आपल्या जन्माची एक 'उलटी' गोष्ट! आईच्या गर्भाशयात जेव्हा जीव तयार व्हायला सुरुवात होते तेव्हा तो जीव एखाद्या अंकुरासारखा असतो.जसे दिवस पुढे जातात हा अंकुर शरीर धारण करायला सुरुवात करतो. या शरीर रचनेची सुरुवात एका छिद्राने होते. सगळ्यात आधी जे छिद्र पडतं, ते आपलं तोंड नसतं तर ते आपलं 'गुदद्वार' असतं. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, आपण सगळे अस्तित्वात येताना सुरुवातीला फक्त एक 'मलविसर्जनाचे छिद्र' असतो.
हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे शंभर टक्के वैज्ञानिक सत्य आहे. जीवशास्त्रात प्राण्यांचे दोन मुख्य गट पडतात: प्रोटोस्टोम्स (Protostomes) आणि ड्युटेरोस्टोम्स (Deuterostomes). प्रोटोस्टोम्स म्हणजे असे प्राणी, ज्यांच्या गर्भाला पहिलं छिद्र पडतं तेव्हा त्यातून त्यांचं तोंड तयार होतं. यात कीडे, गोगलगायी आणि खेकडे येतात.
पण आपण माणसं मात्र जरा वेगळ्याच 'बायोलॉजीकल प्रोग्रॅम'ने बनवलो जातो.आपल्या बाबतीत निसर्ग अगदी उलटंच काहीतरी करतो.
जेव्हा आईच्या पोटात गर्भ एका छोट्या अंकुरासारखा असतो, तेव्हा त्यात 'ब्लास्टोपोअर' (Blastopore) नावाचं एक छोटं छिद्र तयार होतं.माणसांच्या बाबतीत या पहिल्या छिद्रापासून गुदद्वार (Anus) तयार होतं आणि तोंड नंतर दुसऱ्या बाजूने फुटतं. याच कारणामुळे आपल्याला विज्ञानात 'Deuterostomes' या गटात टाकलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, आपल्या आयुष्याची आणि शरीराची अधिकृत सुरुवात आपल्या 'ढुंगणाच्या भोकापासून' होते.
आपल्या मराठीत म्हणजे रोजच्या बोलीभाषेत ,एखादा माणूस जर जगाच्या विरुद्ध वागत असेल किंवा त्याचं डोकं जरा विचित्र चालत असेल, तर आपण त्याला सहज म्हणून जातो, "हा पार उलट्या भोxxxचा आहे!" आता विचार करा, विज्ञानाने तर सिद्धच केलंय की आपण सगळेच मुळात उलट्या भोxxचे आहोत. फक्त काहींनी ते सिरीयसली घेतलंय इतकंच!
विज्ञानाची ही किमया इथेच थांबत नाही. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या एका ताज्या संशोधनात (Pico-C तंत्रज्ञान) शास्त्रज्ञांनी एक धक्कादायक गोष्ट शोधून काढली आहे. आपलं हे 'उलटं' शरीर तयार व्हायच्या आधीच, म्हणजे गर्भधारणा झाल्या झाल्या, आपल्या डीएनएची रचना एखाद्या सुबक इमारतीच्या नकाशासारखी ३-डी (3D) स्वरूपात तयार झालेली असते.
म्हणजे आपण 'मलविसर्जनाचं छिद्र' म्हणून विकसित व्हायच्या कितीतरी आधी निसर्गाने आपल्या शरीराचा पूर्ण आराखडा तयार करून ठेवलेला असतो. ही रचना इतकी अचूक असते की पुढच्या काही दिवसांत त्या पहिल्या छिद्रातून गुदद्वारच बनावं आणि दुसरीकडून तोंडच फुटावं, हे आधीच ठरलेलं असतं.
बघा काय होतं, आपण स्वतःला कितीही शहाणे समजलो, ज्या तोंडाने आपण मोठेपणाच्या गप्पा मारतो, ते तोंड खरं तर आपल्या शरीरात 'सेकंड नंबर'वर तयार झालेलं असतं. पहिलं स्थान तर त्या विसर्जनाच्या मार्गालाच मिळालंय.
कदाचित म्हणूनच निसर्गाला आपल्याला हेच सुचवायचं असेल की, आयुष्यात कितीही मोठे झालात तरी पाय जमिनीवरच असू द्या. कारण शेवटी, आपली सुरुवात कुठून झाली आहे हे विसरून कसं चालेल?
विज्ञानाचा हा 'उलटा' प्रवास वाचल्यानंतर, आता स्वतःच्या अस्तित्वाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन थोडा तरी बदलला असेल ना?






