अनंत वर्षे पृथ्वी आपल्या वातावरणासकट सूर्याभोवती प्रदक्षीणा घालते आहे.वायूरुपी आवरणानी अवगुंठीत पृथ्वी पाण्यानी भरलेल्या वाटोळ्या घागरीसारखी आहे. पण पाण्याचा एकही थेंब या भ्रमण कक्षेत सांडत नाही.अब्जावधी वर्षापूर्वी जे पाणी डायनासोर पित होते तेच पाणी आपण पितो आहोत.अब्जावधी वर्षे याच पाण्याची वाफ होते -हेच पाणी ढगातून बरसते- डोंगर दर्या -मैदाने पठारा वरून वाहते -नद्यांना जाउन मिळते -महासागरात पोहचून पुन्हा त्याची वाफ होते.
संक्रांत गेली की दिवस तिळातिळाने मोठा होत जातो. वातावरणातला उष्मा कणाकणाने वाढत जातो. वैशाखाचा वणवा अंगाची लाही लाही करून जातो. अक्षय तृतीया येऊन गेली की थोडासा दिलासा मिळतो की आता उन्हाळा फक्त चारच आठवडे. मध्येच एखाद्या संध्याकाळी काळे ढग दाटून येतात.विजांचा कडकडाट होतो एखादी सर धूळफेक करून जाते.मग त्या रात्री जीवाची तगमग आणखीनच वाढते.
नैऋत्य मोसमी वारे भारतीय द्विपखंडात पाउस घेऊन येतात हे वाक्य आपण सर्वानीच शाळेत असताना पाठ केलेले आहे.
मृगनक्षत्र लागले की पहीला पाऊस येतो हे पण आपल्या परीचयाचे वाक्य आहे.शास्त्रज्ञांच्या मते हे चक्र गेली पन्नास लाख वर्षे आहे तसेच आहे. या नैऋत्य मौसमी वार्याच्या आगमनाचे धोरण नेहेमी पुढेमागे होत असते. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे या मौसमी पावसाचे आगमन -त्यांचा उत्तरेच्या दिशेने प्रवास आणि त्यांचे प्रयाण मागेपुढे होत असते. भारतासारख्या कृषीप्रधान देशात या वेळापत्रकाचे फार महत्व आहे.
अनेकविध कारणांनी हा मान्सून "लहरी" पाहुण्यासारखा वागतो. समुद्री पृष्ठभागाचे तापमान हे त्यापैकी एक महत्वाचे कारण आहे.उत्तर अटलांटीक महासागर-प्रशांत महासागराचे पृष्ठीय तापमान -विषुवृत्तीय तापमान आणि हवेचा दाब आणि वार्याचा वेग अशी महत्वाची कारणे आहेत. त्यापैकी एल निनो -हे महत्वाचे कारण असावे असे शास्त्रज्ञ मानतात.(साध्या भाषेत निनो म्हणजे बाळ किंवा बच्चू ) दक्षीण अमेरीकेच्या समुद्र पृष्ठीय तापमान सरासरीपेक्षा वाढले तर त्याला एल निनो इफेक्ट म्हणतात. जर हे तापमान सरासरीपेक्षा कमी झाले तर त्याला काय म्हणतात ?






