खामेनींच्या बंकरपर्यंत इस्राएल पोहोचलं कसं? इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे जमिनीखालील सुरक्षित बंकरमध्ये, अनेक स्तरांच्या सुरक्षेत राहत होते. जगाला वाटत होतं की त्यांना स्पर्श करणंही अशक्य आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, ज्या बंकरला इराण 'अभेद्य' समजत होतं, त्या बंकरचा नकाशा इस्राएलच्या सर्व्हरवर वर्षानुवर्षे सेव्ह होता. हे एका रात्रीत केलेली 'गेम' नसते. यामागे २५ वर्षांचे सातत्य,अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाचा अचाट वापर होता.
२००१ साली तत्कालीन इस्रायली पंतप्रधान एरियल शॅरॉन यांनी मोसादला एक स्पष्ट आदेश दिला होता. इराणला इस्राएलचे 'टार्गेट नंबर-१' बनवा. तेव्हापासून इराणच्या अण्वस्त्र वैज्ञानिकांच्या हत्या असोत किंवा लष्करी तळांवरील सायबर हल्ले,इस्राएलने सर्वत्र आपली पकड घट्ट केली होती. खामेनींना टार्गेट करणे हा या लांब पल्ल्याच्या धोरणाचा शेवटचा आणि सर्वात मोठा टप्पा होता.
फायनान्शिअल टाइम्स आणि सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकन आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणांनी खामेनींच्या वेळापत्रकाचा अक्षरशः पिच्छा सोडला नव्हता. ते कधी उठतात, कोणाला भेटतात आणि कोणत्या मार्गाने प्रवास करतात, याचा प्रत्येक सेकंदाचा हिशोब ठेवला जात होता. हे काम केवळ माणसांनी नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) केले.
तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेऱ्यांचे जाळे हे या ऑपरेशनमधील सर्वात मोठे हत्यार ठरले. सूत्रांनुसार, शहरातील जवळपास सर्वच प्रमुख कॅमेरे हॅक करण्यात आले होते. या कॅमेऱ्यांमधून मिळणारा डेटा एन्क्रिप्ट करून थेट इस्राएलमधील सर्व्हरवर पाठवला जात होता. पाश्चर स्ट्रीटवर असलेल्या सरकारी कार्यालयांजवळील कॅमेऱ्याने सुरक्षा रक्षक गाड्या कुठे पार्क करतात आणि त्या परिसराची दैनंदिन हालचाल कशी असते, याची इत्थंभूत माहिती पुरवली.तेहरानमधील पाश्चर स्ट्रीटवर बसवलेला एक साधा ट्रॅफिक कॅमेरा तब्बल १० वर्षे इस्राएलच्या मोसादसाठी 'लाईव्ह फीड' पाठवत होता. याच कॅमेऱ्याने खामेनींच्या ताफ्यातील गाड्यांचा वेग, सुरक्षेची पद्धत आणि त्यांच्या बंकरचे प्रवेशद्वार जगासमोर उघड केले. एका साध्या लेन्सने इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षिततेचे सर्व दावे खोडून काढले.
केवळ कॅमेरेच नाही, तर मोबाईल नेटवर्कमध्येही इस्राएलने सुरुंग लावला होता. तेहरानमधील मोबाईल टॉवर्सच्या पायाभूत सुविधांमध्ये इस्रायली एजंट्सनी घुसखोरी केली होती. प्रत्यक्ष हल्ल्याच्या काही क्षण आधी, खामेनींच्या सुरक्षा पथकातील सदस्यांचे मोबाईल संपर्क तोडण्यासाठी विशिष्ट टॉवर्सची रेंज मुद्दाम विस्कळीत करण्यात आली. यामुळे सुरक्षारक्षकांना एकमेकांशी संवाद साधणे अशक्य झाले.
