मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

रक्तदानाचा 'रक्तरंजित' इतिहास: जेव्हा माणसाला दिले गेले मेंढीचे रक्त!

3 मिनिट वाचन

१६६७ मध्ये पॅरिसमध्ये एका मुलाला चक्क मेंढीचे रक्त देण्याचा धक्कादायक प्रयोग आणि रक्तसंक्रमणाचा थक्क करणारा इतिहास.

शेअर करा:
रक्तदानाचा 'रक्तरंजित' इतिहास: जेव्हा माणसाला दिले गेले मेंढीचे रक्त!

रक्तदानाचा १६६७ चा तो 'रक्तरंजित' इतिहास: १५ जून १६६७ ची ती संध्याकाळ.पॅरिसमधील एका अंधाऱ्या खोलीत १५ वर्षांचा एक मुलगा तापाने फणफणला होता.त्याच्या डॉक्टरने म्हणजे जीन-बॅप्टिस्ट डेनिस या मुलावर एक प्रयोग करून बघण्याचं ठरवलं. त्या मुलाला येणारा ताप अशुध्द रक्तामुळे येतो आहे असे गृहित धरून त्याला नवे रक्त म्हणजे एका मेंढीचे रक्त दिले गेले.विज्ञानाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका प्राण्याचे रक्त माणसाला दिले गेले.डॉक्टर डेनिस यांनी केलेला हा प्रयोग आधुनिक वैद्यकशास्त्राचा पाया होता की एक जीवघेणा जुगार, हे समजून घेणे रंजक ठरेल.

३५९ वर्षांपूर्वीचा हा प्रयोग अंगावर काटा आणणारा आहे कारण हा प्रयोग वैज्ञानिक प्रयोग नव्हता तर प्राण्यांचे रक्त माणसाच्या तुलनेत अधिक 'शुद्ध' आणि रोगांपासून मुक्त असते या तर्कावर आधारित होता.या वेड्या धाडसापोटी त्यांनी त्या १५ वर्षांच्या मुलाला मेंढराचे रक्त चढवले.आश्चर्याची गोष्ट म्हणजे,तो मुलगा या प्रयोगातून वाचला. हा निव्वळ नशिबाचा भाग होता.आजचे तज्ज्ञ यामागचे कारण स्पष्ट करताना सांगतात की,दिलेल्या रक्ताचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने त्या मुलाच्या शरीराने तीव्र प्रतिक्रिया दिली नसावी.पण त्यामुळे डेनिस यांचा आत्मविश्वास वाढवला.त्यानंतरचे असे प्रयोग मात्र शोकांतिका होत्या.

अँटोइन मॉरॉय नावाच्या एका रुग्णावर जेव्हा डेनिस यांनी पुन्हा असाच प्रयोग केला, तेव्हा निसर्गाचा नियम आडवा आला. मॉरॉयच्या शरीरात मेंढराचे रक्त जाताच त्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूने संपूर्ण फ्रान्समध्ये खळबळ उडाली आणि डेनिस यांच्यावर खुनाचा खटला भरला गेला.

मानवी शरीर दुसऱ्या प्रजातीचे रक्त स्वीकारत नाही, हे सत्य तेव्हा कोणालाच ठाऊक नव्हते. या घटनेनंतर १६७० मध्ये फ्रेंच न्यायालय आणि व्हॅटिकनने अशा 'झेनोट्रान्सफ्युजन'वर (प्राण्यांचे रक्त मानवाला देणे) बंदी घातली. विज्ञानाचे हे दालन पुढील १५० वर्षांसाठी कायमचे बंद झाले.

१८२९ मध्ये जेम्स ब्लंडेल या ब्रिटिश प्रसूती तज्ज्ञाने पुन्हा या विषयाला हात घातला. त्यांनी प्राण्यांऐवजी मानवी रक्ताचा वापर सुरू केला आणि तिथून आधुनिक रक्त संक्रमणाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. रक्ताचे गट (Blood Groups) शोधले जाण्यापूर्वीचा तो काळ म्हणजे अंधारात मारलेली उडीच होती.

आज आपण २०२६ मध्ये विज्ञान पुन्हा एकदा जुन्या वळणावर येऊन ठेपले आहे. अलीकडच्या काही महिन्यांतील बातम्यांनुसार, डुकराची किडनी किंवा हृदय मानवी शरीरात प्रत्यारोपित करण्याचे प्रयोग यशस्वी होत आहेत.१६६७ मध्ये झालेली ती चूक आज अत्याधुनिक 'जेनिटिक इंजिनिअरिंग'च्या मदतीने सुधारली जात आहे.

इतिहास हा केवळ तारखांचा नसून मानवी जिद्दीचा आणि चुकांतून शिकण्याचा प्रवास असतो. पॅरिसच्या त्या खोलीत सुरू झालेला तो रक्तरंजित प्रयोग आज लाखो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या तंत्रज्ञानात रूपांतरित झाला आहे. विज्ञानाची प्रगती ही नेहमीच अशा धडपडणाऱ्या प्रयोगांच्या आणि कधीकधी दिलेल्या बलिदानाच्या पायावर उभी असते. मानवी अस्तित्वाच्या लढाईत रक्त हे केवळ द्रव नसून ते जगण्याची उमेद देणारे इंधन आहे.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

कीटकांच्या अंगातला 'एसी' आणि 'हीटर': निसर्गाचं अजब इंजिनिअरिंग
विज्ञान

कीटकांच्या अंगातला 'एसी' आणि 'हीटर': निसर्गाचं अजब इंजिनिअरिंग

कीटक स्वतःचे तापमान कसे नियंत्रित करतात? निसर्गाच्या या अजब इंजिनिअरिंगबद्दल आणि त्यांच्या 'कोल्ड ब्लडेड' आयुष्याबद्दल रंजक माहिती.

३० मे, २०२६

निळ्या गोळ्यांची जन्मकहाणी! औषध शोधत होते हृदयासाठी, पण निकाल वेगळाच लागला
आरोग्य

निळ्या गोळ्यांची जन्मकहाणी! औषध शोधत होते हृदयासाठी, पण निकाल वेगळाच लागला

हृदयविकारावरील संशोधनातून अनपेक्षितपणे जन्मलेल्या व्हायग्रा (Viagra) या बहुचर्चित औषधाच्या शोधाची भन्नाट वैज्ञानिक कथा.

११ सप्टेंबर, २०२६

'या' मुंग्यांच्या दीर्घायुष्यामागचे धक्कादायक वास्तव- या अमरत्वाचे गुपित नक्की काय आहे ?
विज्ञान

'या' मुंग्यांच्या दीर्घायुष्यामागचे धक्कादायक वास्तव- या अमरत्वाचे गुपित नक्की काय आहे ?

एका परजीवी टेपवर्ममुळे कामगार मुंग्यांचे आयुष्य राणीसारखे विलासी आणि प्रदीर्घ होते, पण हे दीर्घायुष्य त्यांच्या वसाहतीसाठी घातक ठरते.

२७ जुलै, २०२६

या ऑपरेशनने वैद्यकशास्त्राला नवी दिशा आणि अनेकांना नवे आयुष्य दिले!
आरोग्य

या ऑपरेशनने वैद्यकशास्त्राला नवी दिशा आणि अनेकांना नवे आयुष्य दिले!

१९५० मध्ये डॉ. रिचर्ड लॉलर यांनी केलेले जगातील पहिले यशस्वी किडनी प्रत्यारोपण कसे घडले आणि त्याने वैद्यकशास्त्राचा इतिहास कसा बदलला?

२ सप्टेंबर, २०२६