इराणच्या युध्दात नव्याने उतरलेले 'हुथी' Houthi कोण आहेत ? इराणने राखून ठेवलेला हुकुमाचा एक्का ? होर्मुझ नंतर आता **लाल समुद्रात (रेड सी) नाकेबंदी ?
वाळवंटात सँडल घालून फिरणारे काही हजार बंडखोर जगाच्या अर्थव्यवस्थेला वेठीस धरू शकत नाहीत? सँडल घालून फिरणारे हे हुथी लोक आज जगातील महासत्तांच्या नाकी नऊ आणत आहेत.
हुथी (Houthi) हे केवळ येमेनमधले स्थानिक बंडखोर राहिलेले नाहीत.
२८ मार्च २०२६ रोजी त्यांनी थेट इस्रायलच्या दक्षिण भागावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला चढवला. अमेरिका आणि इस्रायलच्या इराणवरील युद्धात हुथींनी आता अधिकृतपणे उडी घेतली आहे.
इराणच्या 'अॅक्सिस ऑफ रेसिस्टन्स' (Axis of Resistance) मधील हा गट आता जगासाठी मोठी डोकेदुखी ठरतोय. गेल्या २४ तासांत त्यांनी इस्रायलमधील ईलात आणि बीरशेवा या शहरांना लक्ष्य केले. या हल्ल्यांमुळे लाल समुद्रातील व्यापारी जहाजांच्या वाहतुकीवर पुन्हा एकदा टांगती तलवार आली आहे.
या गटाची मुळं १९९० च्या दशकात उत्तर येमेनच्या सादा प्रांतात सापडतात. झैदी शिया अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी ही चळवळ सुरू झाली होती. हुसेन अल-हुथी या त्यांच्या नेत्याने सौदी अरेबियाच्या प्रभावाविरुद्ध आवाज उठवला. तिथूनच या गटाला 'हुथी' हे नाव पडलं.
हुथींची विचारधारा अत्यंत टोकदार आणि जहाल आहे. त्यांच्या अधिकृत घोषणेमध्ये "अमेरिकेचा मृत्यू, इस्रायलचा मृत्यू आणि ज्यूंचा धिक्कार" असे शब्द आहेत. हा केवळ नारा नाही, तर त्यांच्या लष्करी कारवायांचा पाया आहे.वस्तुस्थिती अशी आहे की, हुथींना केवळ येमेनवर राज्य करायचे नाही. त्यांना स्वतःला इस्लामिक जगाचे रक्षक म्हणून प्रस्थापित करायचे आहे. इराण त्यांना प्रगत ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे पुरवत असल्याचे अनेक पुरावे आता उघड झाले आहेत.
येमेनच्या गृहयुद्धात हुथींनी २०१४ मध्ये राजधानी सनावर ताबा मिळवला होता. तेव्हापासून ते तिथे समांतर सरकार चालवत आहेत. सौदी अरेबियाने त्यांना रोखण्याचे सर्व प्रयत्न केले,पण हुथींनी हार मानली नाही.
या युद्धाचा फटका थेट भारताच्या व्यापारालाही बसत आहे. लाल समुद्रातून जाणारा मार्ग विस्कळीत झाल्यामुळे मालवाहतुकीचा खर्च प्रचंड वाढला आहे. हुथींनी बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिल्याने जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हुथी हे इराणचे सर्वात विश्वासू 'प्रॉक्सि' (Proxy) आहेत. इराणवर जेव्हा जेव्हा लष्करी संकट येते, तेव्हा हुथी लाल समुद्रात धुमाकूळ घालून जगाचे लक्ष विचलित करतात.
अमेरिकेने त्यांना 'जागतिक दहशतवादी' घोषित केले असले, तरी केवळ हवाई हल्ल्यांनी त्यांना नमवणे अशक्य आहे. हे युद्ध केवळ जमिनीसाठी नसून ते जागतिक वर्चस्वाचे एक मोठे बुद्धिबळ बनले आहे.
ज्या गटाला एकेकाळी केवळ 'बंडखोर टोळी' समजले जात होते, त्यांनी आज संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. ही ठिणगी तिसऱ्या महायुद्धाच्या वणव्यात रूपांतरित होणार का, हाच आता कळीचा मुद्दा आहे.
Note (**रेड सी (लाल समुद्र) हा आफ्रिका आणि आशिया यांच्या दरम्यान असलेला, हिंद महासागराचा सुमारे २,२५० किमी लांबीचा अरुंद जलप्रवाह (inlet) आहे)








