रातकिड्यांची किरकिर्र सांगते सभोवतालचे तापमान ! हे वाचून या बोभाटावाल्यांचं काही खरं नाही असं म्हणत कपाळाला हात लावू नका. कारण हे अगदी सत्य आहे.इतकंच काय तर रातकिड्यांची किरकिर्र मोजून तापमान सांगण्याचा गणिती फॉर्म्युला पण आहे.
निसर्गाची स्वत:ची अशी अनेक ‘यंत्रं’ आहेत,ज्यांना आपण यंत्रं मानत नाही. झाडांची पानं, पक्ष्यांचे आवाज, मुंग्यांची हालचाल, ढगांचा रंग... आणि त्यातलाच एक छोटासा, पण भन्नाट ‘थर्मामीटर’ म्हणजे रातकिड्यांचा आवाज
रातकिडा म्हणजेच आपल्या आसपास आढळणारा छोटासा कीटक. विशेषतः नर रातकिडा आपल्या पंखांचा वापर करून आवाज करतो. तो माणसासारखा तोंडाने गात नाही.पंखांची विशिष्ट पद्धतीने घर्षण करून तो ‘किर्र-किर्र’ असा आवाज निर्माण करतो.
रातकिडा हा थंड रक्ताचा म्हणजे ectothermic जीव आहे.म्हणजे त्याच्या शरीरातील तापमान आणि त्याच्या शरीरातील अनेक जैविक प्रक्रिया बाहेरील तापमानाशी जोडलेल्या असतात.हवा उबदार झाली की त्याच्या शरीरातील रासायनिक प्रक्रिया वेगाने होतात. स्नायू वेगाने काम करू लागतात. परिणामी पंखांची हालचालही अधिक वेगवान होते.
आणि मग... किरकिरण्याचा वेग वाढतो!
हवा थंड झाली की उलट चित्र दिसतं. हालचाली मंदावतात आणि किरकिर्र आवाजांमधील अंतर वाढतं.
या निरीक्षणावरून अमेरिकन शास्त्रज्ञ अमोस डॉल्बिअर यांनी १८९० मध्ये क्रिकेटच्या आवाजाचा आणि तापमानाचा संबंध मांडला. पुढे हा संबंध “Dolbear’s Law” म्हणून प्रसिद्ध झाला.
विशेषतः Snowy Tree Cricket या प्रजातीसाठी एक सोपा नियम सांगितला जातो.
१३ सेकंद किरकिर आवाज मोजा. त्या संख्येत ४० मिळवा.
मिळालेला आकडा साधारणपणे फॅरेनहाइटमधील तापमान दर्शवतो.
समजा, तुम्ही १३ सेकंदांत क्रिकेटचे ३० आवाज मोजले.
३० + ४० = ७०°F म्हणजे तापमान साधारण २१°C.
थोडक्यात, तुमच्या हातात थर्मामीटर नाही, तरी अंगणात बसून तुम्ही क्रिकेटच्या आवाजावरून तापमानाचा साधारण अंदाज घेऊ शकता!
पण इथे एक छोटंसं ‘पण’ आहे. रातकिडा हा 'क्रिकेट' वर्गाच्या किटकात मोडतो. या किटकवर्गात रातकिड्यासारखे ६०० किटक आहेत.वेगवेगळ्या प्रजातींच्या क्रिकेटचा आवाज करण्याचा वेग वेगवेगळा असतो.त्याशिवाय वय, प्रजननाची अवस्था, दिवसाची वेळ, आर्द्रता आणि इतर पर्यावरणीय घटकांचाही परिणाम होतो.म्हणून क्रिकेटच्या आवाजावरून हवामान खात्याचा १००% अधिकृत तापमान अहवाल काढता येणार नाही.
पण त्यातून निसर्गाची एक विलक्षण गोष्ट नक्की समजते. आपण तापमान मोजण्यासाठी पारा, डिजिटल सेन्सर किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरतो.
रातकिड्याला त्यापैकी काहीच लागत नाही.
त्याचं शरीरच त्याचा सेन्सर आहे.
त्याचे स्नायू त्याची यंत्रणा आहेत.
आणि त्याचा आवाज त्याचा डिस्प्ले!
बघा, आज रात्री झोप लागली नाही तर किरकिर मोजून अभ्यास करा !