"आम्ही तेहरानला आमच्या जेरुसलेमसारखे ओळखतो," असे एका इस्रायली अधिकाऱ्याने दिलेले विधान या ऑपरेशनची व्याप्ती स्पष्ट करते. जेव्हा तुम्ही एखाद्या शहराला तुमच्या स्वतःच्या घराच्या गल्लीसारखे ओळखू लागता, तेव्हा तिथली एखादी साधी विसंगतीही तुमच्या नजरेतून सुटत नाही. खामेनींच्या बाबतीत नेमके हेच घडले.या संपूर्ण प्रक्रियेत 'युनिट ८२००' या इस्रायली गुप्तचर विभागाची भूमिका कळीची होती. त्यांनी अब्जावधी डेटा पॉइंट्सचे विश्लेषण केले. 'सोशल नेटवर्क अॅनॅलिसिस'चा वापर करून इराणच्या सत्ताकेंद्रातील निर्णय घेणाऱ्या व्यक्तींचा एक डिजिटल नकाशा तयार करण्यात आला. या नकाशाने हे स्पष्ट केले की, खामेनी नक्की कोणावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वात कमकुवत दुवा कोणता आहे.
इस्रायली लष्करी संस्कृतीत 'टार्गेटिंग इंटेलिजन्स'ला सर्वात महत्त्वाचे मानले जाते. निवृत्त ब्रिगेडियर जनरल इताई शापिरा यांच्या मते, जर देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने एखाद्याला संपवण्याचा निर्णय घेतला, तर गुप्तचर यंत्रणा त्याचे अचूक लोकेशन शोधून देण्यास बांधील असतात. ही एक प्रकारची 'टार्गेट फॅक्टरी' आहे, जिथे रोज नवीन माहितीचे विश्लेषण करून शत्रूचा पत्ता शोधला जातो.गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या १२ दिवसांच्या युद्धाने या ताकदीची झलक दाखवली होती. त्यावेळी अवघ्या काही मिनिटांत इराणचे डझनभर अण्वस्त्र वैज्ञानिक आणि लष्करी अधिकारी एकामागून एक संपवण्यात आले होते. त्या मोहिमेतून मिळालेल्या आत्मविश्वासानेच खामेनींच्या बंकरपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा केला.
या ऑपरेशनमध्ये केवळ तंत्रज्ञान नव्हते, तर मोसादने रिक्रूट केलेले 'गुप्त खबरी' (Human Assets) देखील होते.इराणच्या सुरक्षा यंत्रणेतील काही महत्त्वाच्या पदांवरीलम्होरक्यांना मोसादने आपल्या जाळ्यात ओढले होते. या व्यक्तींकडून मिळणारी माहिती आणि सॅटेलाईट इमेजरी यांची सांगड घालून खामेनींचा अचूक ठावठिकाणा निश्चित करण्यात आला.
थोडक्यात,खामेनींना संपवण्यासाठी इस्राएलने इराणच्याच यंत्रणेचा वापर त्यांच्याविरुद्ध केला. ज्या मोबाईल फोनला इराण प्रगतीचे साधन समजत होता, तोच फोन खामेनींच्या मृत्यूचे कारण ठरला. ज्या कॅमेऱ्यांनी जनतेवर लक्ष ठेवायचे होते, त्यांनीच इस्राएलला रस्ता दाखवला..इतकी प्रगत यंत्रणा असतानाही इराणला या धोक्याची पुसटशी कल्पनाही येऊ नये, हे आश्चर्यकारक आहे. पण जेव्हा तंत्रज्ञान आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा असा संगम होतो, तेव्हा बंकरची खोली किंवा सुरक्षेचे जाळे फार काळ टिकू शकत नाही. इस्राएलने हे सिद्ध केले की, त्यांच्या नजरेतून सुटणे सध्याच्या काळात तरी अशक्यप्राय आहे.
खामेनींच्याया ऑपरेशनने जगासमोर एक मोठा प्रश्न उभा केला आहे. जर जगातील सर्वात सुरक्षित मानले जाणारे नेते अशा प्रकारे टार्गेट केले जाऊ शकतात, तर आधुनिक युद्धतंत्रात 'सुरक्षित' म्हणण्यासारखी कोणती जागा शिल्लक उरली आहे का? तंत्रज्ञानाच्या या महाजालात आता कोणीही अदृश्य राहिलेले नाही, हेच या घटनेचे सर्वात मोठे वास्तव आहे.






