मी तुम्हाला एक प्रांजळ कबुली देतो आणि हे तुमच्या बाबतीत पण होत असेल की—अनेकदा अत्यंत गंभीर प्रसंगी, जिथे हसणं म्हणजे सामाजिक गुन्हा आहे,तिथेच मला हसण्याचा अनावर उमाळा येतो.समोर एखादी व्यक्ती रडत असेल किंवा बॉस मीटिंगमध्ये ओरडत असेल,तरी आतून एक 'गिगल' बाहेर येण्यासाठी धडपडत असते.तोंड दाबून धरलं की तर हे हसू अधिकच उसळून बाहेर येतं.
आता असं आहे की हसणं आवरता न येणं हा तुमचा दोष नाही, तर तो तुमच्या मेंदूचा एक नैसर्गिक प्रोग्राम आहे. संशोधक सांगतात की, हसणं ही एक अशी क्रिया आहे जी आपल्या पूर्णपणे नियंत्रणात नसते. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या मेंदूत चालणारे दोन समांतर खेळ.
शास्त्रज्ञांच्या मते हसण्याचे दोन प्रकार असतात: एक म्हणजे 'हळवं किंवा हतबल हसणं' (Involuntary Laughter) आणि दुसरं 'सामाजिक हसणं' (Social Laughter).जेव्हा तुम्ही एखाद्याला खुश करण्यासाठी किंवा शिष्टाचार म्हणून हसता, तेव्हा तुमच्या मेंदूचा 'मोटार कॉर्टेक्स' हा भाग कार्यरत असतो.हा भाग तुमच्या शरीराच्या हालचाली नियंत्रित करतो.
दुसरीकडे, जेव्हा तुम्हाला अनावर हसू येतं, तेव्हा मेंदूचा 'अमिग्डाला' (Amygdala) हा भाग ताबा घेतो. हा भाग तुमच्या भावनांशी निगडित असतो आणि तो तुमच्या जाणीवेच्या किंवा इच्छेच्या नियंत्रणात नसतो.तुमचा विचार करणारा मेंदू 'थांब' म्हणण्याआधीच अमिग्डाला हसण्याचं बटण दाबून मोकळा झालेला असतो.
गॉटिंगेन विद्यापीठाने (Germany) प्रसिद्ध केलेल्या एका ताज्या संशोधनातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. संशोधकांनी 'फेशियल इलेक्ट्रोमायोग्राफी' वापरून चेहऱ्याच्या स्नायूंची तपासणी केली. त्यांना असं आढळलं की, जेव्हा आपण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला हसताना पाहतो किंवा ऐकतो,तेव्हा आपले मेंदूचे हसू रोखण्याचे सर्व प्रयत्न निकामी ठरतात.
वस्तुस्थिती अशी आहे की,हसणं हे सामाजिक संसर्गासारखं असतं.आकडेवारी सांगते की, आपण एकटे असताना जेवढं हसतो, त्यापेक्षा ३० पट जास्त हसण्याची शक्यता आपण लोकांमध्ये असताना असते. दुसऱ्याचं हसू ऐकलं की आपल्या मेंदूला 'हा आनंद साजरा करण्याची वेळ आहे' असा सिग्नल मिळतो.
हसणं थांबवणं कठीण असण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे मेंदूला मिळणारी 'लाच'. हसताना आपल्या मेंदूतून 'एंडोजेनस ओपिओइड्स' (Endogenous Opioids) आणि 'एंडॉर्फिन' सारखी फील-गुड रसायने बाहेर पडतात. ही रसायने नैसर्गिक पेनकिलरसारखी काम करतात आणि आपल्याला तणावमुक्त ठेवतात.
तुमचा मेंदू या आनंदाच्या लाटेला इतक्या सहजासहजी सोडू इच्छित नाही. हसण्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि भूकही नियंत्रित राहते. या फायद्यांमुळेच एकदा हसणं सुरू झालं की मेंदूचं 'स्टॉप' बटण जॅम होतं.
अनेकदा हसू दाबायचा प्रयत्न केला की ते उलटून येतं, याला शास्त्रज्ञ 'रिबाउंड इफेक्ट' (Rebound Effect) म्हणतात.
एका प्रयोगात असं दिसून आलं की, ज्या लोकांना हसू दाबण्यास सांगितलं होतं, त्यांना प्रयोग संपल्यानंतर इतरांपेक्षा जास्त हसू आलं. जसं आपण एखादा विचार दाबायचा प्रयत्न केला की तोच विचार पुन्हा पुन्हा येतो, तसंच हसण्याचंही आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ ऑकलंडने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, हसण्याचा संबंध थेट आपल्या रक्तदाबाशीही असतो. हसताना होणारा जोराचा उच्छ्वास आपल्या पोटाच्या स्नायूंना उत्तेजित करतो, ज्यामुळे तात्पुरता रक्तदाब वाढतो आणि नंतर शरीर पूर्णपणे रिलॅक्स होतं.
थोडक्यात सांगायचं तर, तुमची इमोशन्स, मेंदूची रिवॉर्ड सिस्टिम आणि आजूबाजूचे लोक हे सगळे मिळून तुम्हाला हसवण्यासाठी कट रचत असतात. हे केवळ एका बटणाचं काम नसून मेंदूतल्या अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रियांचा एकत्रित परिणाम आहे.
पुढच्या वेळी एखाद्या चुकीच्या वेळी हसू आलं, तर स्वतःला दोष देऊ नका. तुमचा मेंदू फक्त त्या क्षणी तुम्हाला आनंदी ठेवण्याचं त्याचं काम चोख बजावत असतो. शेवटी, हसण्यावर कोणाची बंदी असते का?








