैय्या चष्मा ठीक करत म्हणाले असते—
“IST चलेगा. बाकी सब local adjustment है.”
इतिहासाचा हा फार मजेशीर योगायोग आहे.
एका मिर्झापूरने भारताला वेळ दिली.
दुसऱ्या मिर्झापूरने OTTला वेळ घालवण्याचं कारण दिलं!
आणि दोन्ही ठिकाणी एकच प्रश्न महत्त्वाचा—
“टाइम क्या हुआ है, भैया?”






