“जीभेवर ठेवलं… आणि माणूस जागच्या जागी मेला!” चित्रपटातला हा प्रसंग आपण किती वेळा पाहिला आहे!
एखादा गुप्तहेर खलनायकाला पकडतो. खलनायकाच्या खिशातून एक छोटाशी पुडी बाहेर काढतो.तो त्यातलं पांढरं पावडरसारखं काहीतरी जिभेवर ठेवतो… दोन क्षणांत तोंडातून फेस येतो… शरीर थरथरतं… आणि माणूस खाली कोसळतो!
पडद्यावर सगळं काही एवढं झटकन घडतं की आपल्याला वाटतं—पोटॅशियम सायनाइड म्हणजे जिभेला स्पर्श झाला की मृत्यू!
पण खरं विज्ञान इतकं सिनेमॅटिक नाही.
पोटॅशियम सायनाइड निश्चितच अत्यंत विषारी रसायन आहे. मात्र ते जिभेवर पडताच एखाद्या स्विचसारखं शरीर बंद करून टाकत नाही. विष शरीरात गेल्यानंतर त्याचे शोषण होते, ते रक्तप्रवाहात पोहोचते आणि मग पेशींच्या पातळीवर त्याचा घातक परिणाम सुरू होतो.
आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला काम करण्यासाठी ऊर्जा लागते. आपण चालतो, बोलतो, विचार करतो, हृदय धडधडतं, फुफ्फुसे श्वास घेतात—या प्रत्येक क्रियेमागे ऊर्जा असते.
या ऊर्जानिर्मितीचे महत्त्वाचे केंद्र म्हणजे माइटोकॉन्ड्रिया. शाळेत आपण त्याला “पेशीचं पॉवरहाऊस” म्हणून शिकलो होतो.
माइटोकॉन्ड्रियामध्ये अनेक रासायनिक प्रक्रिया घडतात आणि त्यातून ATP — adenosine triphosphate तयार होते. ATP म्हणजे पेशींसाठी जणू ऊर्जेचं चलनच.या प्रक्रियेत एक अत्यंत महत्त्वाचा एन्झाइम आहे—Cytochrome c oxidase, म्हणजेच CCO.
आणि पोटॅशियम सायनाइडचा खरा घातक डाव इथेच सुरू होतो.सायनाइड या एन्झाइमला अडवते. परिणामी पेशींना ऑक्सिजनचा योग्य वापर करून ऊर्जा तयार करता येत नाही.
लक्षात घ्या—शरीरात ऑक्सिजन असू शकतो, रक्तात ऑक्सिजन पोहोचलेला असू शकतो; पण पेशींना तो वापरता येत नाही.
जणू शहरात वीजेची निर्मिती करण्यासाठी लागणारं इंधन, यंत्रं आणि सगळं काही कारखान्यात पोहोचलं आहे… पण मुख्य मशीनच बंद पडली आहे!
ऊर्जानिर्मिती थांबली की त्याचा परिणाम एका अवयवापुरता राहत नाही. शरीरातील अत्यंत ऊर्जाग्राही अवयव—विशेषतः मेंदू आणि हृदय—गंभीरपणे प्रभावित होऊ शकतात.म्हणूनच cyanide विषबाधा जीवघेणी ठरू शकते.
सायनाइड शरीरात गेल्यानंतर शरीर त्याचा सामना करण्याचाही प्रयत्न करते. शरीरात काही एन्झाइम्स cyanide चे तुलनेने कमी विषारी thiocyanate मध्ये रूपांतर करण्यास मदत करतात आणि त्याचा नंतर शरीरातून निचरा होतो. मात्र विषारी प्रमाण जास्त असेल तर शरीराची ही नैसर्गिक संरक्षणव्यवस्था अपुरी पडू शकते.
cyanide विषबाधा ही वैद्यकीय आणीबाणी आहे. अशा परिस्थितीत स्वतःहून उपचार करण्याचा किंवा घरगुती उपाय करण्याचा प्रश्नच नाही. तातडीने वैद्यकीय मदत घेणे आवश्यक असते.
आणि म्हणूनच चित्रपटात दिसणाऱ्या त्या दृश्याकडे पुन्हा एकदा पाहूया,
जिभेवर काहीतरी ठेवलं… दोन सेकंद…
तोंडाला फेस… आणि मृत्यू!
हा सीन फारच काल्पनिक आहे.
सायनाईड म्हणलं की रासपुटीन आठवलाच पाहिजे. हा तोच रासपुटीन ज्याला सायनाईड खायला घालूनही जिवंतच राहिला. ही स्टोरी पण सायनाईड इतकीच खोटी आहे इतकंच आज म्हणूया !






