३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असेल तर बहुतांश फुलपाखरं उडूच शकत नाहीत, कारण त्यांचं शरीर एखाद्या 'कोल्ड स्टार्ट' इंजिनसारखं असतं ज्याला गरम झाल्याशिवाय गती घेता येत नाही. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, आपण माणसं 'वॉर्म ब्लडेड' आहोत, म्हणजे बाहेर बर्फ पडो किंवा ऊन तापो, आपल्या शरीराचं तापमान स्थिर असतं. पण कीटकांचं तसं नसतं. ते 'कोल्ड ब्लडेड' किंवा शीत रक्ताचे असतात.त्यांचं आयुष्य पूर्णपणे बाहेरच्या हवामानावर अवलंबून असतं.निसर्गाचं हे मॅनेजमेंट आपल्या कॉर्पोरेट ऑफिसपेक्षाही कडक आहे.
कीटकांच्या शरीरातील चयापचय क्रिया म्हणजे 'मेटॅबॉलिझम' एका ठराविक तापमानातच व्यवस्थित चालतं. जर पारा घसरला किंवा प्रमाणाबाहेर वाढला, तर या इवल्याशा जीवांची सिस्टिम हँग होते. म्हणूनच हे कीटक सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत एखाद्या इंजिनिअरसारखं स्वतःचं तापमान मेंटेन करत असतात.
सकाळी सकाळी बागेत गेलं की फुलपाखरं पंखांची उघडझाप करताना दिसतात. आपल्याला वाटतं ती कोवळ्या उन्हाचा आनंद घेत आहेत, पण खरं तर ती स्वतःची बॅटरी चार्ज करत असतात. पंखांची ही हालचाल म्हणजे एक प्रकारचा व्यायाम असतो, ज्यामुळे त्यांच्या स्नायूंमध्ये उष्णता निर्माण होते. काही कीटकांचे स्नायू तर चक्क थरथर कापतात. ही थरथर म्हणजे स्वतःला गरम करण्यासाठी केलेला 'वॉर्म-अप' असतो. पुरेशी ऊर्जा मिळाली की मगच ते हवेत झेप घेतात.
पण हीच फुलपाखरं दुपारच्या कडक उन्हात गायब होतात. पुण्यात जशी दुपारी १ ते ४ 'दुपारची झोप' अनिवार्य असते, तसंच काहीसं हे कीटक करतात. तीव्र उन्हात ते सावलीचा आश्रय घेतात आणि पंखांची अगदी हळूवार हालचाल करतात. हे त्यांचं नॅचरल 'व्हेंटिलेशन' असतं, ज्यामुळे शरीराची उष्णता बाहेर फेकली जाते. जर त्यांनी दुपारी उडायचं धाडस केलं, तर ओव्हरहीटिंगमुळे त्यांचं इंजिन कायमचं बंद पडू शकतं.
रंगांच्या बाबतीतही निसर्गाने मोठी गंमत केली आहे. गडद किंवा भडक रंगाचे कीटक उन्हाची उष्णता पटकन शोषून घेतात. त्यामुळे ते सकाळी लवकर कामाला लागतात. याउलट फिकट रंगाच्या कीटकांना मात्र सूर्य चांगला डोक्यावर येईपर्यंत वाट पाहावी लागते. हे म्हणजे कसं आहे, ज्याच्याकडे सोलर पॅनेल मोठं तो लवकर चार्ज होणार! पण याच गडद रंगाचा तोटा असा की त्यांना दुपारच्या उन्हाचा चटकाही लवकर बसतो, म्हणून ते लवकर सावलीत पळतात.
मधमाश्यांचं तर वेगळंच तंत्र आहे. पोळ्याचं तापमान वाढलं की त्या चक्क एअर कंडिशनिंग सुरू करतात. पोळ्याच्या तोंडाशी बसून त्या वेगाने पंख हलवतात, ज्यामुळे आतली गरम हवा बाहेर ढकलली जाते. हे पाहून वाटतं की, आपण घराला एसी लावण्यासाठी हजारो रुपये मोजतो, पण या मधमाश्या फक्त सहकार्यातून आपलं घर थंड ठेवतात.
निसर्गाची ही कमाल खरंच थक्क करणारी आहे.
वाळवंटात राहणारे कीटक तर आणखीनच हुशार. तिथल्या तापलेल्या वाळूचा चटका बसू नये म्हणून ते आपले पाय ताणून शरीर जमिनीपासून शक्य तितकं लांब ठेवतात. जणू काही ते हाय-हील्स घालून फिरत आहेत! कधी कधी तर ते वाळूत खोलवर शिरून स्वतःला सुरक्षित ठेवतात.
निसर्गात जिवंत राहण्यासाठी प्रत्येक सजीव किती धडपड करतो आणि त्यासाठी त्याने काय काय जुगाड केले आहेत, हे पाहिलं की आपल्या बुद्धीचा गर्व गळून पडतो.
माझ्या मते,आपण निसर्गाकडे फक्त 'पाहतो', पण 'निरीक्षण' करत नाही. हे इवलेसे कीटक आपल्याला शिकवतात की परिस्थितीनुसार स्वतःला कसं बदलायचं आणि प्रतिकूल हवामानातही आपली यंत्रणा कशी टिकवून ठेवायची.निसर्गाच्या या शाळेत प्रत्येक पान, प्रत्येक कीटक एक धडा घेऊन बसला आहे,फक्त तो वाचण्यासाठी आपल्याकडे डोळस नजर हवी.
आजच्या या धावपळीच्या युगात आपण एसीच्या रिमोटवर बोटं फिरवत असताना, बाहेर बागेत एक फुलपाखरू फक्त सूर्याच्या किरणांनी स्वतःचं आयुष्य रिचार्ज करत असतं, हेच खरं निसर्गाचं वैभव आहे.
-डॉ. उदय कोतवाल
(संपादन सहाय्य टिम बोभाटा)






