मार्च १९९४ मध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री दिनेश सिंग आजारी होते.त्यांच्या अंगात चालण्याबोलण्याचे त्राण पण नव्हते...आणि एका रात्री दिल्लीतील एम्स (AIIMS) हॉस्पिटलमधील त्यांच्या बेडवर दुसऱ्याच एका व्यक्तीला झोपवण्यात आलं.विकलांग अवस्थेत असलेले पराराष्ट्रमंत्री व्हीलचेअरवर बसून अज्ञातस्थळी रवाना झाले.ही कोणत्याही सस्पेन्स चित्रपटाची पटकथा नाही , तर भारताची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी रचलेला एक अत्यंत गोपनीय राजनैतिक डाव होता.तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी आपल्या मरणासन्न सहकाऱ्याला, दिनेश सिंह यांना एका अशा मोहिमेवर धाडलं होतं, ज्यावर भारताचं भवितव्य अवलंबून होतं.
आज जेव्हा आपण जागतिक राजकारणात भारताच्या वाढत्या प्रभावाच्या चर्चा करतोय पण, ३२ वर्षांपूर्वीचा तो काळ विसरून चालणार नाही. त्यावेळी सोव्हिएत युनियन कोसळलं होतं आणि रशिया स्वतःच्याच अस्तित्वासाठी संघर्ष करत होता. भारताची आर्थिक स्थिती खालावलेली होती आणि आपण आपलं सोनं गहाण ठेवून अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करत होतो. अशा परिस्थितीत पाकिस्तानने 'ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन' (OIC) आणि काही पाश्चात्य देशांच्या मदतीने काश्मिर प्रश्नावरून भारताला जागतिक स्तरावर घेरण्याची तयारी पूर्ण केली होती.
जिनेव्हामध्ये संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या (UNHRC) बैठकीत काश्मीरमधील कथित मानवाधिकार उल्लंघनावरून भारतावर निर्बंध लादण्याचा ठराव येणार होता. हा ठराव मंजूर झाला असता, तर भारतावर आर्थिक निर्बंध लादले गेले असते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोठी नाचक्की झाली असती. ओआयसी (OIC) मध्ये कोणताही निर्णय 'सर्वसंमती' (Consensus) शिवाय घेतला जात नाही, हे ओळखून नरसिंह राव यांनी इराणकडे मदतीचा हात मागण्याचा निर्णय घेतला.
तेहरान विमानतळावर जेव्हा भारताचं विशेष विमान उतरलं, तेव्हा तिथल्या एल्ब्रूझ पर्वतरांगा बर्फाने झाकलेल्या होत्या. कडाक्याच्या थंडीत परराष्ट्र मंत्री दिनेश सिंह यांना व्हीलचेअरवरून खाली उतरवण्यात आलं. त्यांच्यासोबत तीन मदतनीस आणि एक डॉक्टर होते. इराणचे परराष्ट्र मंत्री डॉ. अली अकबर वेलायती स्वतः प्रोटोकॉल तोडून विमानतळावर आले होते. दिनेश सिंह यांची प्रकृती पाहून तेही थक्क झाले. त्यांनी सिंह यांचा हात हातात घेऊन विचारलं, "अशा अवस्थेत इतका जीवघेणा प्रवास करण्याइतकी काय आणीबाणी आली होती?"
दिनेश सिंह यांनी फक्त एक स्मितहास्य केलं आणि भारताची 'डेमार्श' (राजनैतिक विनंती) त्यांच्या हाती सोपवली. काही तासांतच इराणचे राष्ट्राध्यक्ष अली अकबर हाशमी रफसंजानी यांच्याशी त्यांची भेट झाली. इराणने भारताला शब्द दिला की ते भारताच्या प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाहीत.त्यानंतर ७२ तासांत जे घडलं, त्याने पाकिस्तान आणि पाश्चात्य देशांचे मनसुबे धुळीला मिळाले. इराणने ओआयसीच्या ठरावात खोडा घातला आणि सर्वसंमती नसल्यामुळे तो ठरावच बाद झाला. भारताला जागतिक अपमानातून वाचवणारा तो देश इराण होता.
दिनेश सिंह यांनी आपल्या आयुष्यातील शेवटची राजनैतिक मोहीम फत्ते केली आणि ते दिल्लीला परतले. परतल्यावर ते थेट हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर काहीच महिन्यात त्यांचं निधन झालं.
मात्र, गेल्या काही वर्षांतील घडामोडी पाहिल्या तर इराण आणि भारताचे संबंध खालावत आहेत.२००५ मध्ये जेव्हा इराणच्या अणुकार्यक्रमावरून आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीमध्ये (IAEA) मतदान झालं, तेव्हा भारताने अमेरिकेच्या दबावाखाली इराणच्या विरोधात मतदान केलं. भारताच्या या भूमिकेमुळे इराण कमालीचा दुखावला गेला होता.ज्या इराणने १९९४ मध्ये भारतासाठी पाकीस्तानसोबत पंगा घेतला, त्याच इराणला भारताने गरजेच्या वेळी एकटं पाडलं आहे का ? भारताने अमेरिकेच्या निर्बंधांच्या भीतीने इराणकडून तेल खरेदी करणं आधीच बंद केलं आहे.इराणमधील सूत्रांच्या मते, तेहरान आता भारताऐवजी चीनकडे अधिक आशेने पाहत आहे. भारताने वेळोवेळी पाश्चात्य देशांच्या सुरात सूर मिसळल्यामुळे इराणचा भारतावरील विश्वास कमी होत चालला आहे.
राजकारणाच्या बुद्धिबळावर आपण आज भलेही वजीर झालो असू, पण ज्या प्याद्याने आपल्याला वाचवलं, त्याला आपण आज बोर्डावरून बाहेर काढलं आहे का ?






